नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024
सुशासन सप्ताह 2024 मधील उपक्रमांचा भाग म्हणून सार्वजनिक तक्रार निवारण आणि सेवा वितरणात सुधारणेसाठी ‘प्रशासन गाँव की ओर’ हे देशव्यापी अभियान सर्व जिल्हे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 19 ते 24 डिसेंबर 2024 या काळात आयोजित करण्यात आले आहे.
पंतप्रधानांनी सुशासन सप्ताहानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटले आहे, ‘प्रशासन गाँव की ओर’ अभियान सुशासन सप्ताहाचा महत्त्वाचा भाग ठरत आहे ही उत्साहवर्धक बाब आहे. ‘प्रशासन गाँव की ओर’ ही निव्वळ घोषणा नाही तर प्रभावी प्रशासन ग्रामीण जनतेजवळ नेण्याच्या उद्देशाने केलेला परिवर्तनकारक प्रयत्न आहे. तळागाळातील जनतेपर्यंत विकास नेणाऱ्या लोकशाहीचे हे सार आहे.”
देशातील 700 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये सुशासनाच्या पद्धती आणि सेवा वितरणात सुधारणेविषयी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून https://darpgapps.nic.in/GGW24 हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश 19 ते 24 डिसेंबर 2024 या काळात ‘प्रशासन गाँव की ओर’ अभियानांतर्गत पुढील उपक्रम राबविणार आहेत –
- सार्वजनिक तक्रारींच्या निवारणासाठी विशेष शिबिरे
- सीपीग्राम्स अर्थात केंद्रीभूत सार्वजनिक तक्रार निवारण व नियमन पोर्टलद्वारे सार्वजनिक तक्रारींचे निवारण
- राज्याच्या पोर्टलद्वारे सार्वजनिक तक्रारींचे निवारण
- सेवा वितरण अर्जांचा निपटारा
- सुशासनाच्या पद्धतींचे एकत्रीकरण आणि प्रसार
- सार्वजनिक तक्रार निवारणाच्या यशोगाथा
सर्व जिल्ह्यांमध्ये 23 डिसेंबर 2024 रोजी सुशासन पद्धतींवर कार्यशाळा घेण्यात येईल.

सुशासन सप्ताह 2024 चा भाग म्हणून नवी दिल्लीसह राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये आणि सर्व जिल्ह्यांमध्ये उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘प्रशासन गाँव की ओर’ अभियान 2024 च्या उद्घाटन सोहळ्याला 750 पेक्षा जास्त जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी आणि अतिरिक्त सचिव, राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकीय सुधारणा विभागांमधील वरिष्ठ अधिकारी भारतातील 1600 ठिकाणांहून उपस्थित होते.
Matribhumi Samachar Marathi

