Saturday, January 03 2026 | 08:42:01 AM
Breaking News

फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांचे माध्यमांसाठी निवेदन

Connect us on:

महामहीम, राष्ट्राध्यक्ष महोदय,

दोन्ही देशांचे प्रतिनिधी,

माध्यम प्रतिनिधी,

नमस्कार!

मबू-हाय!

सर्वप्रथम मी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो. या वर्षी भारत आणि फिलिपिन्स आपल्यातील राजनैतिक संबंधांचे पंचाहत्तरवे वर्ष साजरे करत आहेत. आणि या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा ठरतो. आमच्यातील राजनैतिक संबध नवीन असले, तरी आमच्या संस्कृतींमधील संपर्क फार प्राचीन काळापासूनचा आहे. फिलीपिन्सचे रामायण – “महाराडिया लावना” – हे आमच्यातील शतकानुशतके जुन्या सांस्कृतिक संबंधांचे जिवंत उदाहरण आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्रीय फुलांचे चित्र असलेले नुकतेच जारी केलेले टपाल तिकिट आमच्यातील मैत्रीचा सुगंध पसरवत आहे.

मित्रहो,

प्रत्येक स्तरावर संवाद, प्रत्येक क्षेत्रात सहकार्य हे आमच्यातील संबंधांचे दीर्घ काळापासूनचे वैशिष्ट्य राहिले आहे. आज राष्ट्राध्यक्ष आणि मी परस्पर सहकार्य, प्रादेशिक मुद्दे आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती या क्षेत्रांवर सविस्तर चर्चा केली. आज आम्ही आमच्या संबंधांना धोरणात्मक भागीदारीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे, ही आनंदाची बाब आहे. या भागीदारीच्या क्षमतेचे परिणामांमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वसमावेशक कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे.

आमचा द्विपक्षीय व्यापार सातत्याने वाढत आहे. आणि तीन अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. ते अधिक बळकट करण्यासाठी भारत-आसियान मुक्त व्यापार कराराचा आढावा लवकरात लवकर पूर्ण करण्याला आमचे प्राधान्य आहे. तसेच, आम्ही द्विपक्षीय प्राधान्य व्यापार करारासाठी काम करण्याचा निर्णयही घेतला आहे.

आमच्या कंपन्या माहिती आणि डिजिटल तंत्रज्ञान, आरोग्य, ऑटोमोबाईल्स, पायाभूत सुविधा, खनिजे अशा प्रत्येक क्षेत्रात सक्रीयपणे काम करत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात व्हायरॉलॉजीपासून एआय आणि एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगपर्यंत संयुक्त संशोधन सुरू आहे. आज संपन्न झालेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्य योजनेमुळे याला आणखी चालना मिळेल.

वाराणसी येथील आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे प्रादेशिक केंद्र अति-कमी ग्लायसेमिक निर्देशांक असलेल्या तांदळावर काम करत आहे. म्हणजेच आम्ही चव आणि आरोग्य या दोन्हींवर एकत्रितपणे काम करत आहोत! मला हे सांगताना आनंद वाटत आहे की विकास भागीदारी अंतर्गत, आम्ही फिलिपिन्समध्ये जलद परिणाम प्रकल्पांची संख्या वाढवू. आणि, फिलिपिन्समध्ये सार्वभौम डेटा क्लाउड पायाभूत सुविधांच्या विकासाला देखील समर्थन देऊ.

आपली भागीदारी केवळ जमिनीपुरती मर्यादित नाही राहिली, आता ती आकाशालाही गवसणी घालत आहे. म्हणूनच अंतराळ क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी आज एक महत्त्वाचा करार करण्यात आला आहे.

मित्रांनो,

भारत आणि फिलिपिन्स यांच्यातील दृढ होत असलेले संरक्षण संबंध हे परस्पर विश्वासाचे प्रतीक आहेत.

सागरी राष्ट्रांमुळे भारत आणि फिलिपिन्स यांच्यातील सागरी सहकार्य हे नैसर्गिक असून अत्यावश्यकही आहे. तसेच मानवतावादी मदत, आपत्ती निवारण, तसेच शोध व बचाव मोहिमांमध्ये दोन्ही देशांनी सातत्याने एकत्र काम केले आहे.

सध्या फिलिपिन्सचे राष्ट्रपती महोदय भारताच्या दौऱ्यावर असताना, भारतीय नौदलाची तीन जहाजे प्रथमच फिलिपिन्समध्ये होत असलेल्या नौसैनिक सरावात सहभागी होत आहेत. भारताचे हायड्रोग्राफी जहाज देखील या सरावात सहभागी झाले आहे.

हिंद महासागर क्षेत्रासाठी भारतात स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय फ्युजन केंद्राशी जोडले जाण्याच्या निर्णयाबद्दल, आम्ही फिलिपिन्सचे मन:पूर्वक स्वागत करतो.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केल्याबद्दल आणि दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढ्यात ठामपणे सोबत उभे राहिल्याबद्दल, आम्ही फिलिपिन्स सरकार आणि राष्ट्रपती महोदयांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो.

परस्पर कायदेशीर सहाय्य ( म्युच्युअल लीगल असिस्टन्स)

आणि गुन्हेगारी प्रकरणात दोषी ठरवलेल्यांच्या हस्तांतरणा संदर्भातील आज झालेल्या करारांमुळे, आपल्या सुरक्षा भागीदारीला अधिक बळ मिळणार आहे.

मित्रांनो,

भारतीय पर्यटकांना व्हिसा-फ्री प्रवेश देण्याच्या फिलिपिन्स सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. भारतानेही फिलिपिन्सच्या पर्यटकांसाठी मोफत ई-व्हिसा सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या वर्षात दिल्ली आणि मनिला दरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे. त्याचबरोवर आज पार पडलेल्या संस्कृती आदान-प्रदान कार्यक्रमामुळे दोन्ही देशांतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांना अधिक बळकटी मिळेल.

मित्रांनो,

भारताच्या अॅक्ट ईस्ट पॉलिसी आणि “महासागर” व्हिजन मध्ये फिलिपिन्स हा एक महत्त्वपूर्ण भागीदार आहे.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांती, सुरक्षा, समृद्धी आणि नियमाधारित जागतिक व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. त्याचबरोवर भारत आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत सागरी मार्गातील स्वातंत्र्य याला ठाम पाठिंबा देतो. तसेच पुढील वर्षी फिलिपिन्स आसियानचे अध्यक्षपद भूषवणार आहे. या अध्यक्षतेच्या कालावधीतील यशासाठी भारताकडून पूर्ण सहकार्य दिले जाईल.

महामहीम,

भारत आणि फिलिपिन्स ही मित्रत्वाने जोडलेली राष्ट्रे आहेत, आणि नियतीने एकत्र आणलेले भागीदार आहेत. हिंद महासागरापासून ते पॅसिफिकपर्यंत, आपल्याला एकत्र बांधणाऱ्या सामायिक मूल्यांमुळे आपली मैत्री दृढ आहे. हे केवळ भूतकाळाचे मैत्र नाही, तर भविष्यासाठी एक वचन आहे.

मरामिंग सलामत पो !

About Matribhumi Samachar

Check Also

1 जानेवारी 2026 पासून भारत स्विकारणार ‘किंबर्ले प्रोसेस’ या यंत्रणेचे प्रतिष्ठित अध्यक्षपद

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2025. ‘किंबर्ले प्रोसेस’ च्या (KP – जगभरातील कच्च्या हिऱ्यांचा व्यापार सुरक्षित व …