Thursday, January 01 2026 | 02:15:41 PM
Breaking News

संरक्षण क्षेत्रातील नव्या सार्वजनिक उपक्रमांच्या(डीपीएसयूज)भूमिका आणि कार्ये याविषयी संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीचे संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन

Connect us on:

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज 17 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीत संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत पूर्वाश्रमीच्या आयुध निर्माण मंडळाच्या कॉर्पोरेटायजेशननंतर स्थापन झालेल्या नव्या डीपीएसयूच्या भूमिका आणि कार्ये यावर चर्चा झाली. यावेळी या समितीच्या सदस्यांना आर्थिक आकडेवारी, आधुनिकीकरण, भांडवली खर्च, निर्यात, नव्याने विकसित उत्पादने आणि सध्या सुरू असलेले संशोधन आणि विकास प्रकल्प यांची माहिती देण्यात आली. अतिशय महत्त्वाच्या उत्पादनांचे स्वदेशीकरण करण्यासाठी, उत्पादन सुविधांचे आधुनिकीकरण आणि एमएसएमईंचा प्रसार करण्यासाठी नव्या डीपीएसयूंनी केलेल्या प्रयत्नांची संरक्षण मंत्र्यांनी प्रशंसा केली. कॉर्पोरेटायजेशन झाल्यानंतर नव्या डीपीएसयूजनी उत्पादकता आणि दर्जामध्ये सुधारणा केल्याच्या वस्तुस्थितीकडे त्यांनी लक्ष वेधले आणि त्यांची प्रशंसा केली. अतिशय कमी काळात या डीपीएसयूजच्या विक्री आणि नफ्यात उत्तम प्रगती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन डीपीएसयूज आधुनिकीकरण आणि स्वदेशीकरणाला चालना देतील आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा समावेश करून गुणवत्ता, उलाढाल, नफा आणि इतर आर्थिक मापदंडांमध्ये नवीन आयाम प्रस्थापित करतील, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. “आमचे नवीन डीपीएसयूज भारताला संरक्षण उत्पादन क्षेत्रात ‘आत्मनिर्भर’ बनवतील,” असे ते म्हणाले.

नव्या डीपीएसयूजमधील विशिष्ट मानव संसाधन  संबंधित मुद्यांविषयी समितीच्या काही सदस्यांनी व्यक्त केलेल्या चिंता आणि सूचनांवर बोलताना संरक्षणमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिले की डीपीएसयूजच्या कॉर्पोरेटायजेशनमधून निर्माण झालेल्या सर्व मुद्यांचे निराकरण सर्व हितधारकांसोबत योग्य ती सल्लामसलत करून केले जात आहे. सदस्यांच्या सूचनांची त्यांनी प्रशंसा केली आणि अंमलबजावणीसाठी त्यांचा विचार केला जाईल, असे सांगितले.

संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, सीडीएस जनरल अनिल चौहान, संरक्षण उत्पादन सचिव संजीव कुमार आणि संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

About Matribhumi Samachar

Check Also

आयएनएसव्ही कौंडिण्यने आपल्या पहिल्या सागरी प्रवासाला केली सुरुवात

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2025. भारतीय नौदलाच्या  स्वदेशी बनावटीच्या, पारंपरिक शिवणकाम केलेल्या जहाजाने ‘आयएनएसव्ही कौंडिण्य’ ने …