हाताने पत्र लिहिण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरेला पुन्हा एकदा उजाळा देण्याच्या उद्देशाने भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलच्या “पत्र उत्सव 2.0” महोत्सवाची दुसरी आवृत्ती आज 17 डिसेंबर 2024 रोजी मुंबई जनरल पोस्ट ऑफिस (GPO) येथील वितरण कक्षात आयोजित करण्यात आली होती. या महोत्सवात पत्र लेखन आणि अच्युत पालव कॅलिओग्राफी विद्यालयाच्या अंतर्गत कॅलिओग्राफी कार्यशाळा इत्यादी उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले तसेच महापेक्स 2025 शुभंकर शेकरूचे अनावरण करण्यात आले. हे उपक्रम भारतीय टपाल विभागासाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरतील.


हाताने लिहिलेल्या पत्रांमध्ये असलेल्या भावभावना आणि वैयक्तिक पातळीवरचे गहिरे बंध यांना पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी देण्याचा या महोत्सवाचा उद्देश होता. डिजिटल संवादाच्या साधनांनी युक्त अशा या युगात युवावर्गाला भावनात्मक मूल्य, नॉस्टॅल्जिया अर्थात पूर्वीच्या आठवणी आणि हस्तलिखित पत्रव्यवहारातील कलात्मकता समजावी यासाठी टपाल विभाग असे विशेष उपक्रम राबवत आहे.

Matribhumi Samachar Marathi

