Monday, December 08 2025 | 08:28:00 AM
Breaking News

घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझिल आणि नामिबिया या देशांच्या दौऱ्यावर रवाना होण्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

Connect us on:

मी 2 ते 9 जुलै 2025 या कालावधीतील घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझिल आणि नामिबिया या पाच देशांच्या दौऱ्यासाठी आज रवाना होत आहे.

घानाचे राष्ट्रपती जॉन द्रामनी महामा यांच्या आमंत्रणाचा मान राखत मी 2 आणि 3 जुलै रोजी घाना देशाला भेट देईन. जगाच्या दक्षिणेकडील देशांपैकी घाना हा आपला महत्त्वाचा भागीदार देश आहे आणि हा देश आफ्रिकन महासंघ तसेच पश्चिम आफ्रिकी राष्ट्रांचा आर्थिक समुदाय यामध्ये महत्वाची भूमिका निभावतो.उभय  देशांमधील  ऐतिहासिक बंध आणखी दृढ करण्यासाठी आणि गुंतवणूक, उर्जा, आरोग्य, सुरक्षा, क्षमता निर्मिती तसेच विकासविषयक भागीदारी या क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दालने खुली करण्यासाठी मी उत्सुक आहे. सहकारी लोकशाही देश असलेल्या  घानाच्या संसदेत भाषण करणे हा माझा सन्मान असेल असे मी समजतो.

दिनांक 3 आणि 4 जुलै या काळात मी त्रिनिदाद आणि टोबॅगो दौऱ्यावर असेन. या देशाशी आपण दृढ ऐतिहासिक, सांस्कृतिक तसेच जनतेतील परस्पर संबंध सामायिक करतो. या वर्षीच्या प्रवासी भारतीय दिवसाचे प्रमुख अतिथीपद निभावलेल्या राष्ट्रपती ख्रिस्तीन कारला कांगलू आणि या देशाच्या पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा निवडून आलेल्या कमला प्रसाद-बिस्सेसर यांची भेट मी घेणार आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये 180 वर्षांपूर्वी भारतीय लोक पहिल्यांदा आले. माझी ही भेट आपल्या देशांदरम्यान असलेल्या वांशिक आणि नात्यासंबंधीच्या विशेष बंधांना नवसंजीवनी देण्याची संधी देईल.

त्यानंतर पोर्ट ऑफ स्पेनहून मी ब्युनॉस आर्यसला जाईन. गेल्या 57 वर्षांमध्ये एखाद्या भारतीय पंतप्रधानाने अर्जेंटिना देशाला दिलेली ही पहिलीच द्विपक्षीय भेट असेल. अर्जेंटिना हा देश लॅटिन अमेरिकेतील महत्त्वाचा आर्थिक भागीदार असून जी20 समूहातील जवळचा सहकारी देश आहे. या भेटीदरम्यान राष्ट्रपती जेवियर माईली  यांच्याशी चर्चा करण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. गेल्या वर्षी माझी त्यांच्याशी भेट झाली होती. कृषी, महत्त्वाची खनिजे, उर्जा, व्यापार, पर्यटन, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक या क्षेत्रांसह विविध क्षेत्रांमध्ये परस्पर लाभदायी सहकार्य वाढवण्यावर आम्ही या भेटीत लक्ष केंद्रित करणार आहोत.

दिनांक 6 आणि 7 रोजी मी रिओ दि जनेरियो  येथे आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहीन. संस्थापक सदस्य देश म्हणून भारत विविध अर्थव्यवस्थांमधील सहकार्यासाठीचा महत्त्वाचा मंच म्हणून ब्रिक्सप्रती कटिबद्ध आहे. आम्ही एकत्रितपणे अधिक शांततामय, सुयोग्य,न्याय्य, लोकशाहीवादी आणि संतुलित  बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेच्या स्थापनेसाठी प्रयत्न करत आहोत. या शिखर परिषदेच्या अनुषंगाने, मी विविध जागतिक नेत्यांची देखील भेट घेणार आहे. यावेळी मी द्विपक्षीय राजकीय  भेटीसाठी ब्रासिलियाला जाणार असून सुमारे सहा दशकांमध्ये भारतीय पंतप्रधानाची या देशाला ही पहिलीच भेट असेल. या भेटीद्वारे मला ब्राझीलशी असलेली आपली दृढ भागीदारी आणखी बळकट करण्याची तसेच जगाच्या दक्षिणेकडील देशांच्या प्राधान्यक्रमांच्या बाबतीत प्रगती करण्यासाठी माझे मित्र राष्ट्रपती लुईझ इनाशियो लुला दा सिल्व्हा यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.

या दौऱ्यातील माझा शेवटचा थांबा नामिबिया या देशात असेल. हा देश आपला विश्वासू भागीदार देश असून आपण या देशाशी वसाहतवादाविरुद्धच्या संघर्षाचा एकसमान इतिहास सामायिक करतो.या देशाच्या राष्ट्रपती डॉ.नेतुम्बो नंदी-नदैतवाह यांची भेट घेऊन आपली जनता, आपले प्रदेश तसेच जागतिक दक्षिणेकडील देश यांच्यासाठी अधिक विस्तृत प्रमाणातील सहकार्याचा नवा मार्ग निश्चित करण्यासाठी उत्सुक आहे.स्वातंत्र्य आणि विकासासाठी आपली कायमस्वरूपी एकजुटता  तसेच सामायिक वचनबद्धता साजरी करत असताना नामिबियाच्या संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित करण्याचा सन्मान देखील मला प्राप्त होणार आहे.
माझा  या पाच देशांचा दौरा  जगाच्या दक्षिणेकडील देशांमधील आपले मैत्रीचे बंध अधिक बळकट करेल , अटलांटिकच्या दोन्ही बाजूंकडील आपली भागीदारी मजबूत करेल तसेच ब्रिक्स, आफ्रिकी महासंघ, ईसीओडब्ल्यूएएस आणि सीएआरआयसीओएम यांसारख्या बहुपक्षीय मंचांवरील सहभाग आणखी दृढ करेल  असा विश्वास मला वाटतो.

About Matribhumi Samachar

Check Also

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन

महामहीम, माझे मित्र राष्ट्रपती पुतीन दोन्ही देशांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे सहकारी नमस्कार! “दोबरी देन”! आज भारत …