नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2025. नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 17 ते 19 डिसेंबर 2025 दरम्यान आयोजित पारंपरिक औषधांवरील दुसऱ्या डब्ल्यूएचओ जागतिक शिखर परिषदेत आयुष मंत्रालय, जागतिक आरोग्य संघटनेच्या सहयोगाने आयुष्य एक्स्पो चे आयोजन करणार असून हे या कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट्य असेल.
हे प्रदर्शन या शिखर परिषदेचे प्रमुख व्यासपीठ असेल आणि या माध्यमातून भारताची आयुष प्रणाली आणि जगभरातील पारंपरिक औषधांसंदर्भातील पद्धतींचा समन्वय साधला जाईल.
हे प्रदर्शन भारताच्या पारंपरिक ज्ञान प्रणालींना आधुनिक काळातील सार्वजनिक आरोग्य प्राधान्यांशी सुसंगत अशा जागतिक संदर्भांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करते.
औषधी वनस्पती आणि बियाणे दालन यातील सर्वात मोठे आकर्षण असून भारताच्या जैविक वारसा आणि पारंपरिक वैद्यकशास्त्राच्या पर्यावरणीय पायाचे महत्त्व दर्शवणाऱ्या 40 सजीव औषधी वनस्पती आणि दुर्मिळ बीजे यामध्ये प्रदर्शित केली जातील.
‘स्पाइसेस ऑफ इंडिया पॅव्हेलियन’मध्ये दैनंदिन स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांचा वैज्ञानिक आधार आणि प्रतिबंधात्मक आरोग्यामध्ये त्यांची भूमिका मांडली जाईल, तर ‘मेटॅलोथेरप्युटिक्स झोन’मध्ये पारंपरिक शुद्धीकरण पद्धती, भस्म तयार करण्याच्या प्रक्रिया आणि सुरक्षिततेच्या पडताळणीच्या पद्धती स्पष्ट केल्या जातील.
याशिवाय या प्रदर्शनामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या आणि पंचकर्म यांची वैशिष्ट्ये सादर केली जातील, यामध्ये पारंपरिक साधनसामग्री आणि स्पष्टीकरणात्मक मांडणीच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक आरोग्यतत्त्वे, जीवनशैलीचे ऋतुमानानुसार नियम आणि उपचारात्मक पद्धती समजावून सांगितल्या जातील. पारंपरिक ज्ञानाचे जतन आणि जैव तस्करी रोखण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेले भारतीय पारंपरिक ज्ञान डिजिटल संग्रहालय या उपक्रमाचे सादरीकरण केले जाईल.
आयुष प्रदर्शनाच्या बरोबरच या एक्स्पो मध्ये एक समर्पित जागतिक आरोग्य संघटना झोन असेल, ज्यामध्ये सर्व डब्ल्यू एच ओ देशांमधील विविध भागांमधील पारंपरिक औषध प्रणाली प्रदर्शित केल्या जातील, सर्व देश त्यांच्या उपचारात्मक पद्धती, समुदाय आधारित आरोग्य प्रारूप आणि स्वदेशी ज्ञान पद्धतींबद्दल माहितीपूर्ण सादरीकरण करतील.
या प्रदर्शनाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने ग्लोबल ट्रॅडिशनल मेडिसिन लायब्ररी (GTML) चे उद्घाटन होणार आहे . जागतिक डिजिटल संग्रहालय अशी या उपक्रमाची संकल्पना असून या माध्यमातून विविध प्रदेशांतील पारंपरिक वैद्यकशास्त्राशी संबंधित ज्ञान, माहिती आणि संशोधनात्मक पुरावे एकत्र आणण्याचे कार्य केले जाणार आहे.
Matribhumi Samachar Marathi

