नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025
‘लोकसहभागातून लोककल्याण’ आणि भारत सरकारच्या गेल्या दशकभरातील यशस्वी कामगिरी, कार्यक्रम, धोरणे आणि योजनांवर आधारित डिजिटल प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज प्रयागराजमधील त्रिवेणीमार्ग येथील प्रदर्शन संकुलात केले.

उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येने लोक प्रदर्शनाच्या ठिकाणी गर्दी करत त्यांनी प्रदर्शन पाहिले.

त्रिवेणी पथ प्रदर्शन परिसरात आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत जनतेसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. या डिजिटल प्रदर्शनात ॲनामॉर्फिक वॉल , एलईडी टीव्ही स्क्रीन, एलईडी वॉल , होलोग्राफिक सिलेंडरच्या माध्यमातून विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती प्रदर्शित केली जात आहे.
प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये :प्रमुख सरकारी कल्याणकारी योजनांची माहिती
या प्रदर्शनाच्या माध्यमातून पंतप्रधान जन आरोग्य योजना, नमो ड्रोन दीदी, लखपती दीदी, वेव्ह्ज , पंतप्रधान इंटर्नशिप योजना, मुद्रा योजना, पंतप्रधान पीक विमा योजना, डिजिटल इंडिया, पंतप्रधान गृहनिर्माण योजना, विद्यांजली, आत्मनिर्भर भारत, स्किल इंडिया, एक भारत श्रेष्ठ भारत, पंतप्रधान उज्ज्वला योजना, हर घर जल योजना,पंतप्रधान कौशल्य विकास अभियान , स्वच्छ भारत अभियान ,पीएम स्वनिधी योजना , स्वतंत्र भारताचे तीन नवीन फौजदारी कायदे, पंतप्रधान किसान सन्मान निधी यासह महिला सक्षमीकरण योजना आणि इतर विविध योजना यांसारख्या केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांना दिली जात आहे.


सांस्कृतिक प्रकाशझोत : संपूर्ण उत्तर प्रदेशातील विविध लोककला आणि शास्त्रीय कार्यक्रम
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या डिजिटल प्रदर्शनाव्यतिरिक्त, उत्तर प्रदेशातील विविध क्षेत्रांमधील 200 हून अधिक लोककला आणि शास्त्रीय कार्यक्रम देखील आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मालिकेद्वारे विविध ठिकाणी प्रदर्शित केले जात आहेत. हे कार्यक्रम केंद्र सरकारच्या मागील 10 वर्षातील यशस्वी कामगिरी, योजना, कार्यक्रम आणि धोरणे जनतेसमोर प्रदर्शित करतील. या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही महाकुंभ मेळ्याच्या संपूर्ण कालावधीत 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान केले जाईल.
प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम एक अनोखी कथा सांगतो आणि त्या प्रदेशातील स्थानिक प्रथा , विधी आणि अध्यात्म प्रदर्शित करतो, जो महाकुंभला येणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक नेत्रदीपक असा दृश्य आणि कलात्मक अनुभव निर्माण करेल. या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये शेकडो प्रतिभावंत कलाकार सहभागी होत आहेत, जे विविध प्रादेशिक नृत्य आणि गायन शैलीचे प्रतिनिधित्व करत आहेत.
Matribhumi Samachar Marathi

