Monday, December 08 2025 | 12:55:55 AM
Breaking News

भारत आणि रशिया यांच्यातील मजबूत आणि काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली मैत्री हे जगासाठी सहकार्य आणि मुत्सद्देगिरीचे अनुकरणीय असे झळाळते उदाहरण आहे : लोकसभा अध्यक्ष

Connect us on:

नवी दिल्‍ली, 3 फेब्रुवारी 2025. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सांगितले की, भारत आणि रशिया यांच्यातील मजबूत आणि  काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली मैत्री हे जगासाठी सहकार्य आणि मुत्सद्देगिरीचे अनुकरणीय असे एक झळाळते  उदाहरण आहे.

दोन्ही देशांमधील ऐतिहासिक आणि खोलवर रुजलेली मैत्री अधोरेखित करत त्यांनी नमूद केले की, जागतिक स्तरावर भारत-रशिया द्विपक्षीय संबंध अतिशय खास मानले जातात. दोन्ही देशांमध्ये अनेक शतके जुने संबंध आहेत आणि रशिया हा स्वातंत्र्यापासून भारताचा सर्वात जवळचा मित्र असल्याचे त्यांनी सांगितले.

रशियन महासंघाच्या  फेडरल असेंब्लीच्या स्टेट ड्यूमाचे अध्यक्ष  व्याकेस्लाव वोलोदिन यांच्या नेतृत्वाखाली रशियाच्या एका संसदीय शिष्टमंडळाने आज संसद भवनाला दिलेल्या भेटीदरम्यान  बिर्ला यांनी हे नमूद केले.

2024 मध्ये ब्रिक्सचे अध्यक्षपद यशस्वीपणे भूषवल्याबद्दल त्यांनी रशियाचे अभिनंदन केले आणि 2024 मध्ये सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या ब्रिक्स  संसदीय शिखर परिषदेत सहभागी झाल्याची आठवण सांगत  बिर्ला यांनी संसदीय प्रक्रिया मजबूत करण्यासाठी आणि संबंध अधिक दृढ करण्यासाठी अशी देवाणघेवाण आवश्यक असल्याचे महत्त्व अधोरेखित केले.

रशियन शिष्टमंडळाने लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज पाहिले, यामुळे त्यांना भारतात लोकशाही पद्धतीने कामकाज कसे चालते याची माहिती मिळाली, हे पाहून लोकसभा अध्यक्षांना आनंद झाला.

बिर्ला यांनी भारताच्या संसदीय समिती प्रणालीबाबतही माहिती दिली. बिर्ला यांनी या संसदीय समितीचे “मिनी-पार्लमेंट” असे वर्णन केले तसेच संसदेच्या या लघु स्वरुपात अर्थसंकल्पीय बाबी आणि प्रमुख मुद्द्यांवर तपशीलवार विचार केला जात असल्याचे सांगितले. या समित्या नि:पक्षपाती पद्धतीने काम करतात, त्यामुळे वेळेची मर्यादा आणि विस्तृत व्याप्तीमुळे मोठ्या सभागृहात ज्या मुद्द्यांवर अनेकदा मर्यादित स्वरूपात चर्चा होतात, त्या मुद्यांवर समित्यांमध्ये तपशीलवार चर्चा करणे शक्य होते, यावर त्यांनी भर दिला.

प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून भारताच्या 75 वर्षांच्या प्रवासाचा संदर्भ देत बिर्ला यांनी स्वातंत्र्यानंतरच्या देशाच्या वाटचालीचा आणि सर्व नागरिकांना समानता मिळवून देण्यासाठी संविधानाच्या संस्थापकांच्या दूरदर्शी प्रयत्न उपस्थितांसमोर मांडला. बिर्ला यांनी भेटीवर आलेल्या या शिष्टमंडळाला संवैधानिक मूल्यांना बळकटी देण्यासाठी भारताने केलेल्या प्रगतीबाबत माहिती दिली.

आपल्या शिष्टमंडळाचे सहर्ष स्वागत केल्याबद्दल व्याचेस्लाव वोलोदिन यांनी बिर्ला यांचे आभार मानले. भारतासारख्या बहुपक्षीय लोकशाही असलेल्या देशातील संसदीय कामकाज पाहणे हा  एक उत्तम अनुभव होता, असे वोलोदिन  म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील घनिष्ठ संबंधांमुळे दृढ होत असलेल्या भारत-रशिया यांच्यातील दीर्घकालीन भागीदारीचे त्यांनी कौतुक केले. भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्षाबद्दल भारताचे अभिनंदन करताना वोलोदिन   यांनी भारताच्या उल्लेखनीय आर्थिक वाढीचे कौतुक केले आणि गेल्या 75 वर्षात जागतिक शक्ती म्हणून भारताच्या उदयाची प्रशंसा केली. भारत आणि रशियामधील नागरिकांचे परस्पर मजबूत संबंध अधोरेखित करत भारत-रशिया मैत्री नवीन क्षितिजांवर पोहोचेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

About Matribhumi Samachar

Check Also

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन

महामहीम, माझे मित्र राष्ट्रपती पुतीन दोन्ही देशांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे सहकारी नमस्कार! “दोबरी देन”! आज भारत …