युरोपियन मुक्त व्यापार संघटनेसोबतचे द्विपक्षीय संबंध द्विगुणित करण्याच्या उद्देशाने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 10, फेब्रुवारी 2025 रोजी भारत युरोपियन मुक्त व्यापार संघटना (ई एफ टी ए ) मंचाचे उदघाटन करणार आहेत. यावेळी भारत युरोपियन मुक्त व्यापार संघटनेच्या प्रतिनिधी, स्विस राज्य सचिव हेलेन बडलिगर आर्टिडा, नॉर्वेचे व्यापार आणि उद्योग राज्य सचिव टॉमस नॉर्वोल, आइसलँडचे स्थायी राज्य सचिव मार्टिन आयजोल्फसन, लिकटेंस्टीनचे परराष्ट्र व्यवहार, शिक्षण आणि क्रीडा मंत्री डॉमिनिक हसलर, ईएफटीए सचिवालयाचे उप महासचिव मार्कस श्लेगेनहॉफ, ईएफटीए सचिवालयाचे वरिष्ठ अधिकारी डेव्हिड स्वेनबोर्नसन देखील उपस्थित राहणार आहेत.
भारत-युरोपियन मुक्त व्यापार संघटनेत 10 मार्च 2024 रोजी स्वाक्षरी झालेल्या व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराच्या (TEPA) अध्याय 7 च्या अनुषंगाने हा उपक्रम आखण्यात आला असून भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेतील स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड, लिटेन्शलँड या चार देशांमधील व्यापार, गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी एक समर्पित व्यासपीठ तयार करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. उद्घाटन समारंभाला भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि ई एफ टी एच्या सदस्य देशांमधील वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि वाणिज्य विभागातील वरिष्ठ अधिकारी देखील या मेळाव्याला संबोधित करणार असून ई एफ टी ए राष्ट्रांसोबत मजबूत आर्थिक सहभागासाठी भारताच्या दृष्टीकोनाची रूपरेषा विशद करणार आहेत.
भारतात विस्तार करू इच्छिणाऱ्या ई एफ टी ए कंपन्यांना एक मध्यवर्ती आधार यंत्रणा म्हणून हा समर्पित भारत – ई एफ टी ए मॅच कार्य करेल. या माध्यमातून बाजारपेठांबाबतचा अंतर्वेध, नियामक मार्गदर्शन, भारताच्या योजना आणि गुंतवणूक परिदृश्याचा धांडोळा घेतला जाईल.
उद्घाटन सोहळ्यानंतर, एक उच्च-स्तरीय ई एफ टी ए-भारत व्यापार गोलमेज परिषद आयोजित केली जाणार असून यामध्ये भारत आणि ई एफ टी ए सदस्य राष्ट्रांमधील 100 हून अधिक आघाडीचे व्यावसायिक सहभागी होणार आहेत. औषध निर्माण आणि लाइफ सायन्सेस, आर्थिक सेवा आणि फिनटेक, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, ऊर्जा आणि शाश्वतता, सागरी खाद्य आणि नौवहन, अन्न प्रक्रिया आणि ऍग्रीटेक या प्रमुख क्षेत्रातील कंपन्यांचा यात समावेश आहे. व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराच्या आराखड्याअंतर्गत कंपन्यांना संयुक्त उपक्रम, गुंतवणूक संधी आणि तंत्रज्ञान भागीदारी शोधण्यासाठी ही गोलमेज परिषद एक संरचित मंच प्रदान करेल.
Matribhumi Samachar Marathi

