भारतीय वायु सेनेच्या ‘गरुड’ कमांडोज या विशेष पथकाचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण झाल्यानिमित्त 21 डिसेंबर 2024 रोजी चांदीनगर येथील वायु सेनेच्या तळावरील गरुड रेजिमेंटल प्रशिक्षण केंद्रात मरून बेरेट हे समारंभ संचलन आयोजित करण्यात आले. सहाय्यक चीफ ऑफ एअर स्टाफ ऑपरेशन्स (वाहतूक आणि हेलिकॉप्टर कारवाई) हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यांनी या संचलनाची पाहणी केली.
मुख्य पाहुण्यांनी ‘गरुड’ प्रशिक्षार्थींच्या यशाचे अभिनंदन केले. युवा कमांडोंशी संवाद साधताना, त्यांनी कठोर प्रशिक्षण आणि वेगाने बदलणाऱ्या सुरक्षा परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वायू सेनेसाठी विशेष कौशल्ये विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. यशस्वी ‘गरुड’ प्रशिक्षार्थींना त्यांनी मरून बेरेट, गरुड प्रावीण्य बॅज आणि विशेष दल टॅब प्रदान केले आणि पुरस्कार विजेत्यांना ट्रॉफी प्रदान केली.
मरून बेरेट समारंभ संचलन हा ‘गरुड’ दलासाठी अभिमानाचा आणि यशाचा क्षण आहे. हा समारंभ अत्यंत कठीण प्रशिक्षण कार्यक्रमाचा योग्य शेवट आणि ‘यंग स्पेशल फोर्सेस ऑपरेटर्स’मध्ये त्यांचे झालेले परिवर्तन दर्शवतो. या प्रशिक्षणातून अभिजात ‘गरुड’ दलाचा भाग होऊन हे युवा भारतीय वायू सेनेच्या कार्यक्षमतेला अधिक बळकट करतात.
Matribhumi Samachar Marathi

