Thursday, January 29 2026 | 04:23:10 PM
Breaking News

नवीन कायद्याद्वारे नागरिकांना जलद व सुलभ न्याय- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा

Connect us on:

अमरावती, 6 ऑगस्ट 2025. नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळण्याकरिता भारत सरकारने लागू केलेल्या नवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांनी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी आज येथे केले.

माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, अमरावती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,  अमरावती, जिल्हा प्रशासन, अमरावती, जिल्हा परिषद, अमरावती, पोलिस आयुक्त कार्यालय, अमरावती, पोलिस अधीक्षक कार्यालय, अमरावती, जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती येथे आयोजित केलेल्या नव्या भारताचे नवे कायदे, भारतीय न्यायसंहिता 2023 या विषयावरील मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

मंचावर पोलिस अधीक्षक विशाल आनंद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्रा, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. एस. वमने, माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सुनिल देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रमुख न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा पुढे बोलतांना म्हणाले की, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरोने हा खूप चांगला उपक्रम राबविला आहे. नवीन कायद्यात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तरतुद करण्यात आल्यामुळे साक्षीदार फितूर होण्याचे प्रकार टाळल्या जातील आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढेल. जुन्या कालबाह्य क्लिष्ट कायद्यातील तरतुदी नवीन कायद्यामुळे सोप्या झाल्या आहेत. या नवीन कायद्यांमध्ये नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळण्याकरिता तरतूद करण्यात आली आहे. नागरीकांनी या प्रदर्शनाला आवर्जुन भेट देऊन नवीन कायदेविषयक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पोलीस अधिक्षक विशाल आनंद म्हणाले, पुर्वीचे कायदे ब्रिटीशांनी तयार केले होते. काळानुसार त्यात बदल होणे आवश्यक होते. कालबाह्य कायदे नष्ट करून तो बदल या नवीन कायद्यात करण्यात आला आहे. या नवीन कायद्यामुळे येणाऱ्या काळात नागरीकांसाठी न्याय मिळविणे, अत्यंत सोपे होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरीक व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन नवीन कायद्याची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी व्यक्त केले.

पोलिस उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले, या नवीन कायद्यात नवीन तंत्रज्ञानाचा समावेश झाल्यामुळे तपासाच्या दृष्टीने पोलीसांना मदत होणार आहे. हा कायदा तपास प्रक्रियेसाठी अत्यंत प्रभावी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सुनील देशमुख म्हणाले, ब्रिटिशकालीन कालबाह्य कायद्यांमध्ये सुधारणा करून भारत सरकारने नवीन कायदे अमलात आणले आहेत. या नवीन कायद्यात खऱ्या गुन्हेगारांना निश्चितपणे शिक्षा होणार आहे. बऱ्याच कायद्यात बदल झाला असल्यामुळे पोलिस विभागाने नवीन कायद्याचा अभ्यास करून त्यादृष्टिकोणातून तपास केल्यास निश्चित फायदा होईल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

प्रास्ताविक भाषणात क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत म्हणाले की, नागरीकांना नवीन कायद्याची माहिती करून देण्याकरिता माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय अमरावती मार्फत दोन दिवसीय मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शन हा उपक्रम राबविला आहे. या प्रदर्शनात नवीन कायदे तसेच बदलण्यात आलेल्या जुन्या कायद्यातील सुधारित नवीन कायदे याबाबत सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. नागरिकांना मिळणाऱ्या कायदेविषयक सल्ला तसेच सुविधांविषयी माहिती देण्यात आली आहे. हे प्रदर्शन 7 ऑगस्ट 2025 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत नागरिकांसाठी निःशुल्क खुले ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन कायदेविषयक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी केले.

संचालन ज्येष्ठ पत्रकार संजय पाखोडे यांनी केले, तर आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. एस. वमने यांनी मानले.

यावेळी कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्री. शेळके, जिल्हा न्यायाधीश श्री. वाघमारे, जिल्हा न्यायाधीश श्री. गोस्वामी, जिल्हा न्यायाधीश श्री. शर्मा, जिल्हा न्यायाधीश श्री. शिंदे, वरिष्ठ स्तर न्यायाधीश श्री. रामटेके, मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. भट्टाचार्य, रायसोनी विद्यालयाच्या डीन मीना नाथ, पंजाबराव देशमुख लॉ कॉलेजचे प्राध्यापक श्री. रामटेके, संदीप वानखेडे प्रमुखपणे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय अमरावतीचे क्षेत्रीय प्रचार सहाय्यक शशिकांत पटेल, एमटीएस सागर लाडोले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक शालीनी मोटे, कर्मचारी सर्वश्री श्री. शेळके, श्री. बनसोड, श्रीमती पाटील, श्रीमती अंजीकर, श्री. खांडेकर, श्री. गजभिये, श्री. शिरभाते, मिलींद लव्हाळे, योगेश इंगोले, श्री. मोईज, कु. दीक्षा यांच्यासह ॲड. श्री. देशमुख, सहायक खान, शेख, इंगळे, श्रीमती ठाकरे व विधी सेवा न्यायरक्षक, अभियोक्त यांनी  परिश्रम घेतले.

About Matribhumi Samachar

Check Also

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील कार्यक्षेत्रातील सुरक्षितता सुधारण्यासाठी सेव्हलाइफ फाउंडेशन आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड अभियंत्यांना प्रशिक्षण देतात

पुणे, जानेवारी 2026 :त्यांच्या सध्या सुरू असलेल्या झिरो फॅटॅलिटी कॉरिडॉर (ZFC) उपक्रमांतर्गत, सेव्हलाइफ फाउंडेशनने २० जानेवारी …