नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2025. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित विशेष चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या अत्यंत विशेष प्रसंगी, सामुहिक चर्चेचा मार्ग निवडल्याबद्दल पंतप्रधानांनी सदनातील सर्व सन्माननीय सदस्यांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, त्याग आणि तपश्चर्येचा मार्ग दाखवत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला उर्जा आणि प्रेरणा देणारा वंदे मातरम हा मंत्र आणि हे आवाहन आपण स्मरतो आहोत ही सभागृहातील सर्वांसाठी अत्यंत विशेष बाब आहे.आपल्या देशाला वंदे मातरमची ऐतिहासिक अशी 150 वी वर्षपूर्ती पाहायला मिळते आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे हे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान म्हणाले की हा कालावधी आपल्यासमोर इतिहासातील असंख्य घटना उभ्या करतो.या चर्चेद्वारे सदनाची कटिबद्धता दर्शवण्यासोबतच जर सगळ्यांनी या चर्चेचा चांगला उपयोग करून घेतला तर ही चर्चा भविष्यातील पिढ्यांसाठी शिक्षणाचा स्त्रोत म्हणून देखील काम करू शकते यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की हा असा कालावधी आहे ज्यामध्ये इतिहासातील अनेक प्रेरणादायक अध्याय पुन्हा एकदा आपल्यासमोर उलगडत आहेत. देशाने नुकतीच अत्यंत अभिमानाने आपल्या संविधानाची 75 वर्ष साजरी केली याची ठळकपणे आठवण करून देत ते म्हणाले की, आपला देश सरदार वल्लभभाई पटेल आणि भगवान बिरसा मुंडा या दोन्ही व्यक्तिमत्वांची 150 वी जयंती देखील साजरी करत आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की देशाने अलीकडेच गुरु तेग बहादूर जी यांचा 350वा हुतात्मा दिन साजरा केला.
पंतप्रधान म्हणाले की आज, वंदे मातरम या गीताच्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त, हे सदन, या गीताची सामुहिक उर्जा अनुभवण्याचा प्रयत्न करत आहे. वंदे मातरमच्या 150 वर्षांच्या वाटचालीने अनेक महत्त्वाचे टप्पे पार केले आहेत हे त्यांनी अधिक भर देत सांगितले. वंदे मातरम या गीताने जेव्हा 50 वर्षे पूर्ण केली तेव्हा आपल्या देशाला वसाहतवादी राजवटीखाली जगणे भाग पडले होते, याची आठवण काढत मोदी म्हणाले की जेव्हा या गीताने शंभरी गाठली तेव्हा आपला देश आणीबाणीच्या साखळदंडांनी जखडला होता. वंदे मातरम च्या शतकपूर्ती सोहोळ्याच्या वेळी भारताच्या संविधानाचा गळा घोटण्यात आला होता याकडे त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले. ते पुढे म्हणाले की जेव्हा वंदे मातरम ने 100 वर्षे पूर्ण केली तेव्हा ज्यांनी देशभक्तीसाठी जीवन वेचले त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्याला उर्जा देणाऱ्या या गीताने जेव्हा 100 वर्षे पूर्ण केली तेव्हा दुर्दैवाने आपल्या इतिहासातील काळा अध्याय सुरु होता आणि लोकशाही स्वतःच भयंकर ताणाखाली होती हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
“वंदे मातरमची 150 वी वर्षपूर्ती तो महान अध्याय आणि वैभव पुनर्स्थापित करण्यासाठी आपल्याला एक संधी देत आहे आणि हे सदन तसेच आपला देश यांनी ही संधी वाया घालवता कामा नये,” पंतप्रधान मोदी म्हणाले. 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात वंदे मातरम चा पुढाकार होता आणि त्याच्या आवाहनात स्वातंत्र्य संग्रामाचे भावनिक नेतृत्व मूर्त स्वरुपात साकारले होते हे त्यांनी ठळकपणे नमूद केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की जेव्हा ते वंदे मातरम च्या 150 व्या वर्षपूर्तीची चर्चा सुरु करण्यासाठी सभागृहात उभे राहिले तेव्हा तेथे सत्ताधारी किंवा विरोधी असे कोणतेही विभाजन नव्हते कारण येथे उपस्थित सर्वांसाठी हा खरोखरीच वंदे मातरम गीताचे ऋण मान्य करण्याचा प्रसंग होता आणि या गीताने स्वातंत्र्यचळवळ पुढे नेण्यासाठी ध्येय वेड्या नेत्यांना प्रेरणा दिली आणि स्वातंत्र्य मिळवून दिले ज्यामुळे आपण सर्वजण या सदनात स्थानापन्न होऊ शकत आहोत. सर्व संसद सदस्य आणि लोकप्रतिनिधींसाठी हे ऋण मान्य करण्याचा हा पवित्र प्रसंग आहे हे त्यांनी ठळकपणे नमूद केले. या प्रेरणेपासून, वंदे मातरमच्या ज्या उर्जेने देशाच्या उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम अशा संपूर्ण भागाला एकत्र आणत स्वातंत्र्याचा लढा दिला तीच उर्जा पुन्हा एकदा आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी पाहिलेली स्वप्ने साकार करण्यासाठी वंदे मातरमच्या 150 वर्षांना आपल्यासाठी प्रेरणेचा आणि उर्जेचा स्त्रोत बनवून पुढे वाटचाल करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.आत्मनिर्भर भारत उभारण्याच्या निश्चयाला दुजोरा देण्यासाठी आणि 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साध्य करण्यासाठी ही एक संधी आहे यावर त्यांनी अधिक भर दिला.
