नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (दिनांक 10 डिसेंबर 2025) नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आयोजित केलेल्या मानवाधिकार दिन समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविले आणि उपस्थितांना संबोधित केले.
मानवी हक्क अविभाज्य आहेत आणि ते एका न्याय्य, समतापूर्ण आणि क्षमाशील समाजाचा पाया रचतात,यांचे स्मरण करून देण्याचा हा दिवस आहे असे या दिवसाचे महत्त्व विशद करत राष्ट्रपतींनी सांगितले. प्रत्येक मानवाला जन्मतःच स्वातंत्र्य आणि समान प्रतिष्ठा तसेच अधिकार लाभतात,हे एक सरल पण क्रांतिकारी सत्य मांडण्यासाठी सत्त्याहत्तर वर्षांपूर्वी, जग एकत्र आले होते: मानवी हक्कांच्या जागतिक चौकटीला आकार देण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी मानवी प्रतिष्ठा, समानता आणि न्यायाने रुजलेल्या जगाची संकल्पना मांडली होती.
अंत्योदयाच्या तत्वज्ञानानुसार, शेवटच्या पायरीवरील व्यक्तीसह सर्वांचेच मानवी हक्क सुनिश्चित केले पाहिजेत यावर राष्ट्रपतींनी भर दिला. 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याच्या दिशेने राष्ट्र करत असलेल्या प्रवासात प्रत्येक नागरिकाने सक्रियपणे सहभागी व्हायला पाहिजे; तरच खऱ्या अर्थाने विकासाला समावेशक म्हणता येईल,असेही यावेळी त्यांनी नमूद केले.
महिला सक्षमीकरण आणि त्यांचे कल्याण हे मानवी हक्कांचे प्रमुख आधारस्तंभ आहेत असे राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सार्वजनिक ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेवर एक परिषद आयोजित केली आहे हे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. अशा परिषदांमधून काढलेले निष्कर्ष महिलांची सुरक्षितता आणि सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात याकडे त्यांनी लक्ष वेधले.
अलिकडेच सरकारने वेतन, औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थितीशी संबंधित चार कामगार संहितांच्या माध्यमातून व्यापक सुधारणांच्या अंमलबजावणीची अधिसूचना जारी केली आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. हा बदल भविष्यासाठी तयार असलेल्या कामगारांसाठी आणि शाश्वत उद्योगांसाठी एक परिवर्तनकारी पाया तयार करतो, असे त्यांनी सांगितले.
मानवी हक्क ही केवळ सरकार, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, नागरी समाज संघटना अशा प्रकारच्या संस्थांची जबाबदारी नाही, हे ओळखण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी प्रत्येक नागरिकाला केले.आपल्या सारख्याच नागरिकांचे हक्क आणि प्रतिष्ठा यांचे रक्षण करणे हे एक सामायिक कर्तव्य आहे असे त्या म्हणाल्या. एका क्षमाशील आणि जबाबदार समाजाचे सदस्य म्हणून हे आपल्या सर्वांचे परम कर्तव्य आहे, असेही त्यांनी आपल्या भाषणात आवर्जून सांगितले.
Matribhumi Samachar Marathi

