Sunday, December 07 2025 | 08:22:12 PM
Breaking News

‘राष्ट्रीय दूरसंवाद अकादमी – वित्त’ या संस्थेत आयोजित ‘विशेष मूलभूत अभ्यासक्रम 2025’ या प्रशिक्षणाच्या समारोप समारंभात केंद्रीय दूरसंवाद राज्यमंत्री डॉ. चंद्रा सेखर पेम्मासनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

Connect us on:

राष्ट्रीय दूरसंवाद अकादमी – वित्त (एनसीए – एफ) या संस्थेच्या 6 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या विशेष मूलभूत अभ्यासक्रम 2025 समारोप समारंभाला केंद्रीय दूरसंवाद आणि ग्राम विकास राज्यमंत्री डॉ. चंद्रा सेखर पेम्मासनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केंद्र सरकारच्या दूरसंवाद विभागाच्या या मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेला सर्वोत्कृष्ट (5 स्टार) दर्जा मिळाला आहे.

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी त्यांनी निवडलेल्या विभागात प्रावीण्य मिळवावे असे आवाहन डॉ. चंद्रा सेखर पेम्मासनी यांनी या कार्यक्रमात बोलताना केले. स्पर्धात्मकतेमुळे सार्वजनिक सेवेतील विश्वासार्हता वाढते असे त्यांनी अधोरेखित केले. आपल्या कर्मधर्माशी प्रामाणिक राहिलेला अधिकारी भ्रष्टाचाराला ठामपणे नकार देऊ शकतो आणि अंतिमतः यशस्वी होऊ शकतो असे त्यांनी सांगितले. स्वत्त्वाची जाणीव असणे महत्त्वाचे असल्याचे सांगून, अहंकार हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे असा सावधगिरीचा सल्ला त्यांनी दिला. आपल्या कृतीचा इतरांवर काय परिणाम होईल याचा विचार करा असे आवाहन त्यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना केले. एकत्रितरित्या काम करण्याचे महत्त्व अधोरेखित करुन ते म्हणाले की तुमच्यापेक्षा चांगले काम करणाऱ्यांशी स्पर्धा करू नका, त्यांच्यासोबत काम करा. सार्वजनिक संस्थांमधील यंत्रणा लवचिक असेल तर त्यांची भरभराट होते. 140 कोटी भारतीय नागरिकांची सेवा करायला मिळणे हे सार्वजनिक सेवेतील सर्वात मोठे भाग्य आहे याची आठवण त्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना करुन दिली.

15 सप्टेंबर ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीत या विशेष मूलभूत अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 2024 मध्ये झालेल्या युपीएससी नागरी सेवा परीक्षेद्वारे निवड झालेले आणि 15 अखिल भारतीय तसेच केंद्रीय नागरी सेवा विभागातील 176 प्रशिक्षणार्थी अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते. मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या अभ्यासक्रमात युवा नागरी सेवा अधिकाऱ्यांना भारताच्या प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीची तोंडओळख करुन देण्यात आली आणि कामासाठी प्रोत्साहन देण्यात आले. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांमध्ये शिस्त, नैतिकता, व्यावसायिकता, सेवाभाव जागृत करण्यासह त्यांना विविध विभागातील कामाचे शिक्षण देणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश होता. प्रशासन, शिक्षण, समाज आणि उद्योग क्षेत्रातील नामवंत वक्ते आणि तज्ज्ञांनी या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना विविध श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आले. सर्वोत्कृष्ट गट, हिमालय अभ्यास दौऱ्यातील सर्वोत्कृष्ट गट, शहरी ग्रामीण संगम कार्यक्रमातील सर्वोत्कृष्ट गट आणि वैयक्तिक पातळीवरील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी अधिकारी, सर्वोत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी आणि सर्वोत्कृष्ट क्रीडापटू या पुरस्कारांचा यात समावेश होता.

About Matribhumi Samachar

Check Also

एनडीआरएफ अकादमी, नागपूरने साजरा केला नागरी संरक्षण दिन

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) अकादमी, नागपूरने आज मोठ्या उत्साहात आणि सामुदायिक सुरक्षा तसेच आपत्ती सज्जता …