Sunday, January 11 2026 | 09:28:20 AM
Breaking News

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केले सैन्य अकादमीत 157 व्या दीक्षांत पथसंचलनाचे निरीक्षण

Connect us on:

देहरादून येथील भारतीय सैन्य अकादमी परिसरात ऐतिहासिक ड्रिल स्क्वेअर येथे आज आयोजित करण्यात आलेल्या 157 व्या दीक्षांत पथसंचलनाने अभिमान, परंपरा आणि सैनिकी तेजाचे दर्शन घडविले. या गौरवपूर्ण समारंभाद्वारे अधिकारी प्रशिक्षणार्थींची भारतीय सैन्यात अधिकृत नियुक्ती करण्यात आली. हा प्रसंग अकादमीच्या “शौर्य आणि शहाणपण” या चिरंतन बोधवाक्याचे प्रतिबिंब असून, कठोर प्रशिक्षण, शिस्त आणि अदम्य साहसाचे प्रतीक ठरला.

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दीक्षांत पथसंचलनाचे निरीक्षण केले आणि प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल नव्याने नियुक्त अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना लष्करप्रमुखांनी अधोरेखित केले की शस्त्रधारी सेवेचा व्यवसाय केवळ एक नोकरी नसून, तो एक पवित्र ध्यास आहे. या सेवेसाठी अढळ निष्ठा, निस्वार्थ सेवा आणि आवश्यकतेनुसार राष्ट्रसेवेसाठी सर्वोच्च बलिदान देण्याची तयारी अपेक्षित असते. त्यांनी भारतीय सैन्य अकादमीच्या गौरवशाली परंपरेचे कौतुक केले, जी दूरदृष्टी असलेले नेतृत्व आणि निर्भय अधिकारी घडवित आली आहे आणि ज्यांनी वेळोवेळी शौर्य व सन्मानाची सर्वोच्च परंपरा जपली आहे.

157 वा नियमित अभ्यासक्रम, 46 वा तांत्रिक प्रवेश योजना अभ्यासक्रम, 140 वा तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रम, 55 वा विशेष कमिशंड अधिकारी अभ्यासक्रम आणि टेरिटोरियल आर्मी ऑनलाइन प्रवेश परीक्षा 2023 अभ्यासक्रमातील एकूण 525 अधिकारी प्रशिक्षणार्थी, तसेच 14 मित्र राष्ट्रांमधील 34 अधिकारी प्रशिक्षणार्थी, यांची अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. अधिकृत सेवेत त्यांचा प्रवेश हा भारताच्या संरक्षण नेतृत्वाला बळकटी देणारा असून, मित्र राष्ट्रांबरोबरच्या दीर्घकालीन लष्करी भागिदारीच्या सातत्याचे प्रतीक आहे.

या समारंभाला पालक, कुटुंबीय, वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि मान्यवर पाहुणे उपस्थित होते. दीक्षांत पथसंचलनाचा समारोप पारंपरिक ‘अंतिम पग’ विधीने झाला. या क्षणी तरुण अधिकाऱ्यांनी राष्ट्राची सार्वभौमता, सन्मान आणि मूल्यांचे रक्षण करण्याच्या संकल्पासह पुढे मार्गक्रमण केले.

निरीक्षण अधिकारी यांच्याकडून प्रदान करण्यात आलेली पारितोषिके :

• स्वर्ड ऑफ ऑनर – अकादमी कॅडेट अॅडज्युटंट निश्कल द्विवेदी

• सुवर्णपदक (क्रमवारीत प्रथम) – अकादमी कॅडेट अॅडज्युटंट निश्कल द्विवेदी

• रौप्यपदक (क्रमवारीत द्वितीय) – बटालियन अंडर ऑफिसर बादल यादव

• कांस्यपदक (क्रमवारीत तृतीय) – सीनियर अंडर ऑफिसर कमलजित सिंग

• रौप्यपदक (क्रमवारीत प्रथम – तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रम) – ऑफिसर प्रशिक्षणार्थी जाधव सुजीत संपत

• रौप्यपदक (क्रमवारीत प्रथम – तांत्रिक प्रवेश योजना – 46) – विंग कॅडेट कॅप्टन अभिनव मेह्रोत्रा

• रौप्यपदक (विशेष कमिशंड अधिकारी) – ऑफिसर प्रशिक्षणार्थी सुनील कुमार छेत्री

• पदक (क्रमवारीत प्रथम – परदेशी प्रशिक्षणार्थी) – ज्युनियर अंडर ऑफिसर मोहम्मद साफिन अशरफ, बांगलादेश

• लष्करप्रमुख बॅनर – इंफाळ कंपनी (शरद सत्र 2025 मध्ये 12 कंपन्यांमध्ये एकूण प्रथम)

About Matribhumi Samachar

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे चेन्नईतील डॉ. एम.जी.आर. शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या 34व्या पदवीदान समारंभात मार्गदर्शन

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी आज चेन्नई येथील डॉ. एम.जी.आर. शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या 34व्या पदवीदान …