नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025
15 जानेवारी 2025 रोजी पुणे येथे सेना दिवस संचलन 2025 मध्ये अग्निवीर महिला संचलन पथक सहभागी होणार असून, भारतीय लष्करातील महिलांचा उल्लेखनीय प्रवास आणखी पुढे नेणार आहे. प्रजासत्ताक दिन संचलन 2024 च्या त्रि-सेना दल संचलन मधील संपूर्ण महिला पथकाच्या सहभागानंतरचा हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.

2019 मध्ये कोअर ऑफ मिलिटरी पोलीस (सीएमपी), अर्थात, महिला लष्करी पोलीस दलातील महिलांचा समावेश, ही भारतीय लष्कराची एक ऐतिहासिक कामगिरी होती. तेव्हापासून महिला लष्करी पोलिसांनी केवळ लष्करी भूमिकेतच नव्हे, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्येही सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत सैन्यदलाला अभिमान आणि सन्मान मिळवून दिला आहे. ‘नारी शक्ती’ या संकल्पनेला अनुसरून, अग्निवीर महिला संचलन पथक, लष्कर दिवस संचलन 2025 मध्ये महिला लष्करी पोलिसांचे सामर्थ्य, शिस्त आणि समर्पण प्रदर्शित करत कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षण बिंदू ठरेल. कॅप्टन संध्या राव एच यांच्या कुशल नेतृत्वाखालील ही तुकडी, भारतीय लष्करातील महिलांचे नेतृत्व आणि वचनबद्धता याचा वस्तुपाठ आहे.
अग्निवीर महिला संचलन पथकाचा सहभाग म्हणजे, स्त्री-पुरुष समानतेला चालना देऊन महिलांना आपल्या श्रेणीमध्ये सक्षम बनवण्यासाठी, सुरक्षा दलांना बळकट करून, राष्ट्र सेवेशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात महिलांच्या क्षमतेचा पुरस्कार करण्याप्रति देशाची वाढती बांधिलकी प्रतिबिंबित करण्याच्या भारतीय लष्कराच्या सध्या सुरु असलेल्या प्रयत्नांचा दाखला आहे.
Matribhumi Samachar Marathi

