भारत सरकारचे बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय (एमओपीएसडब्ल्यू) सचिव श्री. टी. के. रामचंद्रन यांनी 12 जून 2025 रोजी फ्रान्समधील मार्सेल्स येथील सीएमए सीजीएमच्या जागतिक मुख्यालयाला भेट दिली. फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौर्यादरम्यान त्यांनी सीएमए सीजीएम सोबत केलेल्या ऐतिहासिक संवादाचा पुढील टप्पा गाठण्याच्या उद्देशाने ही भेट होती. पंतप्रधानांच्या त्या संवादामध्ये भारताच्या वृद्धिंगत होत चाललेल्या सागरी क्षेत्रावर आणि जागतिक भागीदारीवर भर देण्यात आला होता.
या भेटीदरम्यान सचिवांनी सीएमए सीजीएम ग्रुपच्या वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. भारतातील त्यांच्या नौवहन, जहाजबांधणी, कंटेनर टर्मिनल्स, मल्टीमोडल लॉजिस्टिक्स आणि सागरी औद्योगिक क्षमता यासह विस्तारलेल्या उपस्थितीविषयी त्यांना यावेळी माहिती देण्यात आली. सीएमए सीजीएम नेतृत्वाने फेब्रुवारीपासून त्यांच्या भारत धोरणांतर्गत झालेल्या प्रगतीविषयी सविस्तर माहितीही यावेळी दिली. ज्यामध्ये भारतीय ध्वजधारी जहाजांच्या ताफ्याचा विस्तार, जहाजबांधणीतील सहकार्य, अंतर्गत लॉजिस्टिक्स विकास, सागरी औद्योगिक गुंतवणूक आणि नवकल्पना या पाच प्रमुख स्तंभांवर कार्य सुरू आहे
नौवहनसंबंधित उपक्रमांतर्गत सीएमए सीजीएमने आपली पहिली भारतीय ध्वजधारी जहाजे सीसी व्हीक्टोरिया आणि सीसी मॅनाउस यांना रवाना केले असून गुजरातमधील जीआयएफटी सिटीमध्ये एक नवीन भारतीय नौवहन संस्था स्थापन केली आहे. जहाजबांधणीत, ग्रुप एलएनजी चालित कंटेनर जहाजांसाठी भारतीय जहाजबांधणी संस्थांशी पुढील चर्चा सुरू आहे. बंदर आणि अंतर्गत पायाभूत सुविधांमध्येही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. यात न्हावा शेवा मुक्त बंदर टर्मीनलमध्ये $200 दशलक्ष विस्तार प्रकल्प आणि वाढवण बंदर प्रकल्पात सहभाग यांचा समावेश आहे.
या कंपनीने भारतातील विशेषतः अलंग येथील जहाजतोडणी व्यवस्थेसंदर्भात रस व्यक्त केला असून, जागतिक शाश्वतता उद्दिष्टांशी सुसंगत राहून भारतातून कंटेनर आणि हरित पोलाद यांचा वापर करण्यास सज्ज असल्याचे सांगितले. सीएमए सीजीएम सध्या भारतात 2,200 हून अधिक डिजिटल व्यावसायिकांना रोजगार देते आणि देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सागरी संशोधन व नवोन्मेष केंद्र स्थापन करण्याच्या शक्यतांची चाचपणी करत आहे.
सीएमए सीजीएम प्रतिनिधीमंडळात पॅट्रीस बर्गमीनी (ग्रुप सीईओ व चेअरमन यांचे राजनैतिक सल्लागार), कॅमिले ऍन्ड्रयूज (ग्रुप सीईओ कार्यालय), लुडोविक रेनोउ (ग्लोबल शिपिंग नेटवर्क प्रमुख), अजित महाजन( व्यवस्थापकीय संचालक, सीएमए सीजीएम, भारत), अँटोईन कॅन्टन (प्रकल्प व्यवस्थापक, भारत उपक्रम ), आणि अगाथा बोनीन (सार्वजनिक संबंध विशेषज्ञ) यांचा समावेश होता.
या भेटीमुळे बदलत चाललेल्या सागरी क्षेत्राविषयी विचारांची देवाणघेवाण झाली तसेच भारत-युरोप मार्गिकेत अधिक चांगल्या संपर्क व नवोन्मेषाच्या संधी शोधण्यात मदत झाली. मार्सेल्समधील सचिवांचा विविध चर्चांमध्ये सहभाग जागतिक सागरी उद्योगांसोबत भारताच्या वाढत्या सहकार्याचे प्रतिबिंब आहे आणि देशाच्या दीर्घकालीन बंदर व जलवाहतूक विकास दृष्टीकोनाला पाठबळ देणाऱ्या उद्योग नेत्यांशी सातत्याने संवाद सुरू ठेवण्याची वृत्तीही दर्शवतो.

Matribhumi Samachar Marathi

