Monday, December 08 2025 | 04:33:30 PM
Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसच्या अध्यक्षांनी सायप्रस आणि भारतातील प्रमुख उद्योजकांशी साधला संवाद

Connect us on:

नवी दिल्ली, 16 जून 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलाइड्स यांनी आज लिमासोल येथे झालेल्या गोलमेज परिषदेत सायप्रस आणि भारतातील आघाडीच्या उद्योजकांशी संवाद साधला. या बैठकीला बँकिंग, वित्तीय संस्था, उत्पादक, संरक्षण, दळणवळण, नौवहन, तंत्रज्ञान, नवोन्मेष, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान सेवा, पर्यटन आणि वाहतूक अशा विभिन्न क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.

गेल्या 11 वर्षात भारतात झपाट्याने झालेल्या आर्थिक परिवर्तनाला अधोरेखित करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की पुढील पिढीतील सुधारणा, धोरणात्मक अंदाज, स्थिर राजकारण आणि व्यापार सुलभतेमुळे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनला आहे. नवोन्मेष, डिजिटल क्रांती, स्टार्ट अप आणि भविष्यवेधी पायाभूत सुविधांमुळे सध्या जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत येत्या काही वर्षांतच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरी हवाई वाहतूक, जहाजबांधणी, डिजिटल पेमेंट  आणि हरित विकास क्षेत्रातील स्थिर वाढीच्या जोरावर सायप्रस मधील कंपन्यांना भारतातील कंपन्यांसोबत भागीदारी करायला अफाट संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.  भारतातील कुशल प्रतिभा आणि स्टार्ट अप परिसंस्था या भारताच्या बलस्थानांचा त्यांनी उल्लेख केला आणि भारताच्या यशोगाथेत उत्पादन , कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम, सेमीकंडक्टर आणि महत्वपूर्ण  खनिजे या नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांचे योगदान त्यांनी अधोरेखित केले.

भारतासाठी विशेषतः परकीय थेट गुंतवणूक क्षेत्रात सायप्रस हा प्रमुख आर्थिक भागीदार राहिलेला आहे असे सांगून भारतीय अर्थव्यवस्थेत नवीन गुंतवणुक करण्यासाठी सायप्रसमध्ये असलेल्या उत्सुकतेचे पंतप्रधानांनी स्वागत केले.

वित्तीय सेवा क्षेत्रातील व्यावसायिक सहभागाच्या संभाव्यतेवर भर देत दोन्ही नेत्यांनी एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंज गिफ्ट सिटी, गुजरात आणि सायप्रस स्टॉक एक्सचेंज यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचे स्वागत केले.एनआयपीएल (एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड) आणि युरोबँक सायप्रस यांनी दोन्ही देशांदरम्यान क्रॉस-बॉर्डर पेमेंट करण्यासाठी यूपीआय सुरू करण्याबाबत एक सामंजस्य करार झाला ज्यामुळे पर्यटक आणि  उद्योगांना लाभ होईल.तसेच पंतप्रधानांनी भारत-ग्रीस-सायप्रस (आयजीसी) व्यवसाय आणि गुंतवणूक परिषदेच्या  प्रारंभाचे देखील स्वागत केले, ज्यायोगे नौवहन, दळणवळण-वाहतूक, नवीकरणीय ऊर्जा, नागरी विमान वाहतूक आणि डिजिटल सेवा यासारख्या क्षेत्रात त्रिपक्षीय सहकार्याला चालना मिळेल.अनेक भारतीय कंपन्या सायप्रसला युरोपचे प्रवेशद्वार मानतात तसेच माहिती तंत्रज्ञान (आयटी) सेवा, आर्थिक व्यवस्थापन आणि पर्यटनाचे केंद्र म्हणून पाहतात या वस्तुस्थितीचे पंतप्रधानांनी स्वागत केले.

सायप्रस पुढील वर्षी युरोपियन महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार होत असताना, दोन्ही नेत्यांनी भारत-ईयू धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला. त्यांनी वर्षाच्या अखेरीस भारत-ईयू मुक्त व्यापार करार पूर्ण करण्याबद्दल आशावाद व्यक्त केला; ज्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि आर्थिक सहकार्याला मोठी चालना मिळेल. व्यापार  गोलमेज बैठकीत ज्या व्यावहारिक सूचना देण्यात आल्या आहेत त्या व्यापार, नवोन्मेष आणि धोरणात्मक क्षेत्रात दीर्घकालीन सहकार्य सुनिश्चित करून संरचित आर्थिक आराखड्यासाठी  आधार बनतील,असे पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले.

सामायिक आकांक्षा आणि भविष्य-केंद्रित दृष्टिकोनासह, भारत आणि सायप्रस गतिमान आणि परस्पर फायदेशीर आर्थिक सहकार्याच्या नवीन युगासाठी सज्ज आहेत.

About Matribhumi Samachar

Check Also

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन

महामहीम, माझे मित्र राष्ट्रपती पुतीन दोन्ही देशांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे सहकारी नमस्कार! “दोबरी देन”! आज भारत …