Wednesday, January 07 2026 | 04:16:14 PM
Breaking News

प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन अँड अपरेल (पीएम मित्र) योजनेत गुंतवणूक करण्यासाठी केंद्रीयमंत्री गिरीराज सिंग यांनी युनिक्लो या जपानी कंपनीला केले आमंत्रित

Connect us on:

भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला मजबूत करण्यासाठी सामायिक वचनबद्धता दाखवत भारतात गुंतवणूक करण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरीराज सिंग यांनी युनिक्लो या जपानी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. युनिक्लोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यापूर्वी भेट घेऊन कापसाच्या उत्पादनाची क्षमता, उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासह भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रात सहकार्य करायला उत्सुकता दर्शवली होती. त्याच बैठकीच्या मालिकेत ही चर्चा झाली.

युनिक्लोने 31 मार्च 2024 पर्यंत देशभरात 15 स्टोअर्स आणि किरकोळ व्यापारातील 814 कोटी रुपये इतक्या उत्पन्नासह, भारतातील किरकोळ आणि वस्त्रोद्योग परिसंस्थेत भरीव योगदान दिले असून  30% वाढ नोंदवली आहे. यामध्ये दिवसरात्र चालणारे 18 कारखाने आणि 6 कापड गिरण्या यांचा समावेश असून यासाठी त्यांना 9 विक्रेत्यांकडून सहकार्य मिळाले आहे.

युनिक्लोने कापसाच्या उत्पादनाची क्षमता, उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासह  भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रात सहकार्य करायला उत्सुकता दर्शवली आहे.देशात महाराष्ट्रातील अकोला येथे आधीच उच्च-घनता दर्जाचे बियाणे वापरले जात असून त्याची उत्पादकता पातळी 1,500 किलो प्रति हेक्टर पर्यंत आहे. उत्पादकता आणि उच्च गुणवत्ता पातळी सह 1,000 किलो प्रति हेक्टर पर्यंत उत्पन्न मिळेल याच निकषावर कंपनीचा पथदर्शी प्रकल्प देखील कार्यरत आहे.भारताला उच्च दर्जाच्या कापसाचे प्रमुख जागतिक केंद्र बनवण्याच्या सामायिक दृष्टीकोनानुसार अशा प्रकारच्या उपक्रमांची व्याप्ती वाढवण्याकरता युनिक्लोच्या जमिनीच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मंत्रालय वचनबद्ध आहे.

वस्त्रोद्योगात वर्ष 2030 पर्यंत 350 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी उलाढाल आणि 100 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतक्या निर्यातीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी भारताच्या वस्त्रोद्योग विकासाच्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने, मंत्रालयाने युनिक्लोला पंतप्रधानांच्या मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन आणि परिधान (पीएम मित्र) पार्क्समध्ये गुंतवणूक करण्याचे आमंत्रण दिले आहे. पीएम मित्र पार्क्स वापरण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी सज्ज अशी परिसंस्था प्रदान करतात ज्या  सर्व सोई सुविधांनी युक्त असतात आणि त्या माध्यमातून शाश्वत आणि कार्यक्षम परिचालन करणाऱ्या कंपन्यांसाठी काम करणे सहजसोपे होते.

युनिक्लो बरोबरची ही भागीदारी भारताच्या शेवटच्या टोकापर्यंतच्या वस्त्रोद्योग मूल्य साखळीला बळ देईल, महिलांच्या नेतृत्वाखालील अर्थव्यवस्था मजबूत करेल आणि जागतिक वस्त्रोद्योग नेता म्हणून भारताचे स्थान उंचावेल, असा विश्वास वस्त्रोद्योग मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

1 जानेवारी 2026 पासून भारत स्विकारणार ‘किंबर्ले प्रोसेस’ या यंत्रणेचे प्रतिष्ठित अध्यक्षपद

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2025. ‘किंबर्ले प्रोसेस’ च्या (KP – जगभरातील कच्च्या हिऱ्यांचा व्यापार सुरक्षित व …