Sunday, January 11 2026 | 04:47:03 AM
Breaking News

2047 पर्यंत भारताला जगाची आर्थिक महासत्ता बनविण्यात भारतीय करप्रणाली आणि भारतीय महसूल सेवेतील अधिकारी वर्ग महत्त्वाची भूमिका पार पाडणार – महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे प्रतिपादन

Connect us on:

2047 या वर्षांमध्ये भारताला जगाची आर्थिक महासत्ता बनविण्यात भारतीय करप्रणाली आणि ही प्रणाली राबविणारा भारतीय महसूल सेवेतील अधिकारी वर्ग हे महत्त्वाची भूमिका पार पाडणार असून जगाच्या नकाशावर भारत आपली आर्थिक सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्य जोपासून आर्थिक विकासात सदैव अग्रेसर राहील असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी .राधाकृष्णन यांनी नागपूर येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या आयआरएसच्या 78 व्या तुकडीच्या उद्घाटन समारंभात केले .

करसंकलनामध्ये कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मानवी संवेदना लक्षात घेऊन आपली जबाबदारी पार पाडली पाहिजेत.करचुकवेगिरी करणाऱ्यांना उचित शिक्षा झालीच पाहिजे परंतु कर भरताना दुर्लक्षपणा झाल्यास अधिकारी वर्गाने गंभीर आणि आर्थिक शिक्षेची तरतूद न करता मानवी संवेदनेचा वापर करून त्यांना जागृत केले पाहिजे.

देशातील काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या पैशाची योग्य विल्हेवाट करून त्याला मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांचा अधिकारात योग्य वाढ करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

देशात असलेली राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती,बुलेट ट्रेन आणि मेगा प्रोजेक्ट या सर्वांची निर्मिती देशातील करदात्यांच्या पैशातूनच होत असून जास्तीत जास्त करदाते या करसंकलनात येण्यासाठी सुद्धा अधिकारी वर्गाने प्रयत्न केले पाहिजेत. जनतेने कर वेळेवर योग्य कर भरावा यासाठी सुद्धा कर संकलनाची प्रक्रिया अधिक सुटसुटीत केली पाहिजे.

कराचे दर अधिक असतील तर महसूल सुद्धा अधिक मिळतो हे चुकीचे असून सध्या कराचे दर कमी असून सुद्धा जीएसटी संकलन असो की कर संकलन असो महसुलात वाढ झालेली आहे हे सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे.

भारतीय महसूल सेवेत नव्याने रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांनी आर्थिक यंत्रणेची इत्यंभूत माहिती कायद्यांचा अभ्यास करून करचुकवेगिरी करणाऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या पळवाटा शोधून काढून त्यांना आर्थिक शिस्त लावण्यात हातभार लावावा असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या 18 व्या तुकडी मध्ये 60 टक्के महिला अधिकारी असणे ही खरंच एक अभिमानाची आणि गर्वाची बाब असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले.

अधिकारी वर्गाने शारीरिक संतुलना सोबतच मानसिक संतुलन जपून देशाच्या जडणघडणीत पूर्णपणे सहकार्य द्यावे आणि खरे कर्मयोगी म्हणून भारताच्या आर्थिक विकासाचे जबाबदार अधिकारी म्हणून आपले कार्य पार पाडले पाहिजे यासाठी त्यांनी अधिकारी वर्गाला शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या 78 व्या तुकडीमध्ये एकूण 145 अधिकारी असून दोन अधिकारी हे भूतान रॉयल सर्विसचे आहेत. सदरची 78वी  बॅचही 16 महिन्याचे प्रशिक्षण देणार असून बॅचची सरासरी आयुर्मर्यादा 27 वर्षांची आहे. बॅचमध्ये महिला अधिकाऱ्यांची संख्या 60 असून ती संपूर्ण बॅचच्या 41 टक्के एवढी आहे.

बॅचमध्ये 22 राज्यांमधील अधिकारी समाविष्ट आहेत यामध्ये सर्वात जास्त उत्तर प्रदेश मधून 21 अधिकारी नंतर राजस्थान मधून 19 अधिकारी दिल्ली आणि महाराष्ट्र मधून 14 अधिकारी आणि इतर राज्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बॅचमध्ये हिंदी ही प्रमुख भाषा असून त्यानंतर मराठी तेलगू कन्नड आणि इतर प्रादेशिक भाषांचा समावेश आहे.

बॅचमधील 32 टक्के अधिकाऱ्यांची पार्श्वभूमी ग्रामीण भागातील असून 68 टक्के अधिकारी हे शहरी आणि निम्नशहरी भागातील आहे.यामध्ये 58% अधिकारी हे अभियांत्रिकी क्षेत्रातील असून 32 टक्के अधिकारी हे कला विज्ञान आणि इतर शाखेतील आहेत. बॅचमध्ये 6 डॉक्टर,7 वकील,4 एमबीएधारक आणि 2 सनदी लेखापाल यांचा समावेश आहे.

सदर प्रशिक्षण हे दोन मॉड्युल्स मध्ये चालणार असून पहिले मॉड्युल डिसेंबर ते जून यादरम्यान मौखिक माध्यमात चालणार आहे तर दुसरे मॉड्युल  जुलै ते एप्रिल यादरम्यान प्रात्यक्षिक माध्यमाद्वारे होणार आहे.

प्रशिक्षणा दरम्यान अधिकारी वर्गाला संसदभवन,निवडणूक आयोग आणि विविध केंद्रीय संस्था यांना प्रत्यक्ष भेट देऊन होणार आहे तसेच भारत दर्शन कार्यक्रमांतर्गत देशातील विविध भागांना भेट देण्यात येणार आहे.सायबर सिक्युरिटी डिजिटल फॉरेन्सिक यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संकलनातील विविध पैलू अधिकाऱ्यांना शिकविल्या जाणार असल्याची माहिती या बॅचचे कोर्स संचालक अंकुश आर्या यांनी दिली.

उद्घाटन समारंभ प्रसंगी राज्यपालांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपुरतर्फे स्मृतीचिन्ह म्हणून बस्तर धोकरा या छत्तीसगडमधील भौगोलिक निर्देशांक प्राप्त कलाकृतीची भेट देण्यात आली

नॅशनल ॲकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी) ही केंद्र शासनाच्या भारतीय महसूल सेवा अधिकाऱ्यांसाठी (आयकर) सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी द्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षा द्वारे आयआरएस अधिकाऱ्यांची भरती केली जाते. थेट भर्ती झाललेले हे अधिकारी क्षेत्रीय कार्यालयात नियुक्ती करण्यापूर्वी एनएडीटी, नागपूर येथे  16 महिन्यांचे सेवा पूर्व प्रशिक्षण पुर्ण करतात.

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध संस्थांचे प्रमुख अधिकारी आणि आयकर विभाग, नागपूरचे वरिष्ठ अधिकारी यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

About Matribhumi Samachar

Check Also

आणि यशाचा गुलाल उधळला, कामाला जाऊन केला अभ्यास

अमरावती. एका ध्येय वेड्या युवकाने खेडेगावात राहून कठोर परिश्रम घेऊन परीक्षा उत्तीर्ण केली मात्र, परीक्षा वादाच्या …