Saturday, January 10 2026 | 10:58:35 PM
Breaking News

भारत पारंपरिक औषधांवरील दुसऱ्या डब्ल्यूएचओ जागतिक शिखर परिषदेचे करणार आयोजन

Connect us on:

नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2025. भारत संयुक्तपणे दुसऱ्या जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) पारंपरिक औषध शिखर परिषदेचे 17 ते 19 डिसेंबर 2025 दरम्यान आयोजन करत असून नवी दिल्ली आरोग्य आणि कल्याणावरील जागतिक संवादाचे केंद्रबिंदू बनेल. जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाद्वारे सह-आयोजित ही शिखर परिषद संतुलित, सर्वसमावेशक आणि शाश्वत आरोग्य प्रणालींचा सामायिक दृष्टिकोन पुढे नेण्यासाठी जगभरातील धोरणकर्ते, शास्त्रज्ञ, चिकित्सक, स्थानिक ज्ञानधारक आणि नागरी समाजाच्या नेत्यांना एकत्र आणणार आहे.

ही शिखर परिषद “संतुलन पुनर्स्थापित करणे: आरोग्य आणि कल्याणाचे विज्ञान आणि चिकित्सा पद्धती ” या संकल्पनेखाली आयोजित केली जाईल. जागतिक स्तरावरील आरोग्य प्रणाली असमानता, पर्यावरणीय ताण आणि वाढत्या दीर्घकालीन आजारांशी झुंज देत असताना ही शिखर परिषद पारंपरिक औषधोपचारांची प्रासंगिकता पुन्हा अधोरेखित करण्याचा प्रयत्न करेल, तसेच विज्ञान, पुरावे आणि जबाबदार चिकित्सा पद्धतीच्या  आधारावर त्याची भूमिका दृढपणे स्थापित करेल. 2023 मध्ये गुजरातच्या गांधीनगर येथे झालेल्या पहिल्या शिखर परिषदेला मिळालेल्या प्रतिसादाच्या आधारावर नवी दिल्लीतील ही परिषद जागतिक आरोग्य विषयपत्रिकेमध्ये पारंपरिक औषधोपचारांना स्थान देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पारंपरिक औषध धोरण 2025-2034 द्वारे निर्देशित ही शिखर परिषद, पारंपरिक औषध प्रणाली लोकाभिमुख आरोग्यसेवा आणि ग्रहाच्या कल्याणासाठी कशा प्रकारे महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात, यावर लक्ष केंद्रित करेल.

ही शिखर परिषद उत्तरदायित्व, मानके आणि आकडेवारी यांवरही लक्ष केंद्रित करेल, तसेच पारंपरिक वैद्यकशास्त्रातील प्रगतीचे मोजमाप कसे केले जाऊ शकते व तिला जबाबदारीने मार्गदर्शन कसे करता येईल, याचा वेध घेईल. प्रमाणित डेटा, पारदर्शक अहवाल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसह डिजिटल तंत्रज्ञानाचा जबाबदार व मानवकेंद्रित वापर याच्या भूमिकेचे परीक्षण एका विशेष पूर्ण सत्रात केले जाईल. या चर्चांमध्ये पारंपरिक ज्ञानाचा आदर, सांस्कृतिक अखंडता आणि सामुदायिक विश्वासावर भर दिला जाईल, तसेच ज्ञानाच्या विविध पद्धतींना मान्यता देणाऱ्या आणि संसाधनांचा न्याय्य व नैतिक वापर सुनिश्चित करणाऱ्या उत्तरदायित्व चौकटींची आवश्यकता निश्चित करेल.

या कार्यक्रमात 25 हून अधिक सत्रांमध्ये 170 हून अधिक तज्ञ वक्ते सहभागी होतील जे विज्ञान, धोरण, वैद्यकीय चिकित्सा आणि समुदाय नेतृत्वाच्या दृष्टिकोनांचे सादरीकरण करतील. यात निवडक एकवीस नाविन्यपूर्ण कल्पना सादर केल्या जातील, ज्यात जगाच्या विविध भागांतून उदयास येत असलेले नवीन दृष्टिकोन, उत्पादने आणि उपायांवर प्रकाश टाकला जाईल. ही शिखर परिषद जागतिक आरोग्य संघटना आणि जैव-सांस्कृतिक प्रदेशांमधील अनुभवांवरही प्रकाश टाकेल, ज्यामुळे आरोग्य, संस्कृती आणि परिसंस्था यांच्यातील सखोल संबंध अधोरेखित होतील.

About Matribhumi Samachar

Check Also

1 जानेवारी 2026 पासून भारत स्विकारणार ‘किंबर्ले प्रोसेस’ या यंत्रणेचे प्रतिष्ठित अध्यक्षपद

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2025. ‘किंबर्ले प्रोसेस’ च्या (KP – जगभरातील कच्च्या हिऱ्यांचा व्यापार सुरक्षित व …