राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) अकादमी, नागपूरने आज मोठ्या उत्साहात आणि सामुदायिक सुरक्षा तसेच आपत्ती सज्जता मजबूत करण्याप्रति दृढ वचनबद्धतेसह नागरी संरक्षण दिन साजरा केला.
एनडीआरएफ अकादमीचे उपमहानिरीक्षक आणि संचालक डॉ. हरि ओम गांधी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कमांडंट मसूद मोहम्मद, कमांडंट पंकज कुमार, अधिकारी, प्रशिक्षक, कर्मचारी आणि सध्या सुरु असलेल्या विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमांमधील सहभागी उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना डॉ. गांधी यांनी भारतातील नागरी संरक्षणाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले आणि राष्ट्रीय लवचिकता, सामुदायिक सज्जता आणि बहु-संस्था समन्वयात विकसित होत असलेल्या त्याच्या भूमिकेवर भर दिला. त्यांनी अधोरेखित केले की समुदायांना सक्षम करण्यात आणि आपत्कालीन परिस्थितीत सरकारी संस्थांना सहाय्य पुरवण्यात नागरी संरक्षण महत्त्वाची भूमिका बजावते.
देशभरातील नागरी संरक्षण संघटनांना निरंतर पाठिंबा देण्याचा एक भाग म्हणून, एनडीआरएफ अकादमीने नागरी संरक्षण स्वयंसेवक आणि हितधारकांसाठी प्रशिक्षण आणि जागरूकता संबंधी व्हिडिओंची मालिका तयार केली आहे. नागरी संरक्षण समुदायाने व्यापक प्रमाणात या व्हिडिओंची प्रशंसा केली असून तळागाळापर्यंत जनजागृती, सज्जता आणि प्रतिसाद क्षमता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे.
कार्यक्रमाचा समारोप करताना सर्व अधिकारी आणि प्रशिक्षणार्थींनी नागरी संरक्षणाची मुख्य मूल्ये – सेवा, शिस्त, तयारी आणि सामुदायिक सुरक्षा कायम राखण्याचा एकत्रितपणे पुनरुच्चार केला. भारताच्या आपत्ती प्रतिसाद क्षमतांना बळकटी देण्यात अकादमीचे अतूट समर्पण याप्रसंगी प्रतिबिंबित झाले.
Matribhumi Samachar Marathi

