नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली येथे युनानी दिवसाच्या निमित्ताने एकात्मिक आरोग्य उपायांसाठी युनानी औषध प्रणालीमधील नवोन्मेष- भावी वाटचालीचा मार्ग या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. 2016 पासून ज्यांच्या सन्मानार्थ युनानी दिवस साजरा केला जातो त्या हकीम अजमल खान यांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे,असे राष्ट्रपतींनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले.
आज भारत शिक्षण, संशोधन, आरोग्य आणि युनानी प्रणालीमधील औषधनिर्मिती अशा विविध क्षेत्रात जगाचे नेतृत्व करत आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. युनानी प्रणालीशी संबंधित संशोधक आणि वैद्यकीय व्यावसायिक आधुनिक पद्धती आणि तंत्रज्ञानाचा अंगिकार करत आहेत याबद्दल आनंद वाटत असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. या परिषदेत युनानी औषध प्रणालीमधील पुरावा आधारित अलीकडील संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि आयुष/पारंपरिक औषध प्रणालीसाठी मशीन लर्निंगः भवितव्य आणि आव्हाने यांसारख्या समकालीन विषयांवर चर्चा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपल्या देशाने आरोग्याबाबत समग्र दृष्टीकोनाचा अंगिकार केला आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. विविध वैद्यकीय प्रणालींना आवश्यक असलेला सन्मान देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017नुसार युनानीसह आयुष औषध प्रणालीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष भर दिला जात आहे.युनानी वैद्यकीय विज्ञानामधील नवी पिढी ज्ञान आणि अनुभवाचा प्राचीन वारसा बळकट करेल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
Matribhumi Samachar Marathi

