गुरुवार, दिसंबर 12 2024 | 11:15:34 PM
Breaking News
Home / अन्य समाचार / कर्टन रेझर – इफ्फी 2024 प्रसिद्धीपत्रक

कर्टन रेझर – इफ्फी 2024 प्रसिद्धीपत्रक

Follow us on:

अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेल्या गोवा राज्यात दि. 20 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत 55 वा IFFI म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत आहे. यावर्षीच्या महोत्सवाच्या निमित्ताने वैविध्यपूर्ण कथने आणि अभिनव भूमिका समोर येणार असून सांस्कृतिक आदानप्रदानाच्या माध्यमातून चित्रपटरसिकांना एक पर्वणीच मिळणार आहे.

इफ्फीसाठी गोव्यात आयोजित कर्टन रेझर पत्रकार परिषदेला संबोधित करताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी, 55 व्या इफ्फीसाठी गोवा संपूर्ण सिद्ध असून या भव्य चित्रपट महोत्सवासाठी अतिथींचे स्वागत करण्यास गोवा उत्सुक आहे, असे सांगितले. या महोत्सवात 81 देशांतील 180  चित्रपट प्रदर्शित केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महोत्सवाच्या निरनिराळ्या ठिकाणांदरम्यान अतिथींना सहज प्रवास करता येण्यासाठी विनामूल्य वाहतूक सुविधा पुरवण्यात येणार आहे. महोत्सवात गोव्याच्या चित्रपटांसाठी विशेष विभाग असून यात स्थानिक प्रतिभा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारे 14 चित्रपट दाखवले जाणार आहेत. इफ्फी संचलनाच्या मार्गावर ‘स्काय लँटर्न’ (आकाशकंदील) स्पर्धा घेतली जाईल आणि सहभागी स्पर्धकांना रोख बक्षिसे दिली जातील, असेही ते म्हणाले. 22 नोव्हेंबरला ईएसजी ऑफिसपासून ते कला अकादमीपर्यंत इफ्फी संचलनाचे आयोजन होणार आहे, असे सावंत यांनी सांगितले.

हा महोत्सव पर्यावरणस्नेही पद्धतीने पार पडावा आणि सर्व लोकांना त्यात सहभागी होणे सुलभ असावे या उद्देशाने सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याची माहिती, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा च्या उपाध्यक्ष डेलियाह लोबो यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

यावर्षी 6500 अतिथींची नोंदणी झाली असून गेल्यावर्षीपेक्षा हा आकडा 25 टक्क्यांनी वाढला आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव तथा NFDC चे (राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ) व्यवस्थापकीय संचालक पृथुल कुमार यांनी दिली. चित्रपटप्रेमींना महोत्सवाट प्रवेश करून त्याचा आनंद घेणे अधिक सोपे जावे यासाठी आणखी 6 पडदे आणि 45 टक्के अधिक स्क्रिनिंग थिएटर्स यावर्षी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. चित्रपट उद्योगातील ख्यातनाम व्यक्तिमत्त्वे महोत्सवाची शोभा वाढवतील असेही कुमार यांनी सांगितले. लोकांचा सहभाग आणि एकंदर अनुभूती या बाबतीत हा महोत्सव नव्या यशोशिखरावर पोहोचावा यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली NFDC सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल. मुरुगन सातत्याने या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेत आहेत. या क्षेत्रातील सर्व भागधारकांना एकत्र आणण्याचा या महोत्सवाचा प्रयत्न असून त्यासाठी मंत्रालयाच्या सचिवांच्या कुशल मार्गदर्शनाखाली समन्वयाने व कालबद्ध रीतीने काम केले जात आहे, असे कुमार यांनी सांगितले.