1875 मध्ये बंकिमचंद्र यांच्यापासून वंदे मातरम् या गीताचा प्रवास सुरू होतो ही बाब पंतप्रधानांनी नमूद केली. 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामामुळे ब्रिटिश साम्राज्य हादरले होते आणि त्यांनी भारतावर विविध दबाव आणला आणि अन्याय केला, तसेच इथल्या लोकांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले होते. अशा परिस्थितीत या गीताची रचना करण्यात आली होती, ही बाबही त्यांनी अधोरेखीत केली.
त्या काळी गॉड सेव्ह द क्वीन हे ब्रिटिशांचे राष्ट्रीय गीत भारतातील प्रत्येक घराघरात पोहचवण्याचे कारस्थान रचले जात होते असे त्यांनी सांगितले. नेमक्या त्याच वेळी बंकिम दा यांनी याला आव्हान देत, अधिक जोमाने प्रत्युत्तर दिले आणि त्या आव्हानातूनच वंदे मातरम् चा जन्म झाला अशी माहिती त्यांनी दिली. काही वर्षांनंतर, 1882 मध्ये, जेव्हा बंकिमचंद्र यांनी आनंद मठ ही कादंबरी लिहिली, तेव्हा या गीताचा त्या साहित्यकृतीत अंतर्भाव करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वंदे मातरम् ने हजारो वर्षांपासून भारताच्या नसानसांत भिनलेला विचार पुनरुज्जीवित केला. या गीताच्या मर्मभेदी शब्दांममधून आणि उदात्त भावनेतून अगदी त्याच भावनेची, त्याच मूल्यांची, त्याच संस्कृतीची आणि त्याच परंपरेची राष्ट्राला एक भेट मिळाली, असे त्यांनी अधोरेखित केले. वंदे मातरम् केवळ राजकीय स्वातंत्र्याचा किंवा ब्रिटिशांना हाकलून लावून स्वतःचा मार्ग आखण्याचा मंत्र नव्हता, तर त्याची परिणामकारता त्या ही पलिकडची होती असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यलढा हे मातृभूमीला मुक्त करण्यासाठी, भारत मातेला बंधनातून सोडवण्यासाठी केलेले एक पवित्र युद्ध होते. जर आपण वंदे मातरम् चा आणि त्यातील मूल्यांच्या प्रवाहाचा मागोवा घेतला, तर आपल्याला वैदिक काळापासून चालत आलेले एक सत्य वारंवार दिसून येते, असे त्यांनी नमूद केले. जेव्हा आपण वंदे मातरम् म्हणतो, तेव्हा आपल्याला ही भूमी माझी माता आहे आणि मी तिचा पुत्र आहे या अर्थाच्या वैदिक वचनाचे स्मरण होते असे त्यांनी सांगितले.
याच विचारांचा प्रतिध्वनी प्रभू श्री राम यांनी लंकेच्या वैभवाचा त्याग करताना “जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी” असे उद्गार काढले तेव्हा ऐकायला मिळाला होता. वंदे मातरम् हे याच महान सांस्कृतिक परंपरेचे आधुनिक प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले.
