Sunday, December 07 2025 | 05:22:26 PM
Breaking News

धर्मेंद्र प्रधान आणि नायब सैनी यांनी एकत्रितपणे गुरुग्राममध्ये युनिवर्सिटी ऑफ साऊथॅम्प्टनच्या भारतातील कॅम्पसचे केले उद्घाटन

Connect us on:

नवी दिल्‍ली, 16 जुलै 2025. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्याबरोबर एकत्रितपणे गुरुग्राम, हरयाणा इथे युनिवर्सिटी ऑफ साऊथॅम्प्टनच्या भारतातील कॅम्पसचे उद्घाटन केले.

हे उद्घाटन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 ला पाच वर्षे झाल्यानिमित्त भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील एक मैलाचा टप्पा ठरते. क्यूएससर्वोत्तम 100 मध्ये समाविष्ट आणि यूकेच्या रसेल ग्रुपची संस्थापक सदस्य असलेली युनिवर्सिटी ऑफ साऊथॅम्प्टन हे भारतात कार्यान्वित होणारे पहिले परदेशी विद्यापीठ ठरली आहे. भारतात विदेशी उच्च शिक्षण संस्थांना कॅम्पस स्थापन आणि कार्यान्वित करण्याबाबत युजीसीच्या नियमावली अंतर्गत या विद्यापीठाचे कार्यान्वयन होत आहे.

   

या प्रसंगी बोलताना प्रधान म्हणाले की हे उद्घाटन एनईपी 2020 अंतर्गत भारतात शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा आहे. तसेच भारत-यूके रोडमॅप 2030 मध्ये ठरवलेल्या शैक्षणिक सहकार्याच्या उद्दिष्टाला बळकटी देणारा क्षण आहे.

उद्दीष्टपत्र मिळाल्यानंतर अवघ्या एका वर्षात अत्याधुनिक कॅम्पस स्थापन केल्याबद्दल प्रधान यांनी युनिवर्सिटी ऑफ साऊथॅम्प्टनचे अभिनंदन केले. प्रगत अभ्यासक्रम आणि साऊथॅम्प्टनच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेमुळे, हे कॅम्पस भविष्यातील नेतृत्व घडवणारी एक प्रतिष्ठित संस्था म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारतातील कॅम्पसच्या पहिल्या तुकडीत भारताच्या विविध भागांतून तसेच संयुक्त अरब अमिराती आणि नेपाळसारख्या आंतरराष्ट्रीय ठिकाणांहून शिक्षणात उत्तम यश मिळवलेले विद्यार्थी दाखल झाले आहेत.

यूकेच्या शैक्षणिक मानकांनुसार पात्र असलेले 75 हून अधिक पूर्णवेळ शिक्षक विद्यापीठ नियुक्त करणार आहे. तसेच, या शिक्षकांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक अनुभवाबाबत पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रमात सहभागी होणे अपेक्षित आहे. हे शिक्षक यूके, संयुक्त अरब अमिराती, मलेशिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जपान आणि अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थांमधील अनुभव घेऊन येतील.

   

युनिव्हर्सिटी ऑफ साऊथॅम्प्टन 2,90,000 हून अधिक माजी विद्यार्थ्यांचा संघ आहे, त्यामध्ये 1,700 हून अधिक भारतीय विद्यार्थी आहेत. या माजी विद्यार्थ्यांकडून भारतातील कॅम्पसला मार्गदर्शन व उद्योगदूत म्हणून सक्रीय पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

विद्यापीठाला अधिकृत उद्दीष्टपत्र 29 ऑगस्ट 2024 रोजी प्राप्त झाले व त्यानंतर 13 सप्टेंबर 2024 रोजी सार्वजनिक घोषणा आणि औपचारिक शुभारंभ करण्यात आला.

About Matribhumi Samachar

Check Also

‘राष्ट्रीय दूरसंवाद अकादमी – वित्त’ या संस्थेत आयोजित ‘विशेष मूलभूत अभ्यासक्रम 2025’ या प्रशिक्षणाच्या समारोप समारंभात केंद्रीय दूरसंवाद राज्यमंत्री डॉ. चंद्रा सेखर पेम्मासनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

राष्ट्रीय दूरसंवाद अकादमी – वित्त (एनसीए – एफ) या संस्थेच्या 6 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या विशेष मूलभूत अभ्यासक्रम 2025 …