नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2024
पंडित मदन मोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करून आदरांजली वाहिली.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा; केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री, अश्विनी वैष्णव; केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल; केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव; केंद्रीय संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक कार्य मंत्री किरेन रिजिजू; राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह खासदार आणि माजी खासदारांनी देखील पंडित मदन मोहन मालवीय आणि अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली.
लोकसभा सचिवालयाने, पंडित मदन मोहन मालवीय आणि अटलबिहारी वाजपेयी यांची व्यक्तिचित्रणे असलेली, हिंदी आणि इंग्रजीत प्रकाशित केलेली पुस्तिका, उपस्थित मान्यवरांना यावेळी देण्यात आली.
पंडित मदन मोहन मालवीय आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी केलेल्या अतुलनीय राष्ट्रसेवेच्या सन्मानार्थ, त्यांच्या प्रतिमांचे अनावरण अनुक्रमे 19 डिसेंबर 1957 आणि 12 फेब्रुवारी 2019 रोजी संविधान सदनाच्या ( पूर्वाश्रमीचे संसद भवन) मध्यवर्ती सभागृहामध्ये करण्यात आले होते.
भारताच्या राष्ट्रपतींनी भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना 2015 साली प्रदान केला होता.
संविधान सदनातील या कार्यक्रमाआधी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवी दिल्लीतील ‘सदैव अटल’ येथे अटलबिहारी वाजपेयी यांना पुष्पांजली अर्पण केली.
अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण करताना, श्री बिर्ला यांनी X समाज माध्यमावर टिप्पणी करताना म्हटले आहे, –
“माजी पंतप्रधान, भारतरत्न दिवंगत अटल बिहारी वाजपेयी जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. एक बुद्धिमान राजकारणी, धडाडीचे कवी, लेखक, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून अटलजी सदैव स्मरणात राहतील.
10 वेळा लोकसभेवर आणि दोन वेळा राज्यसभेत निवडून येऊन आदरणीय अटलजींनी आपली संसदीय परंपरा समृद्ध केली आणि आयुष्यभर देशाच्या प्रगतीसाठी समर्पित राहिले.
सत्ताधारी असो की विरोधक, त्यांचा सर्वांनीच आदर केला. संसदीय परंपरांबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन आणि सभागृहातील त्यांचे साधे आणि अदबशीर वर्तन, सर्व लोकप्रतिनिधींनी अनुकरण्याजोगे आहे. दिवंगत अटलजींच्या स्मरणार्थ, हा दिवस देशभरात ‘सुशासन दिन’ म्हणून देखील साजरा केला जातो. या निमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा.”
याचप्रमाणे, पंडित मदन मोहन मालवीय यांना आदरांजली अर्पण करताना, बिर्ला यांनी X या समाज माध्यमावर टिप्पणी करताना म्हटले आहे, “महान शिक्षणतज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक महात्मा महनीय पं. मदन मोहन मालवीय जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली.
भारतरत्न मालवीयजी यांचे संपूर्ण जीवन, देश आणि देशबांधवांसाठी समर्पित होते. त्यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन म्हणजे आधुनिक विज्ञानासोबत भारतीय संस्कृतीचे सुंदर संश्लेषण होते.
आधुनिक ज्ञान आणि विज्ञानाने समृद्ध आणि भारतीयत्वाच्या भावनेने ओतप्रोत ओथंबलेली पिढी घडवण्याच्या उद्देशाने त्यांनी काशी हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली. या महात्म्याचे व्यक्तिमत्व आणि कार्य आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील.”
Matribhumi Samachar Marathi