ज्यावेळी बंकिम दा यांनी वंदे मातरम् ची रचना केली, तेव्हा ते अगदी नैसर्गिकपणे स्वातंत्र्य चळवळीचा आवाज बनले. पूर्व ते पश्चिम, उत्तर ते दक्षिण, वंदे मातरम् हा प्रत्येक भारतीयाचा संकल्प बनला होता, ही बाब त्यांनी अधोरेखीत केली.
काही दिवसांपूर्वीच आपण वंदे मातरम् च्या 150 व्या वर्षाच्या प्रारंभानिमित्त बोलताना, वंदे मातरम् मध्ये हजारो वर्षांची सांस्कृतिक ऊर्जा आहे, त्यात स्वातंत्र्याची भावना आहे आणि एका स्वतंत्र भारताचे स्वप्नही आहे असे वक्तव्य आपण केले असल्याचे स्मरण त्यांनी करून दिले. ब्रिटिश राजवटीत भारताला दुर्बल, अयोग्य, आळशी आणि निष्क्रिय म्हणून दाखवण्याची एक फॅशन निर्माण झाली होती, आणि वसाहतवादाच्या प्रभावाखाली शिक्षित झालेले लोकही तीच भाषा बोलत होते असे त्यांनी नमूद केले. बंकिम दा यांनी ही न्यूनगंडाची भावना झटकून टाकली आणि वंदे मातरम् च्या माध्यमातून भारताचे शक्तिशाली रूप प्रकट केले असे त्यांनी सांगितले. बंकिम दा यांनी भारत माता ही ज्ञानाची आणि समृद्धीची देवता तर आहेच, पण ती शत्रूंविरुद्ध शस्त्रे चालवणारी प्रखर चंडिका देखील आहे हे ठळकपणे अधोरेखीत होईल अशा ओळी रचल्याचेही त्यांनी अधोरेखीत केले.
या शब्दांनी, भावनांनी आणि प्रेरणांनी गुलामगिरीच्या निराशेत गेलेल्या भारतीयांना धैर्य दिले असे ते म्हणाले. या ओळींमुळे कोट्यवधी देशवासियांना हा संघर्ष केवळ जमिनीच्या तुकड्यासाठी नव्हता, अथवा केवळ सत्तेचे सिंहासन मिळवण्यासाठी नव्हता, तर तो वसाहतवादाच्या बेड्या तोडण्यासाठी आणि हजारो वर्षांची महान परंपरा, गौरवशाली संस्कृती आणि अभिमानास्पद इतिहास पुनरुज्जीवित करण्यासाठी होता याची जाणीव झाल्याचे ते म्हणाले.
वंदे मातरम् चा सामान्य जनतेशी असलेल्या दृढ नात्यातूनच, आपल्या स्वातंत्र्यलढ्याची एक दीर्घ गाथा रचली गेली आहे असे ते म्हणाले. ज्या ज्या वेळी सिंधू, सरस्वती, कावेरी, गोदावरी, गंगा किंवा यमुना या वा अशा नद्यांचा उल्लेख होतो, त्या त्या वेळी ती आपल्यासोबत संस्कृतीचा प्रवाह, विकासाचा स्रोत आणि मानवी जीवनाचा प्रभाव घेऊन येते असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यलढ्याचा प्रत्येक टप्पा वंदे मातरम् च्या भावनेतून प्रवाहित झाला आहे, आणि त्यांच्या किनाऱ्यावर त्या भावनेची जपणूक झाली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रवास वंदे मातरम् च्या भावनांमध्ये अशा काव्यात्मक पद्धतीने गुंफला गेल्याचा आविष्कार कदाचित जगात इतरत्र कुठेही सापडणार नाही असे त्यांनी नमूद केले.
