Friday, January 23 2026 | 06:36:55 AM
Breaking News

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते सी-डॅकची निर्मिती असलेल्या ARIES ECO आणि ARIES NOVA डेव्हलपमेंट बोर्डस आणि THEJAS64 स्वदेशी 64-bit SoC चे अनावरण

Connect us on:

मुंबई/पुणे, 11 जानेवारी 2025

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यातील पाषाण येथील सी-डॅक संकुलात व्हेगा प्रोसेसर चिपवर आधारित आधारित SoC ASIC आणि DIR V व्हेगा प्रोसेसर आधारित दोन डेव्हलपमेंट बोर्डचे अनावरण झाले. ARIES ECO आणि ARIES NOVA डेव्हलपमेंट बोर्ड ही दोन्ही उत्पादने सी डॅक ने डिझाईन आणि विकसित केली आहेत. ARIES ECO हे उत्पादन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असून सेन्सर फ्यूजन, स्मार्ट मीटर आणि वेअरेबल डिव्हाइसेस यांसारख्या ऍप्लिकेशन्ससह प्रयोग करण्यासाठी ते एक सहजसाध्य व्यासपीठ उपलब्ध करून देते.  मोठ्या यांत्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक प्रणालीमध्ये कार्य करणाऱ्या एम्बेडेड संगणक प्रणालीच्या, वेगाने विकसित होत असलेल्या क्षेत्रात, ARIES NOVA शिक्षण, संशोधन आणि विकासासाठी एक व्यासपीठ प्रदान करते.  THEJAS64 हे पहिले पूर्णपणे स्वदेशी 64-बिट व्हेगा आधारित सिस्टम-ऑन-चिप (SoC) उत्पादन असून त्याची रचना मजबूत आणि सुरक्षित एम्बेडेड ऍप्लिकेशन्ससाठी केली आहे.

भारत सरकारच्या डिजिटल इंडिया आरआयएससी- फाईव्ह (डीआयआर -फाईव्ह) कार्यक्रमाचा भाग म्हणून, सी-डॅक ने भारतातील पहिल्या स्वदेशी 64-बिट मल्टी-कोर RISC-V आधारित सुपरस्केलरसह आउट-ऑफ-ऑर्डर प्रोसेसरची निर्मिती करुन मायक्रोप्रोसेसरच्या व्हेगा शृंखलेचे डिझाइन आणि विकास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. व्हेगा शृंखलेत RISC-V इंस्ट्रक्शन सेट आर्किटेक्चरवर आधारित 32/64-बिट सिंगल/ड्युअल/क्वाड कोअर सुपरस्केलर आउट-ऑफ-ऑर्डर हाय परफॉर्मन्स प्रोसेसर कोर आहेत. मुक्त-स्रोत RISC-V आर्किटेक्चरमुळे  लवचिकता आणि नवकल्पना यांचा वापर होतो आणि प्रत्यक्ष अनुभवातून मिळणारे शिक्षण मिळते तसेच एम्बेडेड सिस्टममध्ये अधिक संशोधन आणि विकासास प्रोत्साहन मिळते.

सी डॅक ने आयोजित केलेल्या प्रदर्शनालाही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भेट दिली तसेच सी डॅकचे शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. 2047 सालापर्यंत भारत विकसित देश होण्यासाठी संगणकीय आणि तंत्रज्ञानाचा विकास हा मुख्य पाया आहे आणि सी डॅकची त्यात अतिशय महत्वाची भूमिका आहे, असे वैष्णव यांनी यावेळी सांगितले. आय आय टी मद्रास,  बेंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था, आय आय टी गांधीनगर यांसारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये सेमी कंडक्टर आणि संगणकीय क्षेत्रातील संशोधन कार्य मोठया प्रमाणावर सुरु आहे, असे वैष्णव म्हणाले. या सर्व संशोधन कार्याला एकाच छताखाली आणून पुढे मार्गक्रमण करण्यासाठी एकसंध आणि सुसंगत मार्ग कसा तयार करता येईल यावर आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. देशातील सुमारे 240 संस्थांमध्ये चिप्स डिझाइन करण्यासाठी आवश्यक प्रगत उपकरणे असल्याचे वैष्णव म्हणाले.

सी-डॅक ही संस्था या संशोधन साधनांचे परीक्षण, कार्यक्षम अंमलबजावणी आणि परवाने खरेदी करून या संपूर्ण कार्यक्रमाचा आधार म्हणून काम करते. परिणामी सेमी कंडक्टर क्षेत्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी एके काळी पाठ्यपुस्तकांमधून घेत असलेले शिक्षण आता प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारे घेत आहेत, त्यांच्या कल्पना प्रत्यक्ष वापरून पहात आहेत आणि उत्पादनाविषयीच्या संकल्पना स्वतः विकसित करत आहेत. सेमी कंडक्टर निर्मिती उपकरणांवर संशोधन करणाऱ्या या विद्यार्थ्यांना सेमी कंडक्टर क्षेत्रात सामावून घेतले जाईल. या विद्यार्थ्यांमध्ये  स्टार्ट अप सुरु करण्याची आणि स्वतः प्रत्यक्ष कॉम्प्युटर चिप्स डिझाईन करण्याची क्षमता विकसित होत आहे.

सेमी-कंडक्टर डिझाइन उपकरणांचा वापर कसा करायचा याचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सी-डॅक एक आव्हानात्मक स्पर्धा आयोजित करणार असून त्यांना या उद्योगातील सर्वोत्कृष्ट कंपनीशी जोडले जाईल. या विद्यार्थ्यांसाठी सी-डॅक एक प्रमाणपत्र अभ्यासक्रमही सुरू करणार आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या समूह उप समन्वयक (संशोधन आणि विकास) सुनीता वर्मा, सी-डॅक चे महासंचालक ई मागेश आणि सी-डॅक पुणेचे केंद्र प्रमुख संजय वांढेकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. सी-डॅक ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची प्रमुख संशोधन आणि विकास संस्था आहे. ही संस्था माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि संबंधित क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विकास उपक्रम राबवण्यात अग्रणी आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

एडीएद्वारे आयोजित दोन दिवसीय ‘एअरोनॉटिक्स 2047’राष्ट्रीय चर्चासत्राला बंगळुरुमध्ये प्रारंभ

एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए) द्वारे आयोजित ‘एअरोनॉटिक्स 2047’या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला  बंगळुरूच्या सेंटर फॉर एअरबोर्न …