मुंबई, 5 ऑगस्ट 2025 . मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयात 2 आणि 3 ऑगस्ट रोजी भारतातील नॅशनल कॅन्सर ग्रीडची (एनसीजी) 2025 ची वार्षिक बैठक पार पडली. एनसीजी हे भारत आणि इतर 15 देशांमधील 380 हून अधिक कर्करोग केंद्रे, संशोधन संस्था, रुग्ण गट आणि व्यावसायिक संस्थांचे सहयोगी नेटवर्क आहे. भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागा (डीएई) द्वारे अर्थसहाय्य लाभलेल्या एनसीजी सदस्य संस्था दरवर्षी कर्करोगाच्या 860,000 पेक्षा जास्त नवीन रूग्णांवर उपचार करतात, जे भारतातील कर्करोगाच्या एकूण रूग्णांच्या 60% इतके आहे. या बैठकीने एनसीजीच्या उपक्रमांची व्याप्ती दर्शवण्यासाठी, प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि भविष्यातील सहयोगी प्रयत्नांची प्रयत्नांची दिशा ठरवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले.
या वार्षिक बैठकीला 300 हून अधिक कर्करोग केंद्रांचे संचालक आणि व्यावसायिक, संशोधक, धोरणकर्ते, स्वयंसेवी संस्था आणि रुग्ण समर्थक उपस्थित होते. या बैठकीची विविध उद्दिष्टे होती, ज्यामध्ये एनसीजीच्या अनेक उपक्रमांवर प्रकाश टाकण्यात आला आणि भविष्यातील उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणारी विचारमंथन सत्रे पार पडली. सदस्य संस्थांना विविध राष्ट्रीय कर्करोग ग्रीडच्या उपक्रमांची माहिती घेण्याची आणि प्रकल्पांतर्गत कर्करोग नियंत्रणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी प्रदान करणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. कर्करोग व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय कर्करोग ग्रीड मार्गदर्शक तत्त्वांचे पुनरावलोकन, गुणवत्ता हमी आणि गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम, किफायतशीर कर्करोग संशोधन आणि कर्करोग उपचारात डिजिटल आणि एआय साधनांचा वापर या विषयांवर बैठकीत चर्चा झाली. कर्करोगाच्या उपचारांचा खर्च कमी करण्यासाठी, फार्मा कंपन्यांकडून कर्करोगावरील औषधांच्या एमआरपीवर सरासरी 85% सूट मिळविण्यासाठी एनसीजीने केलेल्या वाटाघाटी यशस्वी ठरल्या, त्यामुळे कर्करोगाच्या उपचारांचा खर्च लक्षणीय रित्या कमी होईल. याव्यतिरिक्त, या प्रक्रियेमुळे औषधांची उच्च गुणवत्ता सुनिश्चित झाली आणि लहान, दूरवरील रुग्णालयांची पुरवठा साखळी सुरळीत झाली.
या बैठकीला राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी – संयुक्त सचिव ज्योती यादव आणि संचालक (कन्व्हर्जन्स) डॉ. पंकज अरोरा, अभिषेक सिंह, अतिरिक्त सचिव, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, IndiaAI च्या मुख्य कार्यकारी अधिकारी कविता भाटिया, IndiaAI चे सीओ, आणि सर्जन व्हाइस-अॅडमिरल आरती सरीन, आणि सशस्त्र दल वैद्यकीय सेवांमधील सर्जन रिअर अॅडमिरल विवेक हांडे उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय सहभागींमध्ये अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी (एएससीओ) चे अध्यक्ष डॉ. एरिक स्मॉल, एएससीओ च्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्युली ग्रॅलो, वॉल्टर बर्च, डिव्हिजन डायरेक्टर, केअर डिलिव्हरी, एएससीओ, डॉ. सतीश गोपाळ, संचालक, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट सेंटर फॉर ग्लोबल हेल्थ, यूएसए, डॉ. आयझॅक अलाटिस, उपाध्यक्ष (पश्चिम आफ्रिका), आफ्रिकन ऑर्गनायझेशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन आफ्रिका (एओसीटी), आणि सहसंस्थापक, आफ्रिकन रिसर्च ग्रुप इन ऑन्कोलॉजी (एआरजीओ), नगल्ला कॅल्विन, उपाध्यक्ष (मध्य आफ्रिका), ओओटीआयसी, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 17 देशांतील 30 आंतरराष्ट्रीय नेत्यांचा सहभाग. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 ऑक्टोबर 2024 रोजी व्हिएनतियेन, लाओ लोकशाही प्रजासत्ताक येथे पार पडलेल्या 21व्या आसियान – आग्नेय आशियाई राष्ट्रांचा संघ, भारत शिखर परिषदेमध्ये जाहीर केलेल्या 10-बिंदू कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमुळे हे शक्य झाले. नॅशनल कॅन्सर ग्रीडने जकार्ता येथील आसियान साठीच्या भारतीय मोहीम आणि भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने, आसियान सदस्य राष्ट्रांना या बैठकीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले. यामध्ये 6 आसियान सदस्य राष्ट्रांमधून 14 कर्करोग तज्ज्ञ आणि धोरणकर्ते या बैठकीत सहभागी झाले. ही आसियान आणि भारताद्वारे मंजूर करण्यात आलेल्या पाच अशा वार्षिक सहकार्यांपैकी दुसरी बैठक होती, जी आसियान-भारत निधी अंतर्गत समर्थित आहे. याव्यतिरिक्त {बंगालच्या उपसागरातील बहुखंडी तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य उपक्रम} देशांपैकी 3 देशांतील 9 वरिष्ठ कर्करोग तज्ज्ञ आणि धोरणकर्ते देखील या बैठकीत सहभागी झाले.
नॅशनल कॅन्सर ग्रीडने बैठकीदरम्यान कर्करोग नियंत्रणातील त्यांच्या मोलाच्या योगदानासाठी चार दिग्गजांना एनसीजी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यामध्ये टाटा मेमोरियल सेंटरचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि माजी संचालक प्रा. राजेंद्र बडवे, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, झज्जर येथील रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आणि माजी प्रमुख प्रा. जी. के. राठ, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि माजी प्राध्यापक डॉ. सुरेश अडवाणी तसेच एएससीओचे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रा. जुली ग्रालो यांचा समावेश होता.
2025 ची एनसीजी वार्षिक बैठक ही ग्रीडच्या सर्वसमावेशक, उच्च-गुणवत्तेच्या आणि परवडणाऱ्या कर्करोग उपचारांवरील वचनबद्धतेची पुनःपुष्टी होती. ही केवळ भारतातच नव्हे तर अशाच आव्हानांना तोंड देणाऱ्या जागतिक भागांमध्येही कार्यरत आहे. तसेच या बैठकीने कर्करोग नियंत्रणात आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करण्यात भारताच्या नेतृत्वाला अधोरेखित केले आणि आगामी वर्षांमध्ये आणखी सखोल बहुपक्षीय सहभागाची पायाभरणी केली.

Matribhumi Samachar Marathi