मोदी म्हणाले की,1857 नंतर ब्रिटिशांना हे समजले होते की त्यांना भारतात जास्त काळ राहणे कठीण होईल आणि ज्या स्वप्नांसह ते येथे आले होते, ती तेव्हाच पूर्ण होऊ शकतात जेव्हा भारत विभागला जाईल, आणि भारतातील लोक परस्परांमध्ये भांडतील. त्यांनी अधोरेखित केले की, ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा हा मार्ग निवडला आणि बंगालला त्यांची प्रयोगशाळा बनवली, कारण त्यांना माहीत होते की त्यावेळी बंगालची बौद्धिक शक्ती राष्ट्राला दिशा, शक्ती आणि प्रेरणा देत होती, भारताच्या सामूहिक शक्तीचा केंद्रबिंदू बनली होती. पंतप्रधानांनी सांगितले की, म्हणूनच ब्रिटिशांनी प्रथम बंगाल तोडण्याचे काम केले, त्यांना असा विश्वास वाटत होता की एकदा बंगालचे विभाजन झाले की देशही कोसळेल आणि ते त्यांचे राज्य चालू ठेवू शकतील. त्यांनी आठवण करून दिली की 1905 मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी बंगालचे विभाजन करण्याचे पाप केले तेव्हा वंदे मातरम एखाद्या पहाडासारखे निश्चल राहिले. त्यांनी यावर भर दिला की बंगालच्या एकतेसाठी वंदे मातरम् प्रत्येक रस्त्यावरून घुमले आणि लोकांना प्रेरणा दिली. बंगालच्या फाळणीसह भारताला कमकुवत करण्याचे बीज अधिक खोलवर पेरण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केला, परंतु वंदे मातरम हे एकच आवाज आणि एकात्मता निर्माण करणारा धागा म्हणून ब्रिटिशांसाठी आव्हान आणि राष्ट्रासाठी ताकदीचा दगड बनले, यावर पंतप्रधानांनी भर दिला.
बंगालची फाळणी झाली तरी त्यामुळे स्वदेशी चळवळ मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आणि त्या वेळी वंदे मातरम सर्वत्र प्रतिध्वनीत झाले, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी अधोरेखित केले की बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी निर्माण केलेल्या भावनेची शक्ती ब्रिटिशांना जाणवली. त्यांच्या गीताने ब्रिटिश साम्राज्याची पायाभरणी इतकी हादरली की त्यांना त्यावर कायदेशीर बंदी घालावी लागली. पंतप्रधान म्हणाले की ते गाणे म्हटले तर शिक्षा, छापले तर शिक्षा, आणि वंदे मातरम् हे शब्द उच्चारले तरी कठोर कायद्यांतर्गत शिक्षेला सामोरे जावे लागत होते. त्यांनी भर दिला की शेकडो महिलांनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले आणि योगदान दिले. जिथे वंदे मातरम गाण्यासाठी सर्वात मोठे अत्याचार झाले त्या बारीसालचे उदाहरण त्यांनी दिले. त्यांनी आठवण करून दिली की बारीसालमध्ये वंदे मातरमच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी माता, भगिनी आणि मुले पुढे आली होती. मोदी यांनी धाडसी सरोजिनी घोष यांचा उल्लेख केला, ज्यांनी घोषित केले की जोपर्यंत वंदे मातरमवरील बंदी उठवली जात नाही तोपर्यंत त्या आपल्या बांगड्या काढून टाकतील आणि पुन्हा त्या घालणार नाहीत, त्या काळात या प्रतिज्ञेचे महत्त्व अत्यंत मोठे होते. त्यांनी नमूद केले की मुलांनाही मागे सोडले जात नव्हते, त्यांना कोवळ्या वयातच फटके मारले जात होते, तुरुंगात टाकले जात होते, तरीही ते ब्रिटिशांना आव्हान देत सकाळच्या मिरवणुकीत वंदे मातरम म्हणत निघत राहिले.
त्यांनी अधोरेखित केले की बंगालच्या रस्त्यांवर एक बंगाली गाणे गायले जात होते ज्याचा अर्थ असा होता की, “प्रिय आई, तुझी सेवा करताना आणि वंदे मातरम म्हणताना जीव गेला तरी ते जीवन धन्य आहे,” हे पुढे मुलांचा आवाज बनले आणि त्याने राष्ट्राला धैर्य दिले.
मोदी यांनी पुढे आठवण करून दिली की 1905 मध्ये हरितपूर गावात वंदे मातरम म्हणणाऱ्या अगदी लहान मुलांना क्रूरपणे फटके मारण्यात आले होते, त्यांना जीवन आणि मृत्यूच्या संघर्षात भाग पाडण्यात आले होते. त्याचप्रमाणे, 1906 मध्ये नागपूरमधील नील सिटी हायस्कूलमधील मुलांना एकाच सुरात वंदे मातरम म्हणण्याच्या आणि त्यांच्या शक्तीद्वारे मंत्राची शक्ती सिद्ध करण्याच्या त्याच “गुन्ह्यासाठी” अत्याचारांना सामोरे जावे लागले.
