भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण(एफएसएसएआय) पश्चिम क्षेत्र, रविवारी 12 जानेवारी 2025 रोजी बुलढाणा जिल्ह्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी एका व्यापक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. बुलढाणा शहरात चिखली रोड, विद्या नगरी येथील सहकार विद्या मंदिर शाळेत आयोजित होणाऱ्या अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणीकरण कार्यक्रमात रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे 2000 पेक्षा जास्त विक्रेते सहभागी होणार आहेत. अन्नपदार्थ हाताळणीच्या सुरक्षित पद्धतींवर यामध्ये भर असेल. जे लोक अन्न पदार्थांची हाताळणी, साठवणूक, शिजवणे आणि उत्पादन आणि सेवा यांच्याशी संबंधित असतील त्यांनी अन्नपदार्थ दूषित होऊ नयेत आणि ग्राहकांना सुरक्षेची हमी मिळेल यासाठी स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या कठोर मानकांचे पालन करावे हे सुनिश्चित करण्याचा एफएसएसआयचा उद्देश आहे.
रस्त्यावरील खाद्यपदार्थ हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे एक जिवंत उदाहरण आहे, जे देशाच्या विविध पाककृती परंपरा, विशिष्ट चव आणि सामाजिक परिदृश्याचे दर्शन घडवते. त्याच्या वाढत्या लोकप्रियतेसह, ग्राहकांसाठी त्याची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि त्याचबरोबर रस्त्यावरील या आवडत्या पदार्थांची निर्मिती करणाऱ्या विक्रेत्यांना पाठबळ देणे देखील महत्त्वाचे आहे. एफएसएसआय चा एफओएसटीएसी कार्यक्रम अन्न हाताळणाऱ्यांना, ज्यामध्ये रस्त्यावरील विक्रेत्यांना अन्न सुरक्षा आणि स्वच्छता मानके राखण्यासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करण्यासाठी तयार केला गेला आहे. या प्रशिक्षणात वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षित अन्न हाताळणी आणि अन्नपदार्थ दूषित होण्यास प्रतिबंध यासारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे. विक्रेत्यांना नियामक अनुपालन आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींबद्दल शिक्षित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
हा कार्यक्रम केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री यांनी 2023 च्या जागतिक अन्न सुरक्षा दिनी केलेल्या घोषणेला अनुसरून आहे. ज्यामध्ये 2025-2026 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस अन्न हाताळणी करणाऱ्या 2.5 दशलक्ष जणांना प्रशिक्षण देण्याचे काम एफएसएसआय ला देण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली आणि एफएसएसआयचे चे सीईओ जी. कमला वर्धन राव यांच्या सह-अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या उपक्रमाला पुढे नेण्यात आले.
एफएसएसआयचे प्रादेशिक संचालक(पश्चिम क्षेत्र) प्रीती चौधरी आणि या कार्यालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी इतर मान्यवर अतिथींसोबत या प्रशिक्षण कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
Matribhumi Samachar Marathi

