भारतीय तटरक्षक दलासाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडकडून(MDL) बांधणी होत असलेल्या 14 वेगवान गस्ती नौकांपैकी(FPV) पहिल्या आणि पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानावर आधारित सहा किनारी गस्ती नौकांच्या ताफ्यातील पहिल्या नौकेच्या (NGOPV) प्लेट कटिंग अर्थात नौका बांधणी प्रारंभ समारंभाचे मुंबईत 19 डिसेंबर 2024 रोजी आयोजन करण्यात आले. ‘Buy (Indian-IDDM)’ या श्रेणी अंतर्गत एमडीएलला या नौका बांधण्यासाठी 2,684 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. या नौकांमध्ये टेहळणीसाठी ड्रोन्स, निर्णय घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता(एआय), समुद्रात हव्या त्या पद्धतीने संचार करण्यासाठी एकात्मिक ब्रिज प्रणाली आणि कार्यक्षम परिचालनासाठी एक एकात्मिक यंत्रसामग्री नियंत्रण प्रणाली यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
या अत्याधुनिक नौकांची रचना, विकास आणि बांधणी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात येत आहे आणि येत्या काही वर्षात त्या तटरक्षक दलाच्या ताब्यात देण्यात येतील.आत्मनिर्भर भारत या सरकारच्या दृष्टीकोनाला त्यामुळे बळकटी मिळेल आणि देशाच्या संरक्षण उत्पादन क्षमतेत वाढ होईल. या नौका ताफ्यात दाखल झाल्यावर किनारी सुरक्षेच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्यामध्ये, देशाच्या सागरी सीमा सुरक्षित करण्यामध्ये, शोध आणि बचाव कार्य राबवण्यामध्ये या प्रदेशात निर्माण होणाऱ्या सागरी सुरक्षाविषयक धोक्यांना तोंड देण्यामध्ये आणि देशाच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या सागरी क्षेत्रात सागरी कायदा-सुरक्षा टिकवण्यामध्ये तटरक्षक दल आणखी सुसज्ज होईल.
Matribhumi Samachar Marathi