पंतप्रधानांनी अधोरेखित केले की भारताच्या शूर सुपुत्रांनी निर्भयपणे फाशीची शिक्षा भोगली, शेवटचा श्वास घेत वंदे मातरमचा जयजयकार केला – खुदीराम बोस, मदनलाल धिंग्रा, राम प्रसाद बिस्मिल, अशफकुल्ला खान, रोशन सिंग, राजेंद्रनाथ लाहिरी, रामकृष्ण बिस्वास आणि असंख्य इतरांनी वंदे मातरम ओठांवर घेऊन फाशीची शिक्षा स्वीकारली. त्यांनी यावर भर दिला की जरी हे बलिदान वेगवेगळ्या तुरुंगात, वेगवेगळ्या प्रदेशात, वेगवेगळ्या चेहऱ्यांनी आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये झाले असले तरी मंत्र एकच होता – वंदे मातरम, एक भारत, श्रेष्ठ भारतचे प्रतीक.
पंतप्रधानांनी चितगाव उठावाची आठवण करून दिली, जिथे तरुण क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना आव्हान दिले होते, ज्यात हरगोपाल बाळ, पुलिन विकास घोष आणि त्रिपुर सेन अशी नावे इतिहासात चमकत होती. त्यांनी नमूद केले की 1934 मध्ये जेव्हा मास्टर सूर्य सेन यांना फाशी देण्यात आली तेव्हा त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना एक पत्र लिहिले आणि त्यात फक्त एकच शब्द होता – वंदे मातरम्.
जगाच्या इतिहासात इतरत्र कुठेही अशी कविता किंवा गाणी सापडत नाहीत जी शतकानुशतके लाखो लोकांना एकाच ध्येयासाठी प्रेरित करतात आणि वंदे मातरम् प्रमाणे त्यांचे जीवन समर्पित करण्यास उद्युक्त करतात, याचा भारतीय लोकांना अभिमान वाटला पाहिजे यावर भर देऊन मोदी म्हणाले की वसाहतवादाच्या काळातही भारताने अशा व्यक्ती निर्माण केल्या आहेत ज्या भावनांचे इतके गहन गाणे तयार करण्यास सक्षम आहेत, जे मानवतेसाठी एक आश्चर्य आहे, हे जगाला सांगण्याची गरज आहे.
पंतप्रधानांनी सांगितले की आपण हे अभिमानाने घोषित केले पाहिजे आणि मग जग देखील ते साजरे करण्यास सुरुवात करेल. त्यांनी अधोरेखित केले की वंदे मातरम हा स्वातंत्र्याचा मंत्र, त्यागाचा मंत्र, उर्जेचा मंत्र, शुद्धतेचा मंत्र, समर्पणाचा मंत्र, त्याग आणि तपस्येचा मंत्र आणि कष्ट सहन करण्याची शक्ती देणारा मंत्र आहे. त्यांनी अधोरेखित केले की हा मंत्र वंदे मातरम आहे. “एका धाग्यात बांधलेली हजारो मने , एका कार्यासाठी समर्पित हजारो आयुष्ये- वंदे मातरम.” असे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी लिहिले होते, याचे पंतप्रधानांनी स्मरण करून दिले.
त्या काळात वंदे मातरमची ध्वनिमुद्रणे जगाच्या वेगवेगळ्या भागात पोहोचली होती, हे नमूद करत पंतप्रधान म्हणाले की त्यावेळी क्रांतिकारकांची पंढरी बनलेल्या लंडनमधल्या इंडिया हाऊस मध्ये वीर सावरकरांना वंदे मातरम गाताना लोकांनी ऐकले तसेच तिथे हे गीत वारंवार म्हटले जात असे. देशावर जीव ओवाळून टाकणाऱ्यांसाठी ते एक प्रेरणेचा स्रोत ठरले होते. ब्रिटिशांची झोप उडवण्यासाठी केवळ हे गीत पुरेसे नव्हते म्हणून की काय बिपिनचंद्र पाल आणि महर्षी अरविंदो घोष यांनी त्यावेळी एक वर्तमानपत्र सुरू केले होते आणि त्याला वंदे मातरम असे नाव दिले होते असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. जेव्हा ब्रिटिशांनी या वर्तमानपत्रावर काही निर्बंध लादले तेव्हा मादाम भिकाजी कामा यांनी पॅरिसमध्ये एक वृत्तपत्र प्रकाशित करण्यास सुरुवात केली आणि त्याला वंदे मातरम असे नाव दिले.
