नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2024
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पृथ्वी विज्ञान आणि पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीदिनी आयोजित सुशासन दिनानिमित्त ‘विकसित पंचायत कर्मयोगी’ उपक्रमाचा शुभारंभ केला. तळागाळातील प्रशासन बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

देशव्यापी ‘प्रशासन गाव की ओर’ मोहिमेचा एक भाग असलेल्या या उपक्रमाचे उद्दिष्ट पंचायती राज संस्थांची (PRIs) क्षमता आणि सक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने, निवडून आलेले प्रतिनिधी आणि अधिकारी यांना प्रभावी प्रशासन तसेच सहभागी नियोजनासाठी आवश्यक साधने आणि ज्ञानाने सुसज्ज करणे हे आहे.
दीर्घकाळ टिकणाऱ्या तसेच अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी आणि क्षमतांची उणीव भरून काढण्यासाठी तळागाळापासून प्रशासन सुधारणा सुरू झाल्या पाहिजेत, यावर या कार्यक्रमात बोलताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी भर दिला. “विकसित पंचायत कर्मयोगी” उपक्रम नवोन्मेषी साधने आणि क्षमता-निर्माण आराखड्याद्वारे पंचायती राज संस्था (PRIs) मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करतो.
या कार्यक्रमात डॉ. जितेंद्र सिंह यांनी अटल बिहारी वाजपेयी यांनाही आदरांजली वाहिली. वाजपेयी यांच्या सुशासनाच्या दृष्टीकोनातून या दिवसाच्या संस्थात्मकीकरणाला प्रेरणा मिळाली आहे. यानिमित्ताने शासन दर वर्षी नवीन उपक्रम सादर करण्याचा प्रयत्न करते. हे उपक्रम प्रशासनाला मोलाची जोड देतात आणि सोबतच प्रशासनाची गतिमानता आणि विकसित स्वरूप प्रतिबिंबित करतात.

परिवर्तनात्मक प्रशासन सुधारणांना चालना देण्याच्या कामी कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अथक वचनबद्धतेबद्दल आणि त्यांच्या प्रयत्नांबद्दल डॉ. जितेंद्र सिंह यांनी त्यांचे कौतुक केले. नागरिक-केंद्रित प्रशासन प्रत्यक्षात साकारण्याच्या त्यांच्या अभिनव दृष्टिकोनाची आणि समर्पणाचीही त्यांनी प्रशंसा केली.
‘विकसित पंचायत कर्मयोगी’ सारखे उपक्रम सर्वसमावेशकता, पारदर्शकता आणि तांत्रिक नवोन्मेष या सरकारच्या वचनबद्धतेचा दाखला देतात, असे आपल्या भाषणाचा समारोप करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले. पंचायतींना सशक्त करून आणि सहभागात्मक शासन सुनिश्चित करून सरकारने भविष्यासाठी सुसज्ज भारताचा पाया रचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भविष्यातील भारतात नागरिक त्यांचे भाग्य घडवण्यात सक्रिय भागीदार असतील असेही ते म्हणाले.
Matribhumi Samachar Marathi

