Monday, December 29 2025 | 08:52:26 PM
Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रस प्रजासत्ताकाचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची भेट घेतली

Connect us on:

नवी दिल्ली, 16 जून 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायप्रस प्रजासत्ताकाचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांच्याशी चर्चा केली. अध्यक्षांच्या निवासस्थानी आगमन झाल्यावर, सायप्रसचे अध्यक्ष क्रिस्टोडौलिडेस यांनी पंतप्रधानांचे समारंभपूर्वक औपचारिक स्वागत केले. काल सायप्रस इथे दाखल झाल्यानंतर क्रिस्टोडौलिडेस यांनी विमानतळावर पंतप्रधानांचे स्नेहपूर्ण  स्वागत केले यातून दोन्ही राष्ट्रांमधील परस्पर विश्वास आणि चिरस्थायी मैत्री दिसून येते.

दोन्ही नेत्यांनी भारत-सायप्रस संबंधांना आधार देणाऱ्या सामायिक मूल्यांना पुन्हा एकदा अधोरेखित केले. त्यांनी परस्परांच्या  सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करत  पाठिंबा देण्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केल्याबद्दल आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला ठामपणे दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी सायप्रसचे आभार मानले. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दोन्ही देशांची दृढ वचनबद्धता यातून अधोरेखित होते. पंतप्रधानांनी सायप्रसच्या अखंडतेला आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे ठराव, आंतरराष्ट्रीय कायदे आणि युरोपियन महासंघाने  अधिग्रहण केलेली नियमावली यावर आधारित सायप्रस संबंधित  प्रश्नांच्या शांततापूर्ण निराकरणाला भारत देत असलेल्या पाठिंब्याचा पुनरुच्चार केला.

दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान आणि संशोधन, सांस्कृतिक सहकार्य आणि  नागरिकांमधील संबंध यासह द्विपक्षीय संबंधांच्या विविध विषयांवर सुरू असलेल्या सहकार्याचा आढावा घेतला आणि फिनटेक, स्टार्ट-अप्स,संरक्षण उद्योग, कनेक्टिव्हिटी, नवोन्मेष, डिजिटलायझेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि दळणवळण यातील नवीन क्षेत्रांतील सहकार्याच्या  मार्गांचा  शोध घेतला.दोन्ही बाजूंनी धोरणात्मक क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यासाठी पाच वर्षांचा कृती आराखडा (रोड मॅप) तयार करण्यास सहमती दर्शविली. सायबर आणि सागरी सुरक्षा संवाद आणि दहशतवाद,अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्र यांच्या तस्करीच्या मुद्द्यांवर माहितीची सुयोग्य वेळेत देवाणघेवाण करण्यासाठी एक यंत्रणा स्थापित करण्यासही सहमती दर्शविली. जानेवारी 2025 मध्ये स्वाक्षरी केलेल्या द्विपक्षीय संरक्षण सहकार्य कार्यक्रमाची दोन्ही नेत्यांनी प्रशंसा केली ज्यामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण भागीदारीला ठोस आकार येईल. आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी भारत-ग्रीस-सायप्रस (IGC) व्यवसाय आणि गुंतवणूक परिषदेच्या स्थापनेचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी व्यवसाय, पर्यटन, ज्ञान आणि नवोन्मेष यातील संबंध मजबूत करण्यासाठी हवाई कनेक्टिव्हिटी वाढविण्यावरही चर्चा केली. भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर या प्रदेशात शांतता आणि समृद्धीसाठी योगदान देईल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

बहुपक्षीयता आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सुधारणांसह  जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा, यांच्या विषयीच्या प्रतिबद्धतेचा पुनरुच्चार नेत्यांनी केला. विस्तारित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी सायप्रसच्या पाठिंब्याचा पुनरुच्चार केल्याबद्दल पंतप्रधानांनी क्रिस्टोडौलिड्स यांचे आभार मानले. त्यांनी पश्चिम आशिया आणि युरोपमधील चालू संघर्षांसह जागतिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली.

पंतप्रधानांनी क्रिस्टोडौलिडेस यांना भारत भेटीसाठी आमंत्रित केले. या भेटीदरम्यान निकोसिया विद्यापीठात भारत अध्ययन आयसीसीआर अध्यासन  स्थापन करण्यासाठी एक सामंजस्य करार करण्यात आला.

बैठकीनंतर भारत-सायप्रस भागीदारीवरील संयुक्त घोषणापत्र जारी करण्यात आले.

About Matribhumi Samachar

Check Also

1 जानेवारी 2026 पासून भारत स्विकारणार ‘किंबर्ले प्रोसेस’ या यंत्रणेचे प्रतिष्ठित अध्यक्षपद

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2025. ‘किंबर्ले प्रोसेस’ च्या (KP – जगभरातील कच्च्या हिऱ्यांचा व्यापार सुरक्षित व …