पत्रकारांना चित्रपट व्यवसायाशी संबंधित सर्व विभागांची आणि चित्रपट उद्योगाच्या विविध पैलूंची सखोल माहिती देण्यासाठी एक विशेष यात्रा (प्रेस टूर) आयोजित केली जाईल, अशी माहितीही कुमार यांनी दिली.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव वृंदा देसाई, आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालयाच्या (पीआयबी) महासंचालक स्मिता वत्स शर्मा आणि पीआयबी तसेच ईएसजी चे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

या परिषदेत इफ्फी 2024 च्या ठळक वैशिष्ट्यांची प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात आली. ती वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

  • इफ्फी 2024 तरुण चित्रपट निर्मात्यांवर लक्ष केंद्रित करत असून यावेळी CMOT विभागात विक्रमी 1032 जणांचा सहभाग नोंदवला गेला आहे. गेल्यावर्षी हा आकडा 550 होता.
  • केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वात इफ्फी 2024 तरुण चित्रनिर्मात्यांना प्रकाशझोतात आणत आहे. ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ अर्थात उद्याचे 75 सर्जनशील कलावंत या उपक्रमाचा आवाका अधिक व्यापक करून गेल्या महोत्सवातील 75 प्रतिभावंतांऐवजी आता 100 तरुण प्रतिभावंताना संधी देण्यात येणार आहे. यात सहभागी होण्यासाठी देशभरातील चित्रपटक्षेत्रातील तरुण विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
  • उगवत्या प्रतिभेचा सन्मान करण्यासाठी ‘पदार्पणातील सर्वोत्कृष्ट भारतीय दिग्दर्शक’ असा नवीन पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. युवा निर्मात्यांसाठी मास्टरक्लास, पॅनल चर्चा, चित्रपट प्रदर्शने आखण्यात आली आहेत. शिवाय, संगीत, नृत्य आणि संवाद यांद्वारे तरुणाईचा सहभाग वाढवण्यासाठी इफ्फीएस्टा नावाचा मनोरंजन विभाग / एंटरटेन्मेन्ट झोन स्थापन करण्यात आला आहे.
  • इफ्फी 2024 साठी 101 देशांमधून विक्रमी 1,676 प्रवेशिका  प्राप्त झाल्या आहेत. महोत्सवाच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचाच हा दाखला होय. इफ्फी 2024 मध्ये 16 जागतिक प्रीमियर, 3 आंतरराष्ट्रीय प्रीमियर्स, 43 आशियाई प्रीमियर्स आणि 109 भारतीय प्रीमियर्ससह 81 देशांमधील 180+ आंतरराष्ट्रीय चित्रपट सादर केले जाणार आहेत. जागतिक स्तरावरील प्रसिद्ध आणि पुरस्कार विजेत्या चित्रपटांची निवड केली गेली असून, यावर्षीचा महोत्सव प्रेक्षकांवर कायमस्वरूपी  प्रभाव टाकण्यासाठी सज्ज आहे.
  • इफ्फी 2024 साठी ऑस्ट्रेलिया ‘कंट्री ऑफ फोकस’ असेल. ऑस्ट्रेलियन चित्रपटांचे समर्पित पॅकेज महोत्सवात दाखवले जाणार असून, स्क्रीन ऑस्ट्रेलिया आणि एनएफडीसी  यांच्यातील सामंजस्य करारान्वये त्या सहयोगाला पुष्टी दिली जाणार आहे. महोत्सवाचा प्रारंभ, मायकेल ग्रेसीच्या ‘बेटर मॅन’ या ऑस्ट्रेलियन चित्रपटाच्या आशिया प्रीमियरने होणार आहे. प्रसिद्ध ब्रिटिश पॉपस्टार रॉबी विल्यम्सच्या जीवनाची चित्तवेधक झलक या चित्रपटातून पहायला मिळेल.
