नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025
संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी भारतीय लष्कराच्या सर्व सैनिकांना 15 जानेवारी 2025 रोजी 77 व्या लष्कर दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय लष्कर ही संस्था भारताच्या एकता व सुरक्षेचा मजबूत पाया म्हणून भक्कमपणे उभी आहे, हा दिवस म्हणजे लष्कराची ओळख असलेल्या अविचल समर्पणभावनेचा, शौर्य, विजिगिषु वृत्ती व उच्च व्यावसायिक कार्यक्षमतेचा उत्सव असल्याचे त्यांनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे. कोणत्याही आव्हानाचा सामना करून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण तसेच देशाची निस्वार्थपणे सेवा करण्याची अतुल्य क्षमता असलेल्या भारतीय लष्कराचा वारसा उज्ज्वल असल्याचे जनरल अनिल चौहान यांनी म्हटले आहे. “आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी लष्करातील सैनिकांची सतत सज्ज राहण्याची व विपरीत परिस्थितीतही आपल्या कामातील अत्युच्च गुणवत्ता राखण्याची क्षमता प्रशंसेला पात्र आहे.” हे त्यांनी अधोरेखित केले.
आधुनिक काळातील युद्धाचे बदललेले स्वरूप व तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराबद्दल बोलताना संरक्षण दल प्रमुख म्हणाले, कि “ तंत्रज्ञानातील आधुनिक शोधांमुळे व भूराजकीय परिस्थिती बदलत राहिल्यामुळे आधुनिक काळात युद्धाचे स्वरूप बदलले आहे. सायबर , अवकाश व वैचारिक-बौद्धिक क्षेत्रातील संघर्ष वाढत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सुधारणा, डेटा केंद्रित बांधणी , सेलेरिटी अर्थात वेगवान हालचालींवर आधारित स्टेल्थ व हायपरसॉनिक तंत्रज्ञानाचे पाठबळ मिळालेलं युद्धतंत्र, स्वयंचलित वाहनाच्या आधारे काम करणारे रोबोटिक तंत्रज्ञान,अशा अनेक अत्याधुनिक साधनांमुळे भावी काळातील युद्धे लढण्याचे तंत्र आमूलाग्र बदलणार आहे.”
भविष्यकाळातील युद्धे पूर्वीच्या पद्धतीने लढली जाणार नाहीत. युद्ध जिंकणे हेच लष्कराचे प्रमुख उद्दिष्ट आहे, त्यामुळे भारतीय लष्कराला आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून युद्धाचे डावपेच, युक्त्या प्रयुक्त्या व पद्धती बदलत राहून सतत शत्रूच्या एक पाऊल पुढे राहाणे आवश्यक आहे.उच्च प्रतीचे तंत्रज्ञान आत्मसात केलेल्या सैनिकांना सुधारित माहिती व संपर्क तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे संरक्षण दल प्रमुख म्हणाले.
आपल्या संदेशाच्या शेवटी संरक्षण दल प्रमुखांनी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूरवीर सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली.
“आजच्या या विशेष दिवशी प्रत्येक सैनिकाने भविष्यकाळातील आव्हानांना धैर्याने व अभिमानाने सामोरे जाताना लष्कराच्या उज्ज्वल परंपरांचा सन्मान ठेवण्याची प्रतिज्ञा करावी. आपल्या मातृभूमीला भव्य सन्मान व यश मिळवून देण्यासाठी राष्ट्रबांधणीच्या कार्यात सहभाग देण्याचे आपले कार्य लष्कर सतत सुरु ठेवेल,” असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
Matribhumi Samachar Marathi

