केंद्रीय जलशक्तीमंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे राष्ट्रीय जलविकास संस्थेची 38 वी वार्षिक बैठक आणि नदी जोड प्रकल्पाविषयीच्या विशेष समितीची 22 वी बैठक नुकतीच झाली. पाटील यांनी यावेळी एम पी के सी (संशोधित पार्वती कालिसिंध चंबळ) आणि केन-बेटवा नदी जोड प्रकल्पाच्या कामात अलीकडे झालेल्या प्रगतीविषयी माहिती दिली. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजस्थान दौऱ्यात जयपूर येथे पार्वती कालिसिंध चंबळ नदी जोड प्रकल्पाविषयीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याच्या घोषणेसह राजस्थानच्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी जयपूरमध्ये नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमाचीही त्यांनी माहिती दिली. तसेच राष्ट्राच्या विकासाकरता इतर राज्यांनी देखील त्यांच्या राज्यातील नदी जोड प्रकल्पांना सहमती द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
अलीकडच्या वर्षांमध्ये नदी जोड प्रकल्पांबाबत देशात लक्षणीय प्रगती झाल्याचे जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाच्या सचिवांनी यावेळी सांगितले. प्रामुख्याने केन-बेटवा प्रकल्पाविषयी बोलताना त्या म्हणाल्या की हा प्रकल्प देशातील अशाप्रकारचा पहिला प्रकल्प आहे ज्याची अंमलबजावणी सुरु आहे. जलस्तोत्रांचे व्यवस्थापन हे केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक असून नदी जोड प्रकल्प कार्यक्रमाला केंद्र सरकारने अत्युच्च प्राधान्य दिले आहे असे त्या म्हणाल्या.
बैठकीदरम्यान, एनडब्ल्यूडीएच्या महासंचालकांनी बैठकीच्या मुख्य उद्दिष्टांविषयी तपशीलवार सादरीकरण केले.



Matribhumi Samachar Marathi

