नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025
एअरो इंडिया 2025 या आशियातील सर्वात मोठ्या एअरो शोच्या 15 व्या आवृत्तीचे 10 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान कर्नाटकातील बेंगळुरूमधील येलहांका हवी तळ येथे आयोजन होणार आहे. “द रनवे टू बिलियन ऑपॉर्च्युनिटीज” अशी भव्य संकल्पना असलेला हा कार्यक्रम परदेशी आणि भारतीय कंपन्यांमधील भागीदारीला चालना देण्यासाठी आणि स्वदेशीकरणाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी जागतिक मूल्य साखळीतील नवीन दालने शोधण्याचा एक मंच उपलब्ध करेल. या कार्यक्रमातील पहिले तीन दिवस(10,11 आणि 12) व्यवसाय संबंधित असतील तर 13 आणि 14 तारखेला सर्वसामान्य जनतेला हा शो पाहण्याची संधी मिळेल. या कार्यक्रमात हवाई प्रात्यक्षिके आणि हवाई क्षेत्रातील व्यापक संरक्षण मंचाचे एका जागी मांडलेले प्रदर्शन या दोन्ही प्रदर्शनांचा समावेश असेल. या कार्यक्रमाचे पूर्वावलोकन, उद्घाटन समारंभ, संरक्षण मंत्र्यांचा परिसंवाद, सीईओंची गोलमेज चर्चा, मंथन स्टार्ट-अप कार्यक्रम, श्वास रोखून धरायला लावणारी हवाई प्रात्यक्षिके, इंडिया पॅव्हेलियनचा समावेश असलेले एक विशाल प्रदर्शन स्थळ आणि एरोस्पेस कंपन्यांचा व्यापार मेळा असा भरगच्च उपक्रमांचा समावेश असलेला हा कार्यक्रम आहे.
मित्र देशांसोबत संरक्षणविषयक धोरणात्मक भागीदारी संदर्भात संवाद निर्माण करण्यासाठी, ‘BRIDGE – बिल्डिंग रेझिलिअन्स थ्रू इंटरनॅशनल डिफेन्स अँड ग्लोबल एन्गेजमेंट’ या विषयावर एका परिसंवादाचे यजमानपद देखील भारत भूषवणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संरक्षणमंत्री, संरक्षण राज्यमंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ स्तरावर विविध द्विपक्षीय बैठकांचे देखील नियोजन करण्यात आले आहे. मित्र देशांसोबतची भागीदारी पुढील स्तरावर नेण्यासाठी नव्या दालनांचा शोध घेऊन त्यांच्यासोबतच्या संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील संबंधांना बळकटी देण्यावर यामध्ये भर देण्यात येईल.
Matribhumi Samachar Marathi

