राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (3 जानेवारी, 2025) बेंगळुरू येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस (निम्हान्स) संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात सहभागी झाल्या.
याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, अपवादात्मक रूग्ण सेवेसह अभिनव संशोधन आणि कठोर शैक्षणिक कार्यक्रमामुळे निम्हान्स हे मानसिक आरोग्य आणि न्यूरोसायन्सच्या क्षेत्रात एक अग्रणी संस्था बनली आहे. समुदाय-आधारित मानसिक आरोग्य सेवेच्या बेल्लारी मॉडेलने इतिहास रचला आहे. आता, Tele MANAS प्लॅटफॉर्म गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करते. गेल्या दोन वर्षात देशभरातील 53 टेली मानस केंद्रांनी जवळपास 17 लाख लोकांना त्यांच्या निवडलेल्या भाषेत सेवा दिली आहे हे ऐकून समाधान वाटल्याचे त्या म्हणाल्या.
राष्ट्रपती म्हणाल्या की भूतकाळात, काही समाजांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या आणि चिंतांकडे पुरेसे लक्ष दिले जात नव्हते. मात्र, अलीकडच्या काळात मानसिक आरोग्याबाबत जागरुकता वाढत आहे. मानसिक आजारांशी संबंधित अवैज्ञानिक समजुती आणि कलंक ही भूतकाळातील बाब आहे. आता विविध आजारांनी ग्रस्त असलेल्यांना मदत घेणे सोपे होते. विशेषत: आजच्या घडीला हा एक स्वागतार्ह बदल आहे, कारण जगभरात विविध प्रकारच्या मानसिक आरोग्याच्या समस्या महामारीचे रूप घेत आहेत.
राष्ट्रपती म्हणाल्या की, वाढत्या जागरुकतेमुळे रूग्णांना त्यांच्या समस्या उघडपणे सांगणे शक्य झाले आहे. NIMHANS ने कधीही कुठेही समुपदेशनाची सुविधा देण्यासाठी टेली मानस आणि बाल आणि किशोरवयीन रुग्णांच्या मानसिक आरोग्य समस्या सोडवण्यासाठी संवाद प्लॅटफॉर्म सारखे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत ही आनंदाची बाब असल्याचे त्या म्हणाल्या.
मानसिक आणि शारीरिक त्रास दूर करण्यासाठी आधुनिक आरोग्य सेवा प्रणालींमध्ये योग सारख्या पारंपारिक पद्धतींचा यशस्वीपणे समावेश केल्याबद्दल त्यांनी निम्हान्सचे कौतुक केले.
राष्ट्रपती म्हणाल्या की, निरोगी मन हा निरोगी समाजाचा पाया आहे. ज्ञान आणि बुद्धीसह सहानुभूती आणि दयाळूपणा डॉक्टर आणि इतर मानसिक आरोग्य तज्ञांना सर्व परिस्थितीत उच्च दर्जाची काळजी प्रदान करण्यासाठी मार्गदर्शक ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Matribhumi Samachar Marathi

