नवी दिल्ली, 16 जून 2025. भारतीय तटरक्षक दलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड बांधत असलेल्या आठ जलद गस्ती जहाजांच्या मालिकेतील अचल या पाचव्या जलद गस्ती जहाजाचे आज 16 जून 2025 रोजी गोवा येथे कविता हरबोला यांच्या हस्ते, तटरक्षक दलाचे कमांडर (पश्चिमी समुद्र तट), अतिरिक्त महासंचालक अनिल कुमार हरबोला यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक जलावतरण झाले.
या जहाजाची रचना अतिशय कठोर चाचणीचा अंतर्भाव असलेल्या अमेरिकन ब्युरो ऑफ शिपिंग आणि भारतीय नौवहन निबंधक (इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग) यांच्या दुहेरी-श्रेणी प्रमाणपत्र अंतर्गत केली असून या जलद गस्ती जहाजाच्या निर्मितीमध्ये 60% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे.या जहाजाची लांबी 52 मीटर आणि रुंदी 8 मीटर आहे. हे जहाज सीपीपी (कंट्रोलेबल पिच प्रोपेलर) आधारित प्रणोदन प्रणालीने सुसज्ज आहे आणि ते जास्तीत जास्त 27 नॉट्सचा वेग गाठू शकते.
‘अचल’ या जहाजाची प्रामुख्याने सुरक्षा, देखरेख, नियंत्रण आणि गस्त यासारख्या कामांसाठी आखणी केलेली आहे. हे जहाज अपतटीय मालमत्ता आणि बेट प्रदेशांचे संरक्षण करण्यास सक्षम आहे. अचलचे जलावतरण हे भारतीय तटरक्षक दल आणि गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्यातील दीर्घकालीन सहकार्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले आणखी एक मजबूत पाऊल आहे.
या प्रकल्पाचा एकूण खर्च 473 कोटी रुपये असून रोजगाराच्या संधी निर्माण करत आणि विविध कारखाने आणि गोवा शिपयार्ड लिमिटेड मधील उत्पादन उपक्रमांमध्ये सहभागी असलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना बळकटी देत स्थानिक उद्योगांनाही मोठी चालना मिळाली आहे.
या कार्यक्रमाला, गोवा शिपयार्ड लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय, भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि शिपयार्डचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
0Y5N.jpg)
79WU.jpg)
Matribhumi Samachar Marathi