वंदे मातरमने भारताला आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला असे उद्गार काढताना मोदी यांनी सांगितले की त्या काळात परदेशी कंपन्याना आव्हान देऊन स्वदेशीचा मंत्र देण्यासाठी काडेपेटीपासून ते मोठ्या जहाजांपर्यंत सगळ्यांवर वंदे मातरम असे कोरण्याची प्रथाच पडली होती. स्वातंत्र्याचा मंत्र हा स्वदेशीच्या मंत्रापर्यंत विस्तारण्यात आला होता यावर त्यांनी भर दिला.
1907 मधल्या अजून एका घटनेचे स्मरण करत पंतप्रधान म्हणाले की तेव्हा व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांनी स्वदेशी कंपनीसाठी जहाज बांधले आणि त्यावर वंदे मातरम अशी अक्षरे कोरून घेतली. राष्ट्रीय कवी सुब्रमण्यम भारती ह्यांनी वंदे मातरम तमिळ भाषेत आणले . त्यांच्या अनेक देशभक्तीपर गीतांमध्ये वंदे मातरम बद्दलची भक्ती स्पष्टपणे दिसून येते. भारती यांनी भारताचे ध्वजगीत सुद्धा लिहिले त्यामध्ये ध्वजावर वंदे मातरम असे कोरल्याचा उल्लेख होता हे प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केले. “देशभक्तानो, माझ्या मातेच्या या पवित्र ध्वजाला नम्रपणे आणि आदराने नमस्कार करा !” असे तामिळ भाषेतील कवनाचे भाषांतर पंतप्रधानांनी सांगितले.
वंदे मातरम बद्दलच्या महात्मा गांधी यांच्या भावना सदनासमोर आपण ठेवू इच्छितो असे पंतप्रधानांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेहून प्रकाशित होत असलेल्या इंडियन ओपिनियन या आपल्या साप्ताहिकात 2 डिसेंबर 1905 रोजी महात्मा गांधी यांनी लिहिले होते की बंकिम चंद्र यांनी रचलेले वंदे मातरम हे बंगाल मध्ये अतिशय लोकप्रिय झाले आहे आणि स्वदेशी चळवळीत लाखोंच्या सभेत लोक बंकीमचंद्र यांचे गीत गातात. हे गीत एवढे लोकप्रिय झाले आहे की ते जवळपास राष्ट्रगीतच बनले आहे असे महात्मा गांधीजींचे शब्द पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या गीतातून व्यक्त होणाऱ्या भावना महान आहेत तसेच इतर देशांच्या गीतापेक्षा ते अधिक मधुर असून आपल्या मधील राष्ट्रभक्ती जागृत करणे हे त्याचे एकमेव उद्दिष्ट आहे असे गांधीजींनी लिहिले होते. भारत देशाकडे माता म्हणून बघणे आणि त्याची स्तुती या गीतात आहे असे गांधीजींनी वर्णन केल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या वंदे मातरम या गीताकडे महात्मा गांधी यांनी 1905 मध्ये राष्ट्रगीत म्हणून तसेच देशातल्या किंवा परदेशातल्या प्रत्येक भारतीयांमधील प्रचंड शक्तीचा स्रोत म्हणून बघितले होते त्याला गेल्या शतकात घोर अन्याय सहन करावा लागला असे पंतप्रधानांनी नमूद केले. वंदे मातरम या गीताच्या बाबतीत असा विश्वासघात का करण्यात आला असा प्रश्न त्यांनी केला, हा अन्याय का करण्यात आला आणि आदरस्थान असलेल्या बापूंच्या भावना सुद्धा झाकोळून आदराच्या प्रेरणाशक्तीला वादंगात ओढण्याइतक्या कोणत्या शक्ती मजबूत होत्या असेही त्यांनी विचारले. आपण आता वंदे मातरम ची दीडशे वर्षे साजरी करत असताना नवीन पिढीला या विश्वासघाताची माहिती देणे हे आपले कर्तव्य आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. वंदे मातरम ला विरोध करण्याचे मुस्लिम लीगचे राजकारण अधिकाधिक तीव्र होत गेले आणि मोहम्मद अली जिना यांनी 15 ऑक्टोंबर 1937 रोजी लखनौ इथून वंदे मातरमच्या विरोधात घोषणा दिली. मुस्लिम लीगच्या अशा निराधार विधानाविरुद्ध ठाम राहून त्यांची निर्भत्सना करण्याऐवजी त्या वेळचे काँग्रेस अध्यक्ष जवाहरलाल नेहरू यांनी त्यांची आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची वंदे मातरमच्या प्रति असलेली निष्ठा कायम राखली नाही आणि स्वतःच वंदे मातरमला प्रश्न करायला सुरुवात केली. जिनांच्या विरोधानंतर पाच दिवसात नेहरू यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांना पत्र लिहून जीनांच्या भावनांचे समर्थन करत वंदे पार्श्वभूमीवरच्या आनंदमठ या कादंबरीमुळे मुस्लिमांच्या भावना दुखावू शकतात असे म्हटल्याचे सांगत नेहरूंचे शब्द त्यांनी नमूद केले, नेहरू म्हणाले , “मी वंदे मातरम या गीताची पार्श्वभूमी वाचली आहे आणि ही पार्श्वभूमी मुस्लिमांना चीड आणणारी ठरू शकते असे मला वाटते.”
पंतप्रधानांनी नमूद केले की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून एक निवेदन आले की 26 ऑक्टोबर 1937 पासून कोलकाता येथे ‘वंदे मातरम’च्या वापराचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होईल. या आढाव्यासाठी बंकिम बाबूंचा बंगाल, बंकिम बाबूंचे कोलकाता निवडले गेले, हे त्यांनी ठळकपणे सांगितले. यावेळी संपूर्ण राष्ट्र स्तब्ध आणि हादरून गेले होते, आणि देशभरातील देशभक्तांनी सकाळच्या प्रभातफेऱ्या काढून आणि ‘वंदे मातरम’ गाऊन या प्रस्तावाला विरोध केला, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. दुर्दैवाने, 26 ऑक्टोबर 1937 रोजी काँग्रेसने ‘वंदे मातरम’वर तडजोड केली आणि त्यांच्या निर्णयामुळे त्याचे तुकडे केले गेले, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी नमूद केले की हा निर्णय सामाजिक सलोख्याच्या बुरख्याखाली लपवला गेला होता, परंतु काँग्रेसने मुस्लिम लीगसमोर मान तुकवली आणि त्यांच्या दबावाखाली काम करत तुष्टीकरणाचे राजकारण स्वीकारले, याला इतिहास साक्ष आहे.
सभागृहात बोलताना पंतप्रधानांनी नमूद केले की, तुष्टीकरणाच्या राजकारणाच्या दबावाखाली, काँग्रेस ‘वंदे मातरम’च्या विभाजनासाठी झुकली आणि म्हणूनच त्यांना एक दिवस भारताच्या फाळणीसाठी झुकावे लागले. काँग्रेसने त्यांचे निर्णय ‘आउटसोर्स’ केले होते आणि खेदाची गोष्ट म्हणजे त्यांची धोरणे तशीच राहिली आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. तुष्टीकरणाच्या राजकारणाचा अवलंब केल्याबद्दल आणि ‘वंदे मातरम’ भोवती सतत वाद निर्माण करण्याच्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधानांनी विरोधक आणि त्यांच्या मित्रपक्षांवर टीका केली.
पंतप्रधानांनी नमूद केले की, कोणत्याही राष्ट्राचे खरे चारित्र्य त्याच्या चांगल्या काळात नाही तर आव्हानाच्या आणि संकटाच्या काळात प्रकट होते, तेव्हा त्याची लवचिकता, सामर्थ्य आणि क्षमता सिद्ध होते. 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर, देशापुढची आव्हाने आणि प्राधान्यक्रम बदलले असले तरी, राष्ट्राचा आत्मा आणि प्राणशक्ती तीच राहिली, ती प्रेरणा देत राहिली, असे त्यांनी सांगितले. जेव्हा भारताला संकटांचा सामना करावा लागला, तेव्हा राष्ट्र ‘वंदे मातरम’च्या भावनेतून संकाटाला सामोरे गेले, असे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांनी नमूद केले की आजही, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी सारख्या प्रसंगी, जेव्हा प्रत्येक घरात तिरंगा डौलाने फडकतो तेव्हा ही भावना सर्वत्र दिसते. अन्नसंकटाच्या वेळी, ‘वंदे मातरम’च्या भावनेनेच शेतकऱ्यांना देशाची कोठारे भरण्याची प्रेरणा दिली याची त्यांनी आठवण करुन दिली. जेव्हा भारताचे स्वातंत्र्य चिरडण्याचे प्रयत्न झाले, जेव्हा संविधानावर वार केले गेले आणि आणीबाणी लादली गेली, तेव्हा ‘वंदे मातरम’च्या ताकदीनेच राष्ट्राला उभे राहण्यास आणि संकटावर मात करण्यास सक्षम केले, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की जेव्हा जेव्हा देशावर युद्धे लादली गेली, जेव्हा जेव्हा संघर्ष उद्भवले, तेव्हा ‘वंदे मातरम’च्या भावनेनेच सैनिकांना सीमेवर ठामपणे उभे राहण्याचे बळ दिले आणि भारत मातेचा ध्वज विजयाने फडकवत ठेवला. त्यांनी पुढे नमूद केले की कोव्हिडच्या जागतिक संकटातही, राष्ट्र त्याच भावनेने उभे राहिले, आव्हानाचा सामना केला आणि पुढे चालत राहिले.
