नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2025. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत भारताच्या कोळसा क्षेत्राने नवनवीन मापदंड स्थापन करणे कायम ठेवले आहे.
आर्थिक वर्ष 2024-25 साठी जानेवारी 2025 पर्यंत कॅप्टिव्ह (सरकारी कंपन्यांच्या ताब्यातील) आणि व्यावसायिक प्रकारच्या खाणींमधील एकूण कोळसा उत्पादनाने 150.25 दशलक्ष टन पर्यंत झेप घेतली असून 27 जानेवारी 2025 पर्यंत गेल्या आर्थिक वर्षातील एकूण 147.12 दशलक्ष टन उत्पादनाला मागे टाकले आहे. हे उद्दिष्ट निर्धारित वेळेच्या 64 दिवस आधीच पूर्ण केले आहे. या कामगिरीमुळे जानेवारी 2024 अखेरच्या 112.08 दशलक्ष टन उत्पादनापेक्षा 34.05% वार्षिक वाढ नोंदवून भारतीय कोळसा क्षेत्राने आपली लवचिकता आणि वेगवान प्रगती अधोरेखित केली आहे.
याचप्रमाणे कोळशाच्या वाहतुकीने देखील यशस्वी पायंडा कायम राखला असून चालू आर्थिक वर्षातील एकूण कोळसा वाहतूक 11 जानेवारी 2025 पर्यंत 154.61 दशलक्ष टनापर्यंत पोहोचली आहे आणि तिने गेल्या आर्थिक वर्षातील एकूण 142.79 दशलक्ष टन कोळसा वाहतुकीचा आकडा मागे टाकला आहे. या आकडेवारीतून कोळसा वाहतुकीत जानेवारी 2024 पर्यंत 33.75% इतकी वाढ झाल्याचे दिसून येते. म्हणजेच ऊर्जा, पोलाद आणि सिमेंट यांसारख्या प्रमुख उद्योगांना सातत्यपूर्ण आणि अखंडित कोळसा पुरवठा सुरु असल्याचे हे द्योतक आहे.
कोळसा उत्पादनाने जानेवारी 2025 मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक 19.20 दशलक्ष टन उत्पादनाचा उच्चांक गाठला असून कॅप्टिव्ह आणि व्यावसायिक खाणींमधील कोळसा उत्पादनाचे हे आतापर्यंतचे सर्वाधिक मासिक उत्पादन आहे. या कामगिरीने जानेवारी 2024 च्या 14.42 दशलक्ष टन उत्पादनाला मागे टाकत गेल्या वर्षीच्या तुलनेत 32.45% वार्षिक वाढ नोंदवून उद्योगधंद्यांच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त केला आहे.
हे क्षेत्र नेहमीच स्वयंपूर्ण आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात एक महत्वपूर्ण भूमिका बजावत आले आहे.
Matribhumi Samachar Marathi

