Sunday, December 07 2025 | 08:29:45 PM
Breaking News

पीयूष गोयल भूषविणार ‘भारत-इटली संयुक्त आर्थिक सहकार्य आयोगाच्या’(जेसीईसी) 22 व्या सत्राचे सह-अध्यक्षपद

Connect us on:

नवी दिल्ली, 4 जून 2025

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज आपल्या इटलीच्या अधिकृत दौऱ्याची सुरुवात केली. भारत-फ्रान्स आर्थिक सहकार्य वाढविण्यावर लक्ष केंद्रित करून आयोजित करण्यात आलेल्या फ्रान्समधील त्यांच्या विविध कार्यक्रमांच्या समाप्तीनंतर गोयल 4 आणि 5 जून 2025 अशा दोन दिवसांच्या इटली दौऱ्यावर असतील. गोयल यांचा इटली दौरा प्रमुख युरोपीय भागीदारांसोबत धोरणात्मक आणि आर्थिक संबंध वाढवण्याच्या तसेच इटलीसोबत द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य वाढवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो.

या भेटीदरम्यान, केंद्रीय मंत्री गोयल भारत-इटली संयुक्त आर्थिक सहकार्य आयोगाच्या (जेसीईसी) 22 व्या सत्राचे सह-अध्यक्षपद इटलीचे उपपंतप्रधान तसेच परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री अँटोनियो ताजानी यांच्या बरोबर संयुक्तरित्या भूषवतील.

भारत-इटली संयुक्त धोरणात्मक कृती योजना (जेएसएपी) 2025-2029 च्या प्रारंभानंतर, भारत-इटली द्विपक्षीय संबंधांमधील एका निर्णायक टप्प्याच्या संदर्भात हा कार्यक्रम होत आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये रिओ डी जानेरो येथे झालेल्या जी-20 शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील बैठकीनंतर जाहीर करण्यात आलेली भारत-इटली संयुक्त धोरणात्मक कृती योजना ही दहा विषयगत स्तंभांवर आधारित असून आर्थिक सहकार्य हा या योजनेचा केंद्रबिंदू आहे.

रोममधील ‘भारत-इटली संयुक्त आर्थिक सहकार्य आयोगाच्या’ 22 व्या सत्रात दोन्ही देशांना प्रगतीचे मूल्यांकन करण्याची तसेच उद्योग 4.0, कृषी तंत्रज्ञान, डिजिटलायझेशन, ऊर्जा संक्रमण, शाश्वत गतिशीलता आणि भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर (आयएमईसी) सारख्या उच्च-प्रभावी क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी नवीन मार्ग ओळखण्याची संधी मिळणार आहे. या चर्चासत्रांमुळे द्विपक्षीय आर्थिक संपर्क आणखी मजबूत होईल आणि धोरणात्मक औद्योगिक भागीदारी वाढेल अशी अपेक्षा आहे.

ब्रेशिया येथील भारत-इटली ग्रोथ फोरममध्ये उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचे नेतृत्व देखील केंद्रीय मंत्री करणार आहेत. हा फोरम दोन्ही देशांमधील प्रमुख उद्योग आणि हितसंबंधींना एकत्र आणून गुंतवणूकीला प्रोत्साहन देईल, व्यवसाय-ते-व्यवसाय संबंध निर्माण करेल तसेच नवोन्मेष आणि शाश्वततेशी संबंधित क्षेत्रांमध्ये समन्वय साधण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

केंद्रीय मंत्र्यांची ही भेट भारत आणि त्याच्या युरोपियन भागीदारांमधील वाढती राजकीय इच्छाशक्ती आणि एकत्रित आर्थिक आकांक्षा प्रतिबिंबित करते. सामायिक नेतृत्व दृष्टिकोनाचे रूपांतर सर्वसमावेशक वाढ, औद्योगिक परिवर्तन आणि जागतिक आर्थिक लवचिकता वाढवणाऱ्या टिकाऊ भागीदारीत करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

इंडिगो सेवा व्यत्ययावर नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाची कारवाई – प्रवाशांना परतफेड संरक्षण

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने इंडिगोला सर्व प्रवाशांचे तिकिटांचे प्रलंबित पैसे विनाविलंब परत देण्याचे निर्देश दिले …