नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रासाठी भारताच्या धोरणात पवन ऊर्जा केंद्रस्थानी आहे, असे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे.
जागतिक पवन दिन 2025 निमित्त त्यांनी आज 15 जून रोजी बेंगळुरू येथे हितधारकांच्या परिषदेला संबोधित केले.
या कार्यक्रमाला केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि कर्नाटक सरकारचे ऊर्जा मंत्री के.जी. जॉर्ज देखील उपस्थित होते. देशाला जागतिक उत्पादन केंद्र बनण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असून ते नवीकरणीय स्रोतांमधून साध्य होईल, असे जोशी म्हणाले.

आपली राष्ट्रीय उद्दिष्टे महत्त्वाकांक्षी आणि स्पष्ट आहेत, 2030 पर्यंत 50 टक्के वीज क्षमता बिगर-जीवाश्म इंधन स्त्रोतांपासून मिळवणे आणि 2070 पर्यंत शून्य (नेट-झिरो) उत्सर्जन साध्य करणे भारताचे उद्दिष्ट आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पवन ऊर्जा केंद्रस्थानी आहे, पवन ऊर्जा ही आपल्या नवीकरणीय ऊर्जा धोरणाचा फक्त घटक नसून, ती त्याचा आत्मा आहे आणि आत्मनिर्भर भारताच्या केंद्रस्थानी आहे, असे जोशी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला उत्पादनासाठी नवीकरणीय ऊर्जा आणि घरगुती वापरासाठी पारंपारिक ऊर्जा, असा दृष्टिकोन दिला, असे अधोरेखित करत जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकला.

भारताची वाढणारी उत्पादन क्षमता लक्षात घेता, पंतप्रधानांचा दृष्टीकोन नवीकरणीय ऊर्जा उत्पादन, साठवण आणि वापर यावर भर देतो. आगामी काळात भारत जागतिक उत्पादन केंद्र झाल्यानंतर उत्पादन क्षेत्राच्या ऊर्जेची गरज नवीकरणीय स्रोतांमधून पूर्ण करता येईल, असेही जोशी यांनी म्हटले आहे.

भारताकडे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रासाठी प्रचंड क्षमता आहे. सध्या भारताकडे जगातील चौथ्या क्रमांकाची पवन ऊर्जा उत्पादन क्षमता आहे आणि तो तिसऱ्या क्रमांकाचा मोठा नवीकरणीय ऊर्जा उत्पादक देश आहे. 10 वर्षांपूर्वी कोणीही कल्पना केली नव्हती की भारत नवीकरणीय ऊर्जा उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, परंतु आज ते वास्तवात उतरले आहे, असे मंत्री म्हणाले.
Matribhumi Samachar Marathi

