नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (1 डिसेंबर 2025) नवी दिल्ली येथील पादत्राणे डिझाइन आणि विकास संस्थेच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिल्या.
पादत्राणांचे उत्पादन आणि वापराच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. 2024-25 या आर्थिक वर्षात, भारताची पादत्राण निर्यात 2500 कोटी अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त होती, तर आयात सुमारे 68 कोटी अमेरिकन डॉलर्स होती. भारताची पादत्राण निर्यात आयातीच्या जवळपास चार पट आहे, असे त्यांनी सांगितले. भारत जगातील प्रमुख पादत्राणे निर्यातदार देशांपैकी एक आहे. मात्र, आपली निर्यात आणखी वाढवण्यासाठी, या व्यवसायाचा विस्तार करणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या विस्तारामुळे विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठी आणि रोजगार निर्माण करण्यासाठी किंवा उद्योगांमध्ये रोजगार शोधण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी नमूद केले.
एफडीडीआय आणि नॉर्दम्प्टन विद्यापीठ यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. भारत आणि युके मधील मुक्त व्यापार कराराअंतर्गत वाढत्या सहकार्याचा हा आणखी एक पैलू असल्याचे त्यांनी सांगितले. या सामंजस्य करारात टिकाऊ सामग्री आणि चक्राकार अर्थव्यवस्था पद्धतींवर विशेष भर देण्यात आला आहे हे त्यांनी अधोरेखित केले.
पादत्राणे डिझाइन या क्षेत्रात अनेक महत्त्वाचे पैलू आहेत, असे त्या म्हणाल्या. पदवीधर विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींनी सल्ला दिला की त्यांनी व्यापक दृष्टिकोनातून या क्षेत्रात पुढे जावे आणि आपल्या कार्यातून समाज आणि देशासाठी अनेक प्रकारे योगदान देण्याचा प्रयत्न करावा.
Matribhumi Samachar Marathi