पंतप्रधानांनी नमूद केले की ही राष्ट्राची ताकद आहे, ऊर्जेचा एक शक्तिशाली प्रवाह आहे जो देशाला भावनांशी जोडतो, हा जाणीवेचा एक प्रवाह आहे आणि प्रगतीला चालना देणाऱ्या अखंड सांस्कृतिक प्रवाहाचे प्रतिबिंब आहे. “वंदे मातरम हा केवळ स्मरणाचा काळ नाही तर नवीन ऊर्जा आणि प्रेरणा घेण्याचा आणि स्वतःला समर्पित करण्याचा काळ आहे”, असे मोदींनी जोर देऊन सांगितले. राष्ट्रावर ‘वंदे मातरम’चे ऋण आहे, ज्याने आपल्याला इथपर्यंत आणणारा मार्ग तयार केला आणि म्हणूनच त्याचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. पंतप्रधानांनी ठळकपणे सांगितले की, भारतामध्ये प्रत्येक आव्हानावर मात करण्याची क्षमता आहे आणि ‘वंदे मातरम’ची भावना त्या शक्तीचे प्रतीक आहे. ‘वंदे मातरम’ हे केवळ एक गाणे किंवा स्तोत्र नाही, तर ती एक प्रेरणा आहे जी आपल्याला राष्ट्रकर्तव्याची जाणीव करून देते आणि ती सतत जपली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. आपण आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पाहत असताना, ‘वंदे मातरम’ हीच आपली प्रेरणा आहे हे त्यांनी अधोरेखित केले. काळ आणि रूपे बदलली तरी महात्मा गांधींनी व्यक्त केलेली भावना आजही तितकीच ताकद राखून आहे आणि ‘वंदे मातरम’ आपल्याला एकमेकांशी जोडते असे ते म्हणाले. महान नेत्यांचे स्वप्न स्वतंत्र भारताचे होते, तर आजच्या पिढीचे स्वप्न समृद्ध भारताचे आहे असे त्यांनी सांगितले. त्यांनी जोर दिला की ज्याप्रमाणे ‘वंदे मातरम’च्या भावनेने स्वातंत्र्याचे स्वप्न जोपासले, तसेच समृद्धीचे स्वप्नही जोपासेल. त्यांनी सर्वांना या भावनेने पुढे जाण्याचे, आत्मनिर्भर भारत घडवण्याचे आणि 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साध्य करण्याचे आवाहन केले. जर स्वातंत्र्याच्या 50 वर्षे आधी कोणी मुक्त भारताचे स्वप्न पाहू शकत होते, तर 2047 च्या 25 वर्षे आधी आपणही समृद्ध आणि विकसित भारताचे स्वप्न पाहू शकतो आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वतःला समर्पित करू शकतो, असे ते यावेळी म्हणाले. या मंत्र आणि संकल्पासह, ‘वंदे मातरम’ प्रेरणा देत राहील, आपल्या ऋणांची आठवण करून देईल, मार्गदर्शन करेल आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्राला एकत्र आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही चर्चा देशात राष्ट्रभावना जागवेल, देशाला प्रेरणा देईल आणि नवीन पिढीला ऊर्जा द्यायला कारणीभूत ठरेल, अशी आशा व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संधीबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.
Matribhumi Samachar Marathi

