भारतीय टपाल खात्याच्या मुंबई विभागाने आपल्या सेवा वितरणाचे जाळे आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने आज एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत टपाल वितरणासाठी 200 इलेक्ट्रिक टू व्हिलर्सचा शुभारंभ केला. पार्सलच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून शहरात वितरण सेवा अधिक उत्कृष्ट करण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
मुंबईत चकाला एम आय डी सी भागातील टपाल कार्यालयात आज प्रायोगिक तत्त्वावर या उपक्रमाची सुरुवात झाली, यावेळी महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग; भारतीय टपाल विभागाच्या, मुंबई प्रदेशाच्या टपाल सेवा संचालक कैया अरोरा आणि केआय मोबिलिटी सोल्युशन्सच्या मायटीव्हीएसचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भारतीय टपाल विभाग आणि केआय मोबिलिटी सोल्युशन्सच्या मायटीव्हीएसने संयुक्तपणे ही वाहने तैनात केली आहेत. या अंतर्गत पोस्टमन आणि पोस्टवूमन, चकाला, मुंबई जीपीओ, सायन, दादर आणि काळबादेवी येथील नव्याने स्थापन झालेल्या स्वतंत्र वितरण केंद्रांमध्ये या नवीन इलेक्ट्रिक टू व्हिलर्सचा वापर करुन सेवा देतील.
टपाल पत्रे, नोंदणीकृत/जबाबदार वस्तू, तसेच पार्सल अशा सर्व प्रकारची टपालसेवा —आता या इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे. सुरळीत, ऊर्जा-कार्यक्षम आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल सेवा सुनिश्चित करण्याच्या हेतूने टपाल कार्यालयांच्या परिसरातच समर्पित चार्जिंग स्टेशन्सची व्यवस्था केली जाणार आहे.

अशा प्रकारच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमांमधून शाश्वतता, कार्यक्षमता आणि शेवटच्या घटकापर्यंत सुधारित स्वरूपातील सेवा पोहोचवण्याची भारतीय टपाल विभागाची बांधिलकी दिसून येते.

Matribhumi Samachar Marathi

