रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारचा संयुक्त उपक्रम असलेल्या मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने 12 जुलै 2025 रोजी आपला 26 वा स्थापना दिन साजरा केला.
मुंबई रेल्वे विकास महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास सोपान वाडेकर यांनी या प्रसंगी बोलतांना, मुंबईची उपनगरीय रेल्वे व्यवस्था जागतिक दर्जाची , प्रवासी-केंद्रित यंत्रणा बनवण्याच्या महामंडळाच्या दृढ संकल्पाचा पुनरुच्चार केला. आम्ही केवळ रेल्वेमार्ग निर्माण करत नाही, तर करोडो प्रवाशांसाठी विश्वास, लवचिकता आणि शाश्वत भविष्य घडवत आहोत, असे त्यांनी नमूद केले. मुंबई रेल्वे विकास महामंडळ लिमिटेडच्या, क्षमता वाढ आणि पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणावर भर देणाऱ्या सध्या सुरू असलेल्या, प्रस्तावित आणि अभ्यासाधीन प्रकल्पांचा समावेश असलेला धोरणात्मक मार्गदर्शक आराखडा त्यांनी सादर केला. वाडेकर यांनी यावेळी महामंडळाने लक्ष केंद्रित केलेल्या महत्त्वाच्या चार क्षेत्रांचा उल्लेख केला – शून्य मृत्यू राखण्यासाठीचे अभियान , पुरनियंत्रण उपाययोजना, कवच 5 अंतर्गत CBTC प्रणालीची अंमलबजावणी आणि इंटरमोडल एकत्रीकरण, हे सर्व ‘विकसित भारत’ या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहेत.
यावेळी, तांत्रिक दृष्टिकोन मांडताना प्रकल्प संचालक राजीव श्रीवास्तव यांनी मुंबईसारख्या मर्यादित शहरी क्षेत्रात प्रकल्प कार्यवाहीची गुंतागुंत अधोरेखित केली. आम्ही जगातील सर्वात आव्हानात्मक रेल्वे वातावरणात काम करत असून, येथे मिळवलेली प्रत्येक यशोगाथा ही एकत्रित अभियांत्रिकी, स्मार्ट नियोजन आणि 24 तास कार्यरत असणाऱ्या समर्पित चमूचे फलित आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमात महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, संचालक आर.एस. वार्ष्णेय, डॉ. पी.सी. सहगल, श्री प्रभात सहाय, एच.बी. सिंग, शोभना जैन आणि रवि अग्रवाल यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास सिव्हिओ बी.के. गांगटे यांचीही उपस्थिती होती. विद्युत विभागाचे महाव्यवस्थापक विनोद मेहरा यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी मुंबई रेल्वे विकास महामंडळ लिमिटेडच्या पूर्ण व आगामी प्रकल्पांवर आधारित विशेष लघुपट दाखवण्यात आला. मध्य रेल्वेच्या सांस्कृतिक पथकाने सादर केलेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने समारंभात रंग भरला. मुंबईच्या उपनगरी रेल्वे जाळ्यातील सुरक्षा, क्षमता, वक्तशीरपणा व प्रवासी सुविधा यामध्ये सातत्याने सुधारणा करण्याचा नव्याने संकल्प करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. एमआरव्हीसीने मुंबईच्या विकासाला आणि विकसित भारताच्या आकांक्षांना पाठिंबा देत, शाश्वत आणि प्रवासी-केंद्रित शहरी वाहतूक पायाभूत सुविधांच्या विकासातली आघाडी जारी ठेवली आहे.
Matribhumi Samachar Marathi

