सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेतील, झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी विमानतळ आयुक्तालय इथे दि. 5 जुलै रोजी केलेल्या केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये प्रवाशांकडून तस्करी केला जात असलेला 11 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा अवैध मुद्देमाल जप्त केला. या अंतर्गत पहिल्या प्रकरणातून 9.662 किलोग्रॅम वजनाचा, 9.662 कोटी रुपये किमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड) जप्त करण्यात आला. तसेच दुसऱ्या प्रकरणात वन्यजीव (जिवंत आणि मृत प्राणी) जप्त करण्यात आले. यात 1 रॅकून (1 जिवंत, 3 मृत), 3 काळ्या खारी (ब्लॅक फॉक्स स्क्विरल) (मृत) आणि 29 जिवंत तसेच 8 मृत हिरवे सरडे (ग्रीन इग्वाना) यांचा समावेश होता. या व्यतिरिक्त तिसऱ्या प्रकरणात 1.650 किलोग्रॅम वजनाचे, 1.49 कोटी रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले. या प्रकरणांमध्ये अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act), वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 आणि 1985 तसेच सीमाशुल्क कायदा 1962 नुसार कार्यवाही केली गेली, या सर्व प्रकरणांमध्ये मिळून 4 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
कारवाई केलेल्या प्रकरणांबद्दलची ठळक माहिती (05.07.2025):
प्रकरण 1 – सीमाशुल्क विभागाच्या मुंबई झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर, बँकॉकहून मुंबईत आलेल्या एका भारतीय नागरिकाची तपासणी केली. या प्रवाशाच्या सामानाची आणि वैयक्तिक झडती घेतली असता, त्याच्याकडे 9662 ग्रॅम वजनाचा (अंदाजे बाजार मूल्य 9.662 कोटी रुपये) गांजा (हायड्रोपोनिक वीड) जप्त करण्यात आला. हा गांजा प्रवाशाने स्वतःसोबत आणलेल्या सामानात लपवण्यात आला होता. अमली पदार्थ विरोधी कायद्यातील (NDPS Act) तरतुदीनुसार या प्रवाशाकडे आढळलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
प्रकरण 2 – मुंबई सीमाशुल्क, झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे प्रवाशांविषयी असलेल्या माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे असलेल्या सामानात वन्यजीव (जिवंत आणि मृत प्राणी) आढळून आले. जप्त केलेल्या या वन्य जीवांमध्ये 1 रॅकून (1 जिवंत, 3 मृत), 3 काळ्या खारी (ब्लॅक फॉक्स स्क्विरल) (मृत) आणि 29 जिवंत तसेच 8 मृत हिरवे सरडे (ग्रीन इग्वाना) यांचा समावेश होता. जप्त केलेले प्राणी हे भारतातील स्थानिक प्रजातीचे नसल्यामुळे, त्यांच्या जीविताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने हे सर्व प्राणी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देऊन, त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ देशात पाठवले गेले. या प्रवाशांविरुद्ध सीमा शुल्क अधिनियम, 1962 आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 मधील तरतुदींनुसार कार्यवाही करण्यात आली. याप्रकरणी एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
प्रकरण 3 – मुंबई सीमाशुल्क, झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे प्रवाशांविषयी असलेल्या माहितीच्या आधारे दुबईहून मुंबईत आलेल्या 2 प्रवाशांची तपासणी केली. त्यांच्याकडे तस्करी केले जात असलेले आणि मेणाने झाकून ठेवलेले एकूण 1.650 किलोग्रॅम वजनाचे आणि 1.49 कोटी रुपये मूल्याचे, भुकटीच्या स्वरूपातील (Gold Dust) तसेच तुकड्यांच्या स्वरुपातील 24 कॅरेट सोने आढळले. हे प्रवासी शरीरात (body cavity) तसेच खिशात लपवून या सोन्याची तस्करी करत होते. या प्रकरणी सीमाशुल्क अधिनियम, 1962 अंतर्गत कार्यवाही केली असून, 2 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
Matribhumi Samachar Marathi