  • इफ्फी 2024 मध्ये प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक ‘फिलिप नॉयस’ यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वैशिष्टयपूर्ण कथनशैली आणि रहस्यमय, तसेच सांस्कृतिकदृष्ट्या उच्च नुभूती देणारे प्रभावी चित्रपट ही त्यांची ओळख आहे. नॉयस यांच्या चित्रपटांमध्ये पॅट्रियट गेम्स, क्लिअर अँड प्रेझेंट डेंजर, सॉल्ट, द सेंट, द बोन कलेक्टर आणि इतर अनेक गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. हॅरिसन फोर्ड, निकोल किडमन, अँजेलिना जोली, डेन्झेल वॉशिंग्टन आणि मायकेल केन यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या असून यावरून चित्रपटांवरील त्यांचा अमीट ठसा दिसून येतो.
  • आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागामध्ये  15 चित्रपट  (12 आंतरराष्ट्रीय + 3 भारतीय) आहेत. सुवर्ण मयूर आणि 40 लाख रुपये रोख असे स्वरूप असलेल्या प्रतिष्ठेच्या सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासाठी या चित्रपटांमध्ये स्पर्धा होईल. सर्वोत्कृष्ट चित्रपटासोबतच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, विशेष ज्युरी पुरस्कार या श्रेणीतील विजेत्यांची निवड देखील ज्युरी (परीक्षक) करतील.
  • पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शन श्रेणीमध्ये प्रतिष्ठित रजत मयूर साठी  5 आंतरराष्ट्रीय आणि 2 भारतीय चित्रपट स्पर्धेत असतील. 10 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • प्रख्यात भारतीय चित्रपट निर्माते आणि अभिनेते आशुतोष गोवारीकर हे आंतरराष्ट्रीय ज्युरी मंडळाचे अध्यक्ष असून, सिंगापूरचे प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते अँथनी चेन, ब्रिटनच्या प्रतिष्ठित निर्मात्या एलिझाबेथ कार्लसन, आशियातील प्रसिद्ध निर्माते फ्रॅन बोर्जिया आणि प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन चित्रपट संकलक जिल बिलकॉक यांचा समावेश मंडळात आहे.
  • इंडियन पॅनोरमा विभागात भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेचे प्रतिनिधित्व करणारे 25 वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आणि 20 कथा-बाह्य  चित्रपट दाखवले  जातील. रणदीप हुडा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या हिंदी चित्रपटाने या विभागाचे उद्घाटन होईल.  तर उदघाटनाचा कथाबाह्यपट घर जैसा कुछ (लडाखी) हा असेल.
  • पदार्पणातील सर्वोत्कृष्ट भारतीय दिग्दर्शक हा नवा पुरस्कार  इफ्फीच्या ‘युवा चित्रपटकर्ते’ यावर केंद्रित संकल्पनेनुरूप , देशभरातील तरुण चित्रपट निर्मिती प्रतिभेची दखल घेण्यासाठी एक नवा पुरस्कार सुरू करण्यात येत आहे. एकूण 102 चित्रपटांमधून निवडलेले 5 चित्रपट या पुरस्कारासाठीच्या स्पर्धेत आहेत. प्रमाणपत्र व 5 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप असून समारोप समारंभात तो प्रदान करण्यात येईल.
  • सर्वोत्कृष्ट वेब मालिका (OTT) पुरस्कारसाठी  गतवर्षीच्या 32 प्रवेशिकांच्या तुलनेत यावर्षी 46 प्रवेशिका आल्या आहेत. विजेत्या मालिकेला प्रमाणपत्र आणि 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल.या पुरस्काराची घोषणा समारोप समारंभाच्या वेळी केली जाईल.
  • शताब्दी वर्ष: इफ्फी -2024मध्ये भारतीय  चित्रपट क्षेत्रातील दिग्गज राज कपूर, मोहम्मद रफी, तपन सिन्हा आणि अक्किनेनी नागेश्वर राव यांना उद्घाटनप्रसंगी आणि समारोपाच्या वेळी  विशेष दृकश्राव्य कार्यक्रमाद्वारे श्रध्दांजली अर्पण केली जाईल, तसेच IFFiesta मध्ये त्यांच्याविषयी उत्तम प्रदर्शने आयोजित केली असून या कार्यक्रमाचे संस्मरण म्हणून भारतीय टपाल खात्याद्वारे ”माय स्टॅम्प’ या विशेष तिकिटांचे प्रकाशन करण्यात येईल. सरकारच्या राष्ट्रीय चित्रपट वारसा मिशन (NFHM) अंतर्गत NFDC-NFAI द्वारे पुनर्संचयित केलेला, या प्रत्येक दिग्गज कलाकाराचा प्रत्येकी एक उत्कृष्ट चित्रपट देखील इफ्फीमध्ये प्रदर्शित केला जाईल. इफ्फी मध्ये दाखवले जाणारे पुनर्संचयित अभिजात चित्रपट पुढीलप्रमाणे आहेत – राज कपूर यांचा आवारा, अक्किनेनी नागेश्वर राव यांचा देवदासू(1953), मोहम्मद रफींची कलाकृती म्हणून हम दोनो आणि तपन सिन्हा यांचा हार्मोनियम.
  • उदयोन्मुख दिग्दर्शकांचे कौतुक करणारा Rising Stars विभाग, पर्यावरणाविषयी जागरूक चित्रपट प्रकाशझोतात आणणारा Mission Life विभाग, ऑस्ट्रेलिया- Country of Focus आणि ब्रिटिश चित्रपट संस्थेतील निवडक चित्रपटांचा Treaty Country Package विभाग हे चार आंतरराष्ट्रीय कार्यक्रम विभाग यामध्ये समाविष्ट असतील.
  • IFFI 2024 महोत्सवात विविधता आणि सर्वसमावेशकता यांचाही संदेश दिला जाणार आहे. कारण यामध्ये महिलांनी दिग्दर्शित केलेले 47 चित्रपट आणि तरुण आणि नवोदित चित्रपट निर्मात्यांचे 66 चित्रपट यांचाही  समावेश आहे. दबलेल्या आवाजांकडे विशेष लक्ष देण्याची महोत्सवाची वचनबद्धता यातून दिसून येते. ‘द विमेन इन सिनेमा’ या महिला विभागात उदयोन्मुख प्रतिभावान  महिला चित्रपट निर्मात्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानावर हे चित्रपट प्रकाश टाकतील.
  • चित्रपट प्रदर्शनासाठी 6 अतिरिक्त चित्रपटगृह सज्ज: मडगाव येथील आयनॉक्सची  4 आणि पोंडा येथील आयनॉक्सची 2 चित्रपटगृहे या वर्षी महोत्सवातील चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी सज्ज करण्यात आली आहेत. महोत्सवादरम्यान आयनॉक्स पणजी (4),मॅक्विनेझ पॅलेस (1), आयनॉक्स पोर्वोरीम (4), आयनॉक्स मडगाव (4), आयनॉक्स पोंडा (2) आणि झी स्क्वेअर  सम्राट अशोक (2) अशा विविध 5 ठिकाणी 270 हून अधिक चित्रपट प्रदर्शित केले जातील. याशिवाय गोव्यात 5 तंबू, तंबूतील चित्रपट (पिक्चर टाईम फ्लॅटेबल थिएटर्स) या चित्रपट प्रदर्शनासाठी तयार ठेवण्यात आली आहेत.
  • क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो (सीएमओटी) या  उपक्रमाने यावर्षी 1,032 प्रवेशिकांसह अभूतपूर्व विक्रमी सहभाग नोंदवला आहे, जो 2023 च्या जवळपास दुप्पट आहे. हा उपक्रम 13 चित्रपटकलांमधील निर्मिती प्रक्रियेतील तरुण प्रतिभेला चालना देतो आणि यासाठी प्रथमच, 100 सहभागी निवडले जातील. यातून इच्छुक चित्रपट निर्मात्यांना एक अनोखे व्यासपीठ मिळेल.
  • मास्टरक्लास, चर्चासत्रे आणि चित्रपट उद्योगाशी संपर्क: ए.आर. रहमान, प्रसून जोशी, शबाना आझमी, मणिरत्नम, विधू विनोद चोप्रा या दिग्गजांसोबत  फिलिप नॉयस आणि जॉन सील यांसारख्या आंतरराष्ट्रीय पाहुण्यांच्या नेतृत्वाखाली कला अकादमीमध्ये 25 हून अधिक मास्टरक्लास आणि चर्चासत्रे याचा आस्वाद घेण्याची  चित्रपट रसिकाना संधी आहे. यामुळे उपस्थितांना ध्वनी संयोजन , डिजिटल युगातील अभिनय आणि चित्रपट निर्मितीच्या भविष्याबद्दल अंतर्दृष्टी मिळेल.
  • फिल्म बाजार 2024: दक्षिण आशियातील सर्वात मोठा चित्रपट बाजार: यंदाची फिल्म बाजारची 18 वी आवृत्ती ही आतापर्यंतची सर्वात मोठी आवृत्ती असेल, ज्यात 350हून अधिक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट विविध विभागांतून प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. ‘मार्च डु कान्स’चे माजी विपणन प्रमुख श्री जेरोम पिलार्ड यांनी फिल्म बाजारचे सल्लागार म्हणून पदभार स्वीकारला आहे.नॉलेज सिरीजमध्ये लेखन मार्गदर्शन आणि चित्रपट निर्मिती, वितरण आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य याविषयी कार्यशाळा यांचा समावेश असेल.इफ्फीच्या बाजूला जो फिल्म बाजार आयोजित केला जातो,तेथे नेहमीच  कल्पना साकार होतात, कथांना ध्वनी मिळतो आणि स्वप्ने आकार घेतात.  इथेच सिनेमाचं भविष्य त्याच्या वर्तमानाला भेटते. 2007 मध्ये त्याची स्थापना झाल्यापासून, फिल्म बाजार हा दक्षिण आशियातील सर्वात मोठा आणि सर्वात आवश्यक चित्रपट बाजार बनला आहे.या वर्षीचे मंडप आणि प्रदर्शने वॉटर फ्रंट प्रोमेनेडच्या बाजूने आयोजित केले जातील आणि त्यात विविध देश आणि राज्ये, चित्रपट उद्योग, तंत्रज्ञान आणि VFX उद्योग इत्यादींचा प्रचंड सहभाग राहील. पॅव्हेलियनमध्ये उद्योगांचा अधिक चांगला सहभाग सुनिश्चित करण्यासाठी FICCI सोबत भागीदारीद्वारे अनेक मंच उभारले जात आहेत. या वर्षीच्या फिल्म बझारमध्ये खुले ‘खरेदीदार-विक्रेते’ संमेलन देखील आयोजित करण्यात येईल, जिथे चित्रपट निर्मात्यांना सहकार्य मिळेल.
  • ‘इफ्फीएस्टा’: संवादात्मक अनुभव आणि सांस्कृतिक उत्सव :इफ्फी यावर्षी पहिला इफ्फीएस्टा आयोजित करेल जो  चित्रपट, संगीत, नृत्य, खाद्यपदार्थ, कला आणि परस्परसंवादी अनुभवांच्या जादूच्या माध्यमातून समुदायाला एकत्र आणणारा एक करमणुकीचा अनोखा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांसाठी  झोमॅटोद्वारा पुरस्कृत भोजन आणि  संगीताचा हा उत्तम मेळ असेल.   कला अकादमी आणि त्याच्या आसपासचे मनोरंजन क्षेत्र प्रामुख्याने युवकांसाठी असेल.  यात भारतीय चित्रपटांच्या प्रवासावरील  प्रदर्शनासह शताब्दी वर्षांचे भव्य  प्रदर्शन असेल. 22 नोव्हेंबर रोजी IFFiesta चा भाग म्हणून ‘जर्नी ऑफ इंडियन सिनेमा’वर केंद्रित  कार्निव्हल परेडचे आयोजन केले जाईल.
  • प्रवेशसुगमता आणि सर्वसमावेशकता: इफ्फीच्या इतिहासात प्रथमच , 55 वा इफ्फी सहजसुलभ प्रवेशयोग्य इफ्फी महोत्सव असेल. हा चित्रपट महोत्सव सर्व चित्रपट रसिकांसाठी, विशेषत: दिव्यांग लोकांसह, सर्व रसिकांसाठी  प्रवेशसुगम आहे याची खात्री करण्यासाठी, इफ्फीने ‘स्वयम्’ या अग्रगण्य संस्थेला प्रवेशसुगमता भागीदार म्हणून नेमले आहे. इफ्फी 2024 सर्वसमावेशकतेसाठी वचनबद्ध असून त्यात, सर्व ठिकाणे सुलभपणे प्रवेश करण्यासाठी सुयोग्य बनवली  आहेत, तसेच स्वयंसेवकांना  दिव्यांगांबद्दल संवेदनशील करण्यात आले आहे. माननीय पंतप्रधानांनी दिलेल्या “सबका साथ, सबका विकास” च्या भावनेला मूर्त स्वरुप देत इफ्फीमधील सर्व चित्रपट, कार्यक्रम आणि  उपक्रमांचे वर्णन श्राव्य पध्दतीने ऐकण्यासाठी आणि सांकेतिक भाषेतील स्पष्टिकरणांसह तसेच, ऍप्लिकेशन्सच्या वापराद्वारे यातील सुगमता सुनिश्चित करण्यात आली आहे.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ)ની 63મી વાર્ષિક પરિષદનું આયોજન કરશે

ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ) 05થી 07 ડિસેમ્બર 2024 દરમિયાન ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએએમ), …