उत्तराखंड येथे 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमासाठी लोगो, शुभंकर आणि जर्सी चा लोकार्पण सोहळा पार पडला. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ मध्ये महत्त्वाची भूमिका बजावून देशभरातील खेळाडूंमध्ये संवाद आणि क्रीडा स्वभावाची भावना वृद्धिंगत करत आहे, असे खडसे यांनी यावेळी सांगितले. या स्पर्धा भारताच्या एकतेचे आणि बलशालीपणाचे प्रतीक कशाप्रकारे बनत आहेत याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण आणि पारंपारिक खेळांना देखील या स्पर्धांमध्ये महत्त्व देऊन देशाच्या क्रीडा आकांक्षांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन खडसे यांनी यावेळी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली क्रीडा पायाभूत सुविधा आणि युवा विकासाला प्राधान्य दिले जात असून खेळाडूंना मोठी स्वप्न पाहण्याची आणि जागतिक ओळख मिळवण्याची संधी मिळत असल्याचे त्या म्हणाल्या.
उत्तराखंडचे नैसर्गिक सौंदर्य आणि या कार्यक्रमाचा भव्यपणा खेळाडूंना उत्कृष्टता मिळवण्याची प्रेरणा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा फिट इंडिया मुव्हमेंटच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहेत. ‘स्वस्थ, सशक्त भारत – देशाच्या युवाशक्ती द्वारे’ या ध्येयाला साध्य करण्याचे एक माध्यम आहे असे त्यांनी सांगितले. या सोहळ्याला उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, क्रीडामंत्री रेखा आर्या, भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष पी. टी. उषा, जीटीसीसी अध्यक्ष श्रीमती सुनयना प्रकाश यांची प्रमुख उपस्थिती होती.
Matribhumi Samachar Marathi

