नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2025. भारत- चीन सीमेवरच्या परिस्थितीबद्दल लष्करप्रमुखांनी केलेल्या निवेदनावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याबद्दल 4 फेब्रुवारी 2025 रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट केले आहे.
लष्करप्रमुखांची निरीक्षणे, सीमेवर दोन्ही देशांद्वारे घातल्या जाणाऱ्या पारंपरिक गस्तीमध्ये आलेल्या तात्पुरत्या अडथळ्यांविषयी होती, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. अलीकडेच सैन्य माघारीच्या प्रयत्नांनंतर गस्त पद्धत पुन्हा पारंपरिक स्वरूपात अमलात आणल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. हा तपशील याआधी संसदेत विशद करण्यात आला आहे.
लष्करप्रमुखांच्या नावावर संसदेतल्या चर्चेत खपवलेले शब्द त्यांनी कधीही उच्चारलेले नाहीत असे त्यांनी पुढे म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोष्टीविषयी बोलताना अचूकता आणि जबाबदारीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
प्रादेशिक वादाचा विचार करता 1962 च्या युद्धापासून अक्साई चीनमधील 38,000 चौरस किलोमीटरची भारतीय भूमी चीनच्या नियंत्रणाखाली आहे. त्याबरोबर 1963 मध्ये पाकिस्तानने चीनकडे 5,180 चौरस किलोमीटरची भूमी स्वाधीन केली होती. ही ऐतिहासिक तथ्ये भारताच्या प्रादेशिक चर्चेचा अविभाज्य भाग आहेत, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
Matribhumi Samachar Marathi

