माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) ने आपल्या 250 व्या वर्धापनदिनानिमित्त, 15 डिसेंबर 2024 रोजी माझडॉक मुंबई 10K चॅलेंजच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाने शहरात चैतन्य निर्माण करत समाजातील सर्व स्तरातील सहभागींना एकत्र आणले आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचा सागरी आणि जहाज बांधणी क्षेत्रात खोलवर रुजलेला वारसा अधिक बळकट केला. हा महत्वाचा टप्पा माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडची जहाजबांधणीतील 250 वर्षांची उत्कृष्टता केवळ अधोरेखित करत नाही तर नवोन्मेष, गुणवत्ता आणि राष्ट्रीय विकासाप्रति कंपनीची बांधिलकी देखील दर्शवितो.

या मॅरेथॉनला क्रीडा क्षेत्रातील दिग्गज मोनालिसा बरुआ मेहता, डायना एडलजी, ललिता बाबर आणि अमन चौधरी यांनी झेंडा दाखवून रवाना केले. या कार्यक्रमाला संजीव सिंघल (मुख्य व्यवस्थापकीय संचालक), बिजू जॉर्ज (संचालक, जहाजबांधणी), कमोडोर वासुदेव पुराणिक (सेवानिवृत्त), आणि हरी नारायण जांगीड (सिव्हिओ) यांच्यासह एमडीएलचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना,एमडीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव सिंघल यांनी कंपनीच्या 250 वर्षांच्या वाटचालीबद्दल अभिमान व्यक्त केला आणि प्रतिष्ठित नवरत्न दर्जा मिळविणारी पहिली जहाजबांधणी कंपनी एमडीएलचे वेगळेपण अधोरेखित केले. ही मॅरेथॉन जहाजबांधणीतील एमडीएलचा उत्कृष्टतेचा वारसा केवळ साजरी करत नाही तर समाजात आरोग्य आणि तंदुरुस्तीच्या संस्कृतीला देखील प्रोत्साहन देते यावर त्यांनी भर दिला.

माझडॉक मॅरेथॉनच्या दुसऱ्या आवृत्तीत 10K चॅलेंज आणि 3K फन रन या दोन शर्यत श्रेणींमध्ये 6,000 हून अधिक जण सहभागी झाले. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने पुरुष आणि महिला दोन्ही सहभागींसाठी सहा वयोगटातील 10K श्रेणीतील विजेत्यांसाठी भरीव बक्षीसाची रक्कम देऊ केली. एकूण 5.5 लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आली जी आरोग्य आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्याप्रति एमडीएलची वचनबद्धता अधोरेखित करते. याव्यतिरिक्त, एमडीएल कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष श्रेणी सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र पुरस्कार असून , संस्थेत सहभाग आणि सांघिक भावनेला प्रोत्साहन देण्यात आले आहे.
शर्यतीच्या संपूर्ण निकालांसाठी, सहभागी आणि इतर लोक अधिकृत इव्हेंट लिंकला भेट देऊ शकतात: Mazdock Mumbai 10K Challenge Results.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) बद्दल
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ,मुंबई ही भारतातील अग्रगण्य जहाजबांधणी कंपनीपैकी एक आहे. माझगाव डॉकला 1774 पासूनचा इतिहास आहे, जेव्हा माझगावमध्ये एक लहान ड्राय डॉक बांधण्यात आला होता. गेल्या काही वर्षांमध्ये, एमडीएल ने दर्जेदार कामासाठी नावलौकिक मिळवला आहे आणि विशेषतः नौवहन जगतात आणि भारतीय नौदल आणि तटरक्षक दलासाठी कुशल आणि संसाधनपूर्ण सेवेची परंपरा स्थापित केली आहे. एमडीएल ने 28 युद्धनौकांसह एकूण 802 जहाजे तयार केली आहेत, ज्यात प्रगत विनाशकांपासून ते क्षेपणास्त्र जहाजे आणि 7 पाणबुड्यांचा समावेश आहे. एमडीएल ने भारतातील तसेच परदेशातील विविध ग्राहकांना मालवाहू जहाजे, प्रवासी जहाजे, पुरवठा जहाजे, बहुउद्देशीय मदत जहाज, पाण्याचे टँकर, टग्स, ड्रेजर, फिशिंग ट्रॉलर्स, बार्ज आणि बॉर्डर आउट पोस्ट देखील पुरवल्या आहेत.
Matribhumi Samachar Marathi

