नागपूर, 3 डिसेंबर 2025
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने 102 वर्षांमध्ये प्रथमच महिला कुलगुरूंची नियुक्ती करून नवा ऐतिहासिक अध्याय लिहिला आहे. डॉ. मीनाली मकरंद क्षीरसागर यांनी बुधवारी प्रभारी कुलगुरु डॉ. माधवी खोडे-चावरे यांच्याकडून या पदाचा कार्यभार स्वीकारला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी कठोर निवड प्रक्रियेनंतर त्यांची या पदावर नियुक्ती केली होती. पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. क्षीरसागर यांनी जमनालाल बजाज प्रशासकीय इमारतीत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. नागपूर विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी डॉ. क्षीरसागर यांनी संगणक विज्ञान शाखेत पीएच.डी. केली आहे आणि नागपूरच्या शिक्षण क्षेत्रात विविध शैक्षणिक पदांवर काम करण्याचा त्यांना सुमारे दोन दशकांचा अनुभव आहे.

विद्यापीठाच्या इतिहासातील पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नियुक्ती झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना डॉ. क्षीरसागर यांनी नमूद केले की त्यांची नियुक्ती, महिला सक्षमीकरण आणि समान संधी, यासाठीची सरकारची अतूट वचनबद्धता दर्शवते. विद्यापीठाने नेहमीच लिंगभेद मुक्त संस्कृतीचे समर्थन केले आहे, यावर त्यांनी भर दिला. नागपूर विद्यापीठाचे माजी विद्यार्थी म्हणून संस्थेच्या सर्वोच्च शैक्षणिक पदावर सेवा करणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे त्या म्हणाल्या.
2N7C.jpeg)
विद्यापीठाबाबतच्या आपल्या दृष्टिकोनाची रूपरेषा मांडताना, डॉ. क्षीरसागर यांनी अधोरेखित केले की, शैक्षणिक आणि प्रशासकीय व्यवस्था मजबूत करणे ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता असेल. अशा सुधारणांमुळे विद्यापीठाची एनआयआरएफ क्रमवारी उंचवण्यास सहाय्य मिळेल, आणि जागतिक क्रमवारीची आकांक्षा बाळगण्यासाठी ते सक्षम बनेल असे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय शिक्षण धोरणा (एनईपी) अंतर्गत, विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढवण्यासाठी आणि विकसित होत असलेल्या औद्योगिक आणि सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि इतर उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये नव्या युगाचे अभ्यासक्रम सुरू करण्याची विद्यापीठाची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्याच्या आव्हानांचा सामना करताना परीक्षेचे वेळापत्रक, रिक्त पदे आणि विद्यापीठाच्या भूमी संसाधनांचा जास्तीत जास्त वापर यासंबंधीच्या मुद्द्यांचा पद्धतशीरपणे आढावा घेतला जाईल, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या नियुक्तीचे शैक्षणिक क्षेत्रामध्ये जोरदार स्वागत झाले आहे.
Matribhumi Samachar Marathi

