पणजी गोवा- 2.08.2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून देशभरातील 9.7 कोटीहून अधिक शेतक-यांच्या खात्यात पीएम-किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 20व्या हप्त्याची 20,500 कोटीहून अधिक रक्कम हस्तांतरित केली. याशिवाय 2,200 कोटी रुपयांच्या विविध विकास योजनांची पायाभरणी आणि उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण देशभरात करण्यात आले होते.
गोव्यातही साखंळी येथील रवींद्र भवनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले. या कार्यक्रमात राज्यातल्या विविध भागातले पीएम-किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांच्या प्रती अतिसंवेदनशील असून 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून शेतक-यांबद्दल त्यांचे प्रेम ही दिसून येते असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी बोलतांना सांगितले. पीएम-किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक शेतक-याला 2000 रूपये याप्रमाणे वर्षात तीन हप्त्यांचे एकुण सहा हजार रुपये थेट खात्यात हस्तांतरित करण्यात येते अशा प्रकारची ही शेतक-यांना आर्थिक लाभ देणारी योजना आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. गोवा राज्यातील सुमारे साडे सहा हजार शेतक-यांच्या बँक खात्यात आतापर्यंत 20 हप्त्यांची एकुण 24 कोटींची रक्कम जमा झाल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा किसान क्रेडिट कार्ड ही योजना आणली, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक कामासाठी या योजनेच्या माध्यमातून एक लाख रूपयांपर्यंतचे कर्ज बँकांकडून सहज उपलब्ध करण्यात येते असे मुख्यमंत्री म्हणाले.
शेती आणि शेतक-यांच्या सक्षमीकरणासाठी गोवा राज्य सरकारच्या वतीने विविध योजना तालुका आणि गांव पातळीवर राबवण्यात येत आहेत. सामुदायिक शेतीच्या आणि बागायती शेतीच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात उत्पादन वाढ झाल्याने शेतक-यांच्या या उत्पादनाची आता निर्यात केली जात आहे ही आपल्यासाठी मोठ्या गौरवाची बाब आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. सामुदायिक शेतीच्या या उपक्रमात तरुण-युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
शेतक-यांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी आपले सरकार कार्यरत आहे. राज्य सरकारच्या वतीने एकात्मिक शेतीच्या दृष्टीकोनातून अग्रीकल्चर – हाँर्टीकल्चर – फिशींगकल्चर – डेअरीकल्चर असा उपक्रम राबवत असून त्यातून शेतक-यांना फायदा मिळणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले.
विकसित भारत @47 आणि विकसित गोवा @37 हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
Matribhumi Samachar Marathi

