नवी दिल्ली, 10 जुलै 2025. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी आज दिल्लीतील यशोभूमी येथे भारत उर्जा साठवणूक सप्ताह 2025 अंतर्गत वाहन विद्युतीकरणासाठी भारताचा आराखडा या विषयावरील सत्राचे उद्घाटन केले.
देशात ग्रीन मोबिलिटी आणि विद्युत वाहन निर्मिती परीसंस्थेच्या विकासाला चालना देण्याची मोदी सरकारची वचनबद्धता आणि पीएम ई ड्राइव्ह आणि फेम-II योजनांची सुरुवात हे त्याचेच द्योतक आहे, असे मंत्र्यांनी सांगितले.
मल्होत्रा म्हणाले की, भारत, सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून, स्वच्छ प्रवासाच्या आपल्या ध्येयावर मार्गक्रमण करत आहे. शिवाय, ईव्ही रेट्रोफिटिंग नियमन आणि ईव्हीसाठी टोल कर सवलती यासारख्या धोरणांचा उद्देश वाहतूक अधिक सुलभ आणि शाश्वत बनवणे हा आहे.
इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे होणारे संक्रमण हे केवळ तांत्रिक बदल नाही तर हवामान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, आर्थिक लवचिकता आणि ऊर्जा सुरक्षा राखण्यासाठी राष्ट्रीय अत्यावश्यकता असे मल्होत्रा म्हणाले.
रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते,रेल्वे आणि गोदामांना एकत्रित करून विकसित केलेल्या मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स पार्क्समध्ये आता हरित ऊर्जा तरतुदी आणि ईव्ही-अनुकूल सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत, ज्यामुळे लॉजिस्टिक्स खर्च कमी होईल, उत्सर्जन कमी होईल आणि स्वच्छ आणि कनेक्टेड वाहतूक केंद्र म्हणून भारताचे स्थान मजबूत होईल, असा उल्लेख त्यांनी केला.
मोदी सरकार 2030 पर्यंत 500 गिगावॅट अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी वचनबद्ध आहे आणि भारत स्वच्छ गतिशीलता उपायांसाठी जागतिक केंद्र बनण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे असे मल्होत्रा यांनी अधोरेखित केले. त्यांनी भागधारकांना असे वाहतूकविषयक भविष्य विकसित करण्याचे आवाहन केले जे केवळ विद्युतच नाही तर सुरक्षित, समावेशक आणि पर्यावरणीयदृष्ट्या जबाबदार असेल.
भारताच्या हवामान आणि गतिशीलतेच्या गरजांनुसार तयार केलेले बॅटरी साठवणूक तंत्रज्ञान आपल्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण असेल हे आपण ओळखले पाहिजे असे मंत्र्यांनी सांगितले आणि उद्योजकांना संशोधन आणि विकासात गुंतवणूक करण्याचे, स्थानिक पातळीवर उत्पादन करण्याचे आणि बॅटरी रिसायकलिंग आणि पुनर्वापर यासारख्या उपायांचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
शेवटी मंत्री म्हणाले की, गेल्या 11 वर्षांत भारताने उल्लेखनीय औद्योगिक आणि व्यावसायिक वाढ पाहिली आहे आणि ही गती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य लक्ष्य असलेल्या 2070 चे नेट झिरो लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने पुढे जात आहे.




Matribhumi Samachar Marathi